तुझे माझे नाते,
दुःखाचे दुःखाचे,—
पोळलेल्या जिवांचे,
व्यथित अशा हृदयांचे,–!!!
तुझे माझे नाते,
एकाच अखंड बंधाचे,
अगदी जन्मोजन्मीच्या,
गोड ऋणानुबंधाचे,
विचरशी तू सहचरे,
पण वेगळेच हे धागे,
काळजाच्या विणींचे
समसुखाचे, समदु:खाचे,–!!!
ओघळलेल्या अश्रूंचे,
आत लपलेल्या समुद्राचे,
खोलवरच्या भोवऱ्याचे, उसळणाऱ्या लाटांचे,
तुझे माझे नाते,
दुःखाचे दुःखाचे,—!!!
कधी भरतीओहोटीचे,
दोघातल्या ओढीचे,
वाचणाऱ्याला बुडवणारे, बुडणार्याला वाचवणारे,
पाण्याशी जीवनाचे,
निष्ठूर या जगातले, —!!!
तुझे माझे नाते,
दुःखाचे दुःखाचे,
अंतरात्म्यांतील आवाजांचे
आत्मिक एकरुपतेचे, ऐहिकापल्याड अलौकिकाचे, लौकिकातील असामान्यतेचे,-!!!
तुझे माझे नाते,
सुखाचे सुखाचे,
हवेशी गारव्याचे,
पावसाशी पाण्याचे,
झाडांशी टवटवीचे,
दवांशी थेंबांचे,
देठाशी फुलांचे,
सुगंधाशी कळीचे,
तुझे माझे नाते ,—-
सुखाचे सुखाचे,–!!!
बालपणीच्या दोस्ताचे,
सहवासातील मित्रांचे,
सवंगड्यांशी हृदयाचे,
जिवाशी सगळ्या मनांचे,
तुझे माझे नाते,
सुखाचे सुखाचे,–!!!
आरपार जाणारे,—
जन्म मृत्यू पलीकडले,
आत्म्याशी आत्म्याचे, परमात्म्याशी आत्म्याचे,
चैतन्याशी परमात्म्याचे,
तुझे माझे नाते,
सुखाचे सुखाचे,—
सुखाचे हे सुखाचे,–!!!
हिमगौरी कर्वे.
©
Leave a Reply