तसा विचार केला तर त्या दोघी बहिणीच.
एकाच घरात पण बाजू बाजूच्या खोलीत राहणाऱ्या.
सकाळ झाली की त्या हातपाय ताणून आळस द्यायच्या. त्याचवेळी घरातून बाहेर डोकवायच्या.
मग दिवसभर तशाच अवस्थेत दोघींच्या गप्पा आणि टिंगल टवाळ्या सुरूच. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांकडे त्या दोघी अगदी बारीक लक्ष ठेवायच्या. “हा कधी जातो? आणि तो कधी येतो? ही काय करते? आणि ते काय करतात?” हेच दिवसभर पाहात बसायचं… टाइमपास करत.
कुणी येवो न येवो, याचं लक्ष सतत रस्त्याकडे!
कधी कधी यांच्या डोक्यावर कावळे,चिमण्या किंवा कबुतरं येऊन बसत. पण त्यांना याची पर्वाच नाही. त्या ढीम्मच!
काहीवेळा चिमण्या जाता-जाता त्यांच्या डोक्यावर दोन गरम-गरम मऊ-मऊ ठिफ टाकून जात. पण त्या दोघी बहिणी त्या चिमण्यांशी कधीही भांडल्या नाहीत. किंवा डोकं हलवून त्यांना उडवलं पण नाही. त्यांचे आपले परिसर निरीक्षण सुरूच!
संध्याकाळ झाली. अंधारुन आलं की, त्या दोघी जणी आपापल्या खोल्यात स्वत:ला बंद करुन घेत.
सकाळ झाली की पुन्हा या दोघींचा बाहेर डोकावून टाइमपास सुरू.
पण अचानक एके दवशी.. .. एक बहिण बोलेच ना. एकदम खीन्न! उदास!
दुसऱ्या बहिणीला तिची काळजी वाटू लागली. तिला कळेना हिला झालं काय?
इतक्यात ती पहिली म्हणाली,“ताई, उद्यापासून मी बाहेर डोकावणार नाही.
तुला पाहणार नाही.
तुझ्याशी एक शब्द ही बोलणार नाही.
आपण आता पुन्हा कधी-कधी भेटणार नाही ग.
आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस!! ”
हे बोलताना तिला खूप भरुन आलं.
तिच्या काचा थंड पडल्या.
काळजीने धुरकट झाल्या.
हे पहिलीचं बोलणं सताड उघड्या तोंडाने दुसरी ऐकत होती.
भीतीने तिच्या काचा तापल्या.
कसबंसं स्वत:ला सावरत दुसरीने स्वत:ची कडी घट्ट केली.
उघड्या तोंडातून भरपूर हवा आत घेतली.
आणि.. ..धीर करुन तिने विचारलं,“मला नीट सांग, उद्या नक्की काय होणार आहे?”
“उद्या माझा मेकओव्हर आहे!
यू नो, पूर्वीची ती दिवाणखाना ही कनसेप्ट आता गेली. आता त्याचं लिाव्हिंग रुम मधे रुपांतर झालं! एव्हरीथींग इज नाऊ अल्ट्रा मॉडर्न!!..”
“काय ग, ही कुठली भाषा? काल पर्यंत तर तू ठीक होतीस! आणि हे मेक ओव्हर म्हणजे काय?”
“गेले आठ दिवस मी रोज हीच भाषा ऐकतेय.
अगं मेकओव्हर म्हणजे, सोप्या सुटसुटीत गोष्टी मोडून टाकून विचित्र अवजड गोष्टी आणायच्या!
आता त्या फोल्डींगच्या खूर्च्या किती छान आहेत! ती छोटी मुलं त्यावर उभं राहून आपल्यातून डोकावतात आणि आई बाबांना टाटा करतात तेव्हा किती बरं वाटतं ना? आता त्या मोडून त्याच्या बदली म्हणे “बीन बॅग्ज” आणणार आहेत!
ट्यूब लाइटशी गप्पा मारताना संध्याकाळ कशी निघून जायची ते कळायचं पण नाही.
पण आता म्हणे भिंतीत फिट्ट बसणाऱ्या काचेमागे दिवे लावणार आहेत.”
“अगं ताई, हे तर भयानकच बाई!! या दिव्यांची तोंडच अशी भितींत लिंपून टाकली तर घरात बोलायचं कुणी कुणाशी? आपले पंखेराव तरी आहेत ना?”
“नाही ग. माझ्या तोंडात एसी लावणार आहेत म्हणे. त्यातच असतो पंखा!”
“म्हणजे आता आयुष्यभर तू तोंडात एसी धरुन बसणार? कमाल आहे!! आमच्या तोंडात वाटेल त्या गोष्टी कोंबणारे हे कोण शहाणे?”
“रागावू नकोस ताई. उद्यापासून माझी लाइफस्टाइलच चेंज होणार आहे.”
“अगं मला नीट समजेल असं सांग गं..”
“उद्यापासून उघडणं, बाहेर डोकावणं, बिजागऱ्यांनी किरकिरणं हे सारं बंद!
आता फक्त गरगरत एका रेषेत सरकणं.
उद्यापासून मी स्लायडिंग होणारे ना!”
“व्वा! आणखी काय-काय होणारे?”
“तुला माहितंच आहे की.. या पांढऱ्या स्वच्छं काचांमुळे आपल्याला दुपारी त्या उन्हाचा किती त्रास होतो! पण उद्या मला रंगीत काचा लावणार आहेत. मस्त डार्क चॉकलेटी काचा!
आता उद्यापासून सकाळ नंतर डायरेक्ट संध्याकाळं! नो दुपार!!
एकदम कू।़।़ल!! ”
“मला सांग हे सगळं तुला आवडतंय?
अगं त्या चॉकलेटी काचांमुळे रंगांधळी होशील तू!
आणि त्या एसीमुळे घरातली माणसं जरी थंड झाली तरी तुझं डोकं नेहमीच तापलेलं असेल!
काळजी घे स्वत:ची..”
“ताई तू म्हणतेस ते खरंय!
मला बाहेरुन कुणीही कसंही बदलवलं तरी मी आतून तशीच राहीन! सकाळी सकाळी स्वत:तून बाहेर डोकावणारी! आणि संध्याकाळी अंतर्मूख होणारी!!”
हे ऐकल्यार ताई स्वच्छं काचेने हसली आणि म्हणाली,“उघडा,मिटा किंवा सरका पण स्वत:तून बाहेर डोकवा, हे ज्यांना जमलं त्यांनाच खरं जग दिसलं” ही चिनी म्हण तू ऐकलीच असशील की?”
हे ऐकताच पहिली समाधानाने हसली.
यातूनच दुसरी काय ते समजली!
-राजीव तांबे.
Leave a Reply