१९२४ साली चित्रपट सृष्टीतील एका कलंदर कलाकाराचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षी त्याने पहिला चित्रपट ‘इन्कलाब’ केला. नंतर फट्मार मारण्याच्या कामापासून त्याने चित्रपटाच्या सर्व विभागांचा अनुभव घेतला. वडील पृथ्वीराज कपूर याच क्षेत्रात नामवंत अभिनेते असल्यामुळे राजने चित्रपट निर्मितीचा देखील बारकाईने अभ्यास केला.
त्याची पहिली नायिका होती, मधुबाला. १९४८ साली चित्रपट निर्माता व दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट ‘आग’ केला. मात्र तो अपयशी ठरला. त्यानंतरच्या ‘बरसात’ ने इतिहास केला. १९५१ ते ५६ या सहा वर्षांत त्याने नर्गिसबरोबरचे एकापाठोपाठ एक केलेले चित्रपट तुफान चालले. ‘आवारा’ या चित्रपटामुळे रशियातील रसिकांनी त्याला डोक्यावर घेतले. ‘श्री ४२०’ मध्ये त्याने चार्ली चॅप्लीनसारखा अभिनय केला. ‘बुट पाॅलीश’ ही त्याचीच निर्मिती असूनही त्यात त्याने काम केलेले नव्हते. ‘जागते रहो’ हा त्याचा एक क्लासिक चित्रपट आहे.
‘जिस देशमें गंगा बस्ती है’ या चित्रपटातील ‘आ अब लौट चले’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी हवे तसे ढगांची पार्श्र्वभूमी मिळत नाही म्हणून संपूर्ण युनिट त्याने त्याच स्पाॅटवर काही दिवस सांभाळले. राज कपूरने सर्व सामान्य नायकाच्या भूमिका केल्या. त्यामुळे सर्व थरांतील प्रेक्षकांना तो भावला. त्याच काळातील दिलीप कुमार हा ट्रॅजेडी किंग होता तर देव आनंद हा चाॅकलेट हिरो होता. १९६४ सालातील ‘संगम’ या चित्रपटाने राज कपूरला अमाप यश दिलं. त्या चित्रपटातील कमाईतून त्याने लोणी येथे मोठी जागा खरेदी केली. जी राजबाग म्हणून ओळखली जाते. नंतर त्या राजबागेत अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले.
१९७० साली ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटाची त्याने निर्मिती व दिग्दर्शन केले. मूळ चित्रपट तीन तास त्रेचाळीस मिनिटांचा होता, तो कमी करत करत तीन तासांचा केला. गुरुदत्तच्या ‘कागज के फूल’ प्रमाणे हा चित्रपट प्रेक्षकांना सुरुवातीला कळलाच नाही. त्यामुळे राजला अपयशाला सामोरे जावे लागले. चित्रपटाची कथा उत्तम होती, पटकथा मोठी झाली. एक नायक, तीन नायिका तपशीलवार सादर करताना संकलन कसे करावे हाच मोठा प्रश्र्न पडला. नंतर हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला. उत्कृष्ट दिग्दर्शनाचा हा एक ‘माईलस्टोन’ आहे. त्या अपयशानंतर ‘बाॅबी’ चित्रपटाने पुन्हा राज कपूर यशस्वी ठरला. त्यानंतर ‘राम तेरी गंगा मैली’ ची निर्मिती केली. काही चरित्र अभिनेत्याच्या भूमिका करुन निवृत्त झाला. अभिनय, संकलन व निर्माता म्हणून अनेक फिल्मफेअर व राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
उत्कृष्ट ‘शोमन’ ही उपाधी मिळालेला असा राज कपूर पुन्हा होणे नाही. नायिकांच्या बाबतीत त्याने पहिल्यापासून तिचे सौंदर्य कसे खुलविता येईल याचाच विचार केलेला होता. नायिकेला पावसात भिजविणे, मिठ्या मारणे, नायिकेचा पदर ढळणे, स्नान दृष्य घेणे अशा प्रकारातून त्याने नर्गिस, पद्मिनी, वैजयंतीमाला, झीनत अमान, मंदाकिनी यांना सादर केले होते.
‘तिसरी कसम’ या गीतकार शैलेंद्रच्या चित्रपटासाठी त्याने मोबदला म्हणून फक्त एक रुपया घेतला होता असे म्हणतात, मात्र या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी त्याने फार उशीर लावला. परिणामी शैलेंद्रला फार मनस्ताप झाला. आणि दु:खाची गोष्ट म्हणजे शैलेंद्र गेल्यानंतर या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. एका चांगल्या साहित्यावरील हा सुंदर चित्रपट आजही अजोड आहे.
१९७६ साली ‘सत्यम शिवम् सुंदरम्’च्या सेटवर मी राजबागेत गेलो होतो. मी काढलेल्या झीनत अमानच्या चित्रावर मला तिची स्वाक्षरी घ्यायची होती. त्या दिवशी मी या ‘ग्रेट शोमन’ला जवळून पाहिले.
परवा वर्तमानपत्रात बातमी वाचली की, पहिल्या जेम्स बाॅण्ड ‘सिन काॅनरी’च्या पिस्तुलाचा लिलाव केला गेला. तिकडे परदेशात कलाकारांच्या दुर्मिळ वस्तूंचा लिलाव केला जातो. धनिक लोक ते संग्रही ठेवण्यासाठी खरेदी करतात. आपल्या राज कपूरने देखील पहिल्या चित्रपटापासूनच्या अनेक वस्तू, कपडे आर के स्टुडिओत संग्रहालय उभे करुन जपल्या होत्या. काही वर्षांपूर्वी आगीत सर्व जळून गेलं. आज राजबागही राहिलेली नाही. त्याची पुढची तिसरी पिढी चित्रपट क्षेत्रात असेल की नाही, काही सांगता येत नाही.
निळ्या डोळ्यांच्या राज कपूरला रसिक प्रेक्षक कधीही विसरणं शक्य नाही. जेव्हा कधी मी ‘जाने कहा गये वो दिन…’ गाणं ऐकतो, पहातो तेव्हा ते आर्त सूर हृदयापर्यंत पोहोचलेले असतात…आणि मन ठणकावून सांगत असतं….
‘तुमको न भूल पायेंगे….’
– सुरेश नावडकर १४-१२-२०
मोबाईल ९७३००३४२८४
Leave a Reply