तुझा कोपही वाटतो मज प्रणय!
तुझी हर अदा आणते बघ, प्रलय!!
हृदयही तुझे, स्पंदनेही तुझी
किती गोड माझा-तुझा हा विलय!
तुझी नस नि नस जाणतो मी सखे
तुझे चित्त, मन मी, तुझे मी हृदय!
असे काय माझ्यातले डाचते?
तुझे माझिया भोवतीचे वलय!
जगाला कसा कमकुवत वाटलो?
असे कारणीभूत माझा विनय!
अता लागली जिंदगानी कलू….
कधी व्हायचा सांग, माझा उदय!
दिवेलागणीला हरवतोच मी
तुझी रोज येतेच हटकून सय!
अता या वयाला कशाला फुले?
मला कंटकांचीच झाली सवय!
कसे लोक होणार निर्भय तरी?
दवंडीच देऊन देती अभय!
असे ज्ञान पान्हावते रोज का?
मला मूल प्रत्येक वाटे तनय!
प्रोफेसर
प्रा.सतीश देवपूरकर
Leave a Reply