नवीन लेखन...

वजनदार सुराची टूणटूण

इतरांच्या शारीरीक व्यंगावर हसणे या सारखे दळभद्री काम जगात कोणतेच नसेल. स्वत:ची खिल्ली उडवणे किंवा आपल्यावरच व्यंग कसणे ही अत्यंत अवघड गोष्ट. चार्ली चॅप्लीनने तर स्वत:चीच इतक्या टोकादार पणे खिल्ली उडवली की तो आमच्याच वर्मावर घाव घालत होता हे आम्हाला कळलेच नाही. लॉरेल हर्डी या शारीरीक विजोड जोडीने आम्हाला खदखदून हसवले. भारतीय चित्रपटसृष्टीत देखिल असे अनेक कलावंत होते व आजही आहेत. दामू अण्णा मालवणकरांचे डोळे तिरळे होते पण त्यांनी याच डोळ्यांचा वापर करून प्रेक्षकानां भरपूर हसवले. डेव्हीड व शरद तळवळकरांनी आपल्या टकलावर स्वत:च विनोद केले. मुक्री, सुंदर यांची शारीरीक उंची जरी कमी होती तरी विनोदाची उंची मोठी होती. असे स्वत:वर हसत हसत प्रेक्षकानां हसवत ठेवण्याची कला जगातल्या ज्या ज्या अभिनेत्यांनी साधली त्यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र तितकेच दु:खद होते.

उत्तर प्रदेशातील एका पंजाबी ग्रामीण खत्री परीवारात या मुलीचा जन्म झाला तेव्हा तिचे नाव उमा देवी असे ठेवण्यात आले. उमादेवी खत्री. आई वडील लहानपणीच वारले आणि अनाथ उमाला मग काकाने आधार दिला. हे अनाथपण जीवनातले सर्व विषाचे घोट पचवायला अनेकदा खूप मदत करतं. सुरक्षित वातावरणात वाढतानां आपल्याला जे सभोवती प्राप्त होतं ते या अनाथांच्या नशीबी कधीच येत नाही. लहानपण संघर्षात घालवणाऱ्या मुलानां निसर्ग झुंजण्याची एक असिम शक्ती देत असतो. उमाला एकच निसर्गत: देणगी होती ती म्हणजे तिचा गोड गळा. अनाथपणाच्या संघर्षात याच आवाजाची तिला सोबत होती. गाणी ऐकणे व कॉपी करत तसेच गाणे ही तिचा छेदच होता. मग एक दिवस तिने अचानक निर्णय घेतला की घर सोडून जायचे….पण कुठे? तरूण वयात हे कसे शक्य होईल? पण उमाने घर सोडले आणि तीने मुंबईचा रस्ता धरला. २३ व्या वर्षी घर सोडून मुंबईला पळून येणे आणि तेही एका तरूण मुलीला !!! किती अवघड गोष्ट असेल त्या काळी. बरे मुंबईत नातेवाईक तर दूरच पण ओळखीचेही कुणी नव्हते. तिला फक्त एकच नाव माहित होते संगीतकार नौशाद यांचे. ते ही उत्तर प्रदेशचेच. पत्ता शोधत ही थेट त्यांच्याकडे पोहचली. त्यांना म्हणाली- “मला छान गाता येते मला काही तरी काम द्या नाहीतर मी समुद्रात जीव देईन.’’ नौशादजीने तिला गायला लावले. तिचा आवाज खरंच चांगला होता. नौशादनी तिला चक्क एक सोलो गाणे दिले. १९४६ मधील हा प्रसंग आहे. ए.के.कारदार हे त्या काळातील प्रसिद्ध निर्माते-दिग्दर्शक, त्यांनी उमा देवीला करारबद्ध केले.

१९४७ मध्ये ए.के.कारदार यांनी मुन्वर सुलताना या अभिनेत्रीला घेऊन “दर्द” हा चित्रपट तयार केला. यात सुरैय्या सह कलाकार होती. नौशाद संगीतकार होते. “अफसाना लिख रही हूँ..” हे उमादेवीचे गाणे प्रचंड हीट झाले. या गाण्याचे गीतकार शकील बदायुनी हेही आपले नशीब अजमावण्यासाठी त्याच काळात मुंबईत आले होते. दर्द ची सर्व गाणी त्यांनी लिहली. त्या वर्षातला हा सर्वात हीट संगीतमय चित्रपट होता. “अफसाना लिख रही हूँ..” हे गाणे ऐकून दिल्लीचे एक सज्जन खूपच प्रभावीत झाले आणि ते मुंबइर्ला आले आणि उमादेवी सोबत काही काळ राहून लग्नही केले. दोन मुले व दोन मुली या अपत्याला झाल्या. उमादेवी आपल्या पतीला मोहन या नावाने हाक मारीत. उमादेवीला लगेच पूढच्या वर्षी मेहबूबखानच्या “अनोख अदा” चित्रपटात गायची संधी मिळाली. यातल दोन गाणी पुन्हा हिट झाली व उमादेवी उत्तम मानधन मिळविणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट झाली. १९४८ मध्ये दक्षिणेतील प्रसिद्ध जेमिनी बॅनरचा भव्यपट “चंद्रलेखा”तील उमादेवीची ७ गाणी खूप गाजली. तिच्या संगीत कारकिर्दीतील हा सर्वात महत्वाचा टप्पा होता. तिच्या आवाजाची एक विशिष्ठ रेंज होती. चित्रपटसृष्टीतले संगीत हळूहळू बदलत होतं. त्यात लता-आशा यांचा उदय झालेला त्यामुळे उमादेवीला काम मिळण कठीण जात होत. आता उमादेवीचा प्रवास संपून टूणटूण नावाच्या विनोदी अभिनेत्रीचा प्रवास सुरू होणार होता.

उमादेवी बऱ्यापैकी जाड झाली होती. तिचे बबली व्यक्तीमत्व बघून नौशादनी तिला अभिनय करण्याचा सल्ला दिला. दिलीपकुमार उमादेवीचे चांगले मित्र होते. एक दिवस तिने दिलीपकुमारकडे गळ घातली की तुझ्या चित्रपटात मला काही तरी काम दे. ते वर्ष होते १९५०. दिलीपकुमारच्या “बाबूल” या चित्रपटात उमादेवीने सर्वप्रथम अभिनय केला. टूणटूण हे नाव याच चित्रपटाने तिला दिले. यानंतर मात्र तिने आपल्या बबली व्यक्तीमत्वाचा पूरेपूर वापर करून घेतला. गुरूदत्तच्या बहुतेक चित्रपटात टूणटूण आहे. त्या काळच्या भगवान दादा, आग़ा, सुन्दर, मुकरी, धूमाळ, जॉनी वॉकर या सर्वच विनोदवीरा सोबत तिने काम केले. तिची चित्रपटातील एन्ट्रीच प्रेक्ष्कानां जाम आवडत असे. शिवाय तिच्या चेहऱ्यावरील निरागस आणि मिष्कील भाव खळखळून हसवत. तिच्या पासूनच स्त्री विनोद वीरांची परंपंरा सुरू झाली असे म्हणावयास काहीच हरकत नाही. १९५० ते १९९० या काळात विविध भाषेतील १९८ चित्रपटातुन टूणटूणने प्रेक्षकांचे मनोरजंन केले. मुंबईतील वर्सोवा भागात टूणटूणचे घर आहे. मी २००१ मध्ये त्याच भागात राहात असताना मला समजले म्हणून मी अनेकदा त्या रोडवर फेऱ्या मारीत असे पण मला कधी तिचे दर्शन नाही झाले. एखाद्या स्त्रीला जाडपणा वरून चिडवायचे असेल तर टूणटूण याच नावाचा वापर केला जात असे. गायीका उमादेवी ते विनोदी टूणटूण हा तसा आगळा वेगळा प्रवास म्हणावा लागेल. असे म्हटले जाते की चित्रपटसृष्टीत जो पर्यंत पडद्यावर अभिनेते दिसत असतात तो पर्यंत ते लक्षात रहातात. पडद्यावर दिसेनासे झाले की विस्मृतीत जातात. १९९० ते २००३ या कालावधित टूणटूण विस्मृतीत गेली ती कायमचीच. वयाच्या ८० व्या वर्षी ती काळाच्या पडद्याआड गेली.

-दासू भगत (११ जुलै ०१७)

Avatar
About दासू भगत 34 Articles
मी मुळ नांदेड या श्हराचा असून सध्या औरंगाबादला स्थयिक आहे. मुंबईतील सर जे.जे. इन्स्टीट्यूट ऑफ अप्लाईड आर्ट येथून उपयोजित कलेतील डिप्लोमा. चित्रपट हे माझ्या आवडीचा विषय. काही काळ चित्रपटासाठी टायटल्स, कला दिग्दर्शन म्हणून काही चित्रपट केले आहेत. ….सध्या औरंगाबाद येथे दिव्य मराठी या दैनिकात मुलांसाठीच्या पानाचे संपादन करतो..

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..