कंदाहार हा दक्षिण अफगाणिस्तानातला पहाडी प्रांत. या प्रांतातले पुरुष लढवय्ये आहेत आणि स्त्रिया सौंदर्यसंपन्न. कंदाहारी ‘पाश्तुन’ जमातीच्या अलिकडे झालेल्या डी. एन. ए. चाचण्यांवरून ते आर्यांचे वंशज असल्याचे आढळले आहे. आर्यांनी सुमारे 2300 वर्षापूर्वी या प्रदेशावर आक्रमण केले होते. तिथल्या पठाण कुटुंबात जन्मलेली एक मुलगी दिसायला खूप सुंदर होती. अकरा भावंडात पाचव्या नंबरची.
दिल्लीतल्या एका ज्योतिष्याने अताऊल्ला खानला सांगितलं होतं, ”तुझी पाचव्या नंबरची मुलगी खूप कीर्ती आणि संपत्ती मिळवणार आहे.” बस्, एवढ्या भविष्यवाणीच्या आधारावर खान साहेबांनी मुंबईचे तिकिट खरेदी केले.
पिताजी अताऊल्ला खान कंदाहारहून दिल्लीला आले होते. कुटुंबनिर्वाहासाठी घोडागाडी चालवत. आर्थिक परिस्थितीने खूप गरीब. एक दिवशी सर्व कुटुंब दिल्ली फलाटावरच्या आगगाडीत चढलं आणि थेट मुंबईला आलं.
प्रेमवेड्या मित्रांची रांग
पिताजी मालाड मधल्या बाँबे टॉकीज मध्ये आठ वर्षाच्या लेकीला आवाज परीक्षेसाठी घेऊन गेले. लगेचच एका चित्रपटात तिला काम मिळाले. तिच्या अभिनयावर आणि बाल सौंदर्यावर बेहद्द खूष होऊन देविकाराणीने तिचे नाव ठेवले – ‘मधुबाला’. 1942 मध्ये ‘बसंत’ नावाच्या चित्रपटात तिने पहिली भूमिका केली. नंतर काही चित्रपटात काम केल्यावर 1947 साली आणखी एका महान कलाकाराबरोबर तिला काम करण्याची संधी मिळाली. त्यांचे नाव होते, ‘राज कपूर’. या चित्रपटानंतर मधुबालेची विजयी दौड सुरु झाली. मात्र 1949 मध्ये एक अलौकिक घटना घडली. आख्या हिंदुस्तानाला आणि शेजारच्या देशांना जन्मभर भक्ती करायला दोन स्त्री-दैवते मिळाली, ‘महल’ चित्रपटातल्या ‘आयेगा आनेवाला’ या गीतानंतर, – ‘लता मंगेशकर आणि मधुबाला’.
असे म्हणतात, व्हॅलेंटाईन दिना दिवशी जन्मलेल्या स्त्रिया लावण्यसुंदर असतात. आणि पुरूषांना वेड लावतात. मधुबालेच्या बाबतीत नेमके हेच घडले. 13 फेब्रुवारी 1933 दिवशी जन्मलेल्या मधुबालेच्या प्रेमात अनेक पुरूष पडले. दिल्ली सोडताना तिने लतीफ या बालमित्राला एक लाल गुलाबाचे फूल भेट दिले होते. ते आय ए एस झाले. लतीफने तिच्यावर मरेपर्यंत प्रेम केले. गुलाबाचे फूल त्यांनी अखेरपर्यंत जतन करून ठेवले. किदार शर्मा या दिग्दर्शकांचा मधुबालेला पुढे आणण्यात मोठा वाटा होता. त्यांचे तिच्यावर प्रथम दर्शनीच प्रेम जडले. पण मधुबालेला लहान वयात त्यांच्या प्रीतीची बोली समजलीच नाही. ती मैत्री फार काळ टिकली नाही.
‘महल’ चित्रपट यशस्वी होण्याचे आणखी एक कारण म्हणजे, दिग्दर्शक कमाल अमरोही मधुबालेच्या प्रेमात पडले होते. मधुबालेची वेशभूषा, संवाद यावर ते तासन तास तिच्याजवळ चर्चा करत असत. ‘महल’ 1949 मध्ये प्रदर्शित झाल्यानंतरही दोघांच्या प्रेमाची गोष्ट चालूच होती. कमाल साहेबांना मधुबालेने आपल्याशी विवाह करावा असे खूप वाटे.
मधुबालेच्या पिताजींचीही मंजुरी होती. पण एक अडचण म्हणजे, कमाल साहेबांचा अगोदर विवाह झाला होता. त्यांना मुलेही होती. मधुबालेला त्यांच्या पत्नीसमवेत संसार मांडण्याची अजिबात इच्छा नव्हती आणि पहिल्या पत्नीला तलाक देण्याची कमाल साहेबांची तयारी नव्हती. मग मैत्री आपोआप तुटली.
लाल भडक गुलाबाचे फूल
‘बादल’ या चित्रपटात नायकाची भूमिका प्रेमनाथ यांनी केली होती. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी मधुबाला प्रेमनाथच्या मेकअप रूममधे गेली आणि लालभडक गुलाबाचे फूल त्यांना भेट दिले. फुलाबरोबर एक चिठ्ठीपण होती. चिठ्ठीत लिहिले होते, ”आपण माझ्यावर प्रेम करत असाल तर या फुलाचा स्वीकार करा. मी आवडत नसेल तर फूल परत दया … ” एका लावणयसुंदरीने अचानक केलेल्या प्रेमवर्षावामुळे प्रेमनाथ क्षणभर स्तंभित झाले. पण त्यांनी लगेचच ऐटीत ते फूल आपल्या बटन-होलमध्ये लावले. काही आठवडे त्यांची मैत्री टिकली. पण नंतर संपली. काही दिवसांनी प्रेमनाथांना अशोक कुमारकडून समजले, त्यांना पण लालभडक फुलाची भेट मिळाली होती. मग मात्र प्रेमनाथ संतापले आणि त्यांनी मधुबालेला कायमचा रामराम ठोकला.
तसे पाहिले तर दिलीपकुमार पण पठाणच होते. मधुबाला अवघी सतरा वर्षाची असल्यापासून त्यांच्या प्रेमात होती. मधुबालेचे ऐन उमेदीचे आणि धनसंपत्ती कमावण्याचे दिवस सुरू होत असतांना दिलीपसाब तिच्या आयुष्यामधे आले. पण दोघांच्यामधे एक भली मोठी भिंत होती,-मधुबालेच्या पिताजींची. त्यांना वाटले, एके दिवशी मधुबाला दिलीपसाबशी शादी करुन बसली तर संसाराकडे कोण बघणार? नुकताच मिळू लागलेल्या संपत्तीचा झरा अचानक आटून जाईल. म्हणून ते पडछायेप्रमाणे मागे राहू लागले. दरम्यान दिलीपसाबना पण लालभडक गुलाबाचे फूल भेट मिळाले होतेच.
बी आर चोप्रासाब 1957 साली एक महत्वाकांक्षी फिल्म बनविण्याच्या तयारीत होते. त्यासाठी दिलीप आणि मधुबालाबरोबरच्या कंत्राटावर सहया पण करुन झाल्या. फिल्मचे 40 दिवसांचे चित्रीकरण भोपाळला करायचे ठरत होते. याला पिताजींनी मोडता घातला आणि मधुबालेला परवानगी नाकारली. चोप्रांना स्टुडिओत चित्रीकरण अजिबात मंजूर नवहते. कंत्राट तुटले. प्रेमी युगलामधे तणाव वाढत होता. त्याच सुमारास आणखी एक महान कलाकार ”मांग के साथ तुम्हारा, मांग लिया संसार” या ‘नया दौर’ मधल्या अजरामर गीतासाठी साठी भोपाळमधे दिलीपसाबचा ”साथ” मागायला उत्सुक होती. तिचे नाव होते, वैजयंतीमाला. पिताजींनी चोप्रासाबवर कंत्राट तोडल्याबद्दल खटला लावला. चोप्रांनी मधुबालेवर उलट केस फिर्याद लावली. कटुता वाढत गेली. कोर्टाबाहेर समझोता झाला. पण 1951-58 सालातली मैत्री तुटली. दिलीपसाबनी नंतर भर कोर्टात एकदा सांगितले, ”मधुबालेवर मी मरेपर्यंत प्रेम करणार”!
एका वरळीकराचे प्रणयाराधन
1950 साली मधुबाला-दिलीप के. असीफ साबबरोबर एका कंत्राटाने आधीच बांधले गेले होते. फिल्मचे नाव होते, ‘मुगले आझम’. चित्रीकरण तब्बल 10 वर्षे चालले. मधल्या संघर्षामुळे दिलीप मधुबाला आता एकमेकाशी बोलत पण नव्हते. पण कॅमेरासमोर अनारकलीने सलीमवरच्य प्रेमाची अविसमरणीय अदाकारी पेश केली. ती एक अलौकीक कलावंत होती याचा हा चित्रपट पुरावा आहे. चित्रीकरण संपले. एका वैदयकीय तपासणीत आढळले, हृदयाला भोक असल्यामुळे मधुबालेला गंभीर स्वरूपाचा हृदयविकार जडला होता. डॉकटरांनी तिला सिने-व्यवसायातून निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला, त्यावेळी ती 28 वर्षाची होती.
झुल्फिकार भुत्तो त्यावेळी मुंबई हायकोर्टात वकिली करत. ते चक्क मधुबालेच्या प्रेमात पडले.
इकडे वरळीमधे राहणारा एकजण मधुबालेच्या प्रेमात पडला. नाव होते, झुल्फीकार भुत्तो. खरे राहणारे पाकिस्तानातले. बॅरीस्टर झाल्यानंतर 1950 च्या दशकात ते मुंबई हायकोर्टात वकिली करत. मधुबालेच्या सौंदर्याने ते अक्षरशः झपाटून गेले. मुगले आझमचे चित्रीकरण पाहण्यासाठी ते स्टुडिओत तासन् तास जाउन बसत. ”मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे” या गीताचे चित्रीकरण पाहतांना ते संपूर्ण घायाळ झाले. त्याच वेळेस ते मधुबालेला मागणी घालणार पण बेत बदलला. मधुबालेबरोबर शादी करण्याचा प्रस्ताव खरं तर अवघड होता. कारण झुल्फीकारजींचा आधीच विवाह झाला हाता, एकदा नाही दोनदा. पहिला विवाह झाला, ‘शिरीन बेगम’ या ‘लाकराना’ प्रांतातल्या एका धनाढ्य घरमालकाच्या मुलीशी दुसरा विवाह, ‘नसरत’ नावाच्या एका देखण्या इराणी मुलीशी. ही बेनिझीरची आई. मुंबईत असतांना त्यांच्या लाकराना-कराची अशा दुहेरी फेऱया चालू होत्या. मधुबालेशी मैत्री झाल्यावर फेऱया त्रिकाणी झाल्या. साहेबांनी राजकारणात उडी घेतल्यावर ही मैत्री संपली.
घरामधे विरोध होता तरीपण किशोरदाने मधुबालेला मागणी घातली.
कंदाहारचे आमंत्रण
मधुबालेला एका वेळी तिघांनी मागण्या घातल्या – भारत भूषण, प्रदीप कुमार आणि किशोर कुमार. नर्गीस दिदीने सल्ला दिला, ”बघ बाई, तुझे तूच ठरव. पण माझ्या दृष्टीने भारत भूषण बरा वाटतो”. ते त्यावेळी विधुर होते. पण दिदीचा सल्ला तिने मानला नाही. किशोरदाच्या बरोबर ‘चलती का नाम गाडी’ चित्रीत झाला होता. तिच्या प्रेमात किशोरदा संपूर्ण बुडून गेले होते. त्यांचे पहिले लग्न झाले होते. होणाऱया ससुरजीने त्यांना बजावले, ”मधुबालेवर लंडनच्या इस्पितळात शस्रक्रीया होणार आहे. परतल्यावर तुम्ही शादी करा”. पण किशोरदा थांबायला तयार नव्हते. 1960 साली शादी झाली. किशोरदांच्या उत्कट प्रेमाची ती ग्वाही होती.
वास्तव जगात मधुबालेला एका भल्या माणसाची पत्नी बनून आपला चिमुकला संसार थाटायचा होता. या ईर्ष्येने ती झपाटून गेली होती. तिला एकटेपणाची भयानक खंत वाटत असे. चंदेरी पडदयावर तिने उच्छृंख तरूणीची मादक व ऐटबाज प्रतिमा वेळोवेळी सादर केली. मात्र खाजगी आयुष्यात ती मनस्वी दुखी होती. हृदयविकारामुळे ती सतत मृत्यूच्या छायेत वावरत होती. तिला प्रचंड कीर्ती, प्रशंसा व धनदौलत प्राप्त झाली होती. पण ते सर्व क्षणभंगूर असल्याचे तिला जाणीव होती. या अवस्थेत ती कधी कधी विक्षिप्तपणे वागायची व मग तिला आवरणे जड जायचे. फक्त नऊ वर्षे संसार केल्यावर 1969 साली मधुबाला गेली. सांताक्रूजच्या दफनभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार झाले, तिने लिहिलेल्या दैनंदिनीसकट. या डायरीत तिने कुणालाही माहीत नसलेली स्वतःची खरी कहाणी लिहिली होती.
कंदाहारची माहेरवाशीण घरी आलीच नाही. ती अल्लाकडे गेली.
आतंकवादी तालिबान्यांच्या कारवायांचे कंदाहार केंद्र बनायला सुरूवात झाली होती. 1999 च्या इंडियन एअरलाईन विमान अपहरणाने कंदाहार कुप्रसिध्दीची कृष्ण-जंत्री आणखी काळी झाली. मधुबालेचे कुटुंब कंदाहारचे. कंदाहारकरांना तिचा केवढा अभिमान! तिने काही दिवस आपल्यात घालवावेत असे त्यांना वाटायचे. ते वाटेकडे डोळे लाऊन मनातली आस जागवत होते. पण शेवटी माहेरवाशीण कधीच कंदाहारला आली नाही. एके दिवशी बातमी आली, मधुबाला गेली.
— अरुण मोकाशी
खैबरखिंडीच्या पलिकडून
Leave a Reply