MENU
नवीन लेखन...

त्या डायरीतला बंदिस्त सैनिक……

विरहाची प्रत्येक रात्र आता रागिणीसाठी अजूनच मोठी झाली होती.  अचानक आलेल्या वादळाने एका क्षणातच तिचे संसाररुपी घरटे मोडून पडले. नचिकेतला जाऊन  आज चार महिने पूर्ण झाले होते.
त्याच्या आठवणीत ती स्तब्ध होवून बसलेली असतानाच दाराची बेल वाजल्याने ती भानावर आली. पाण्याने   भरलेले अन् गालांवरून ओघळणारे डोळ्यातील अश्रू  पुसत तीने दार उघडले. दाराच्या पलिकडे बँकेतील दोन कर्मचारी उभे होते. तिने त्यांना आतमध्ये बसण्यास सांगितले, ते नचिकेतचे काही चेकस् घेऊन आले होते, पण रागिनीला ते देण्यापूर्वी त्यांनी नचिकेतच्या काही कागदपत्रांची मागणी केली. ते आणण्यासाठी रागिणी बेडरूम मध्ये गेली, कपाटाच्या एका कप्प्यात तिला एक बॅग दिसली. कागपत्रांची शोधाशोध करतांना तिला नचिकेत ची एक मळकी जुनी डायरी सापडली.. कागदपत्र तिने बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिले आणि ते १ लाख रुपयांचा चेक देऊन निघून गेले.
रागिणी ती डायरी पाहून विचारात पडली, नचिकेत ने यापूर्वी तिला कधीच या डायरी बद्दल सांगितले नव्हते वा तिनेही कधी त्याच्या जवळ ती पाहिली नव्हती. त्या डायरीत काय लिहिलं असणार या विचाराने तिचं कामात लक्षच लागत नव्हतं. मनात कल्लोळ सुरू होता. स्वतःशीच पुटपुटत ती विचारात गुंतली होती. कसेबसे तिने काम आटोपले आणि डायरी घेऊन ती बेडवर बसली.
डायरीचे पहिले पान उलटताच त्यावर रागिणी आणि नचिकेतचा एक सुंदर फोटो लावलेला दिसला, ते पाहून रागिणी समोर जणू भूतकाळच उभा राहिला. नचिकेतने आपलं संपूर्ण आयुष्यच त्या डायरीत बंदिस्त करून ठेवल होतं.
……. (नचिकेत) आज पहिल्यांदाच मी रागिणीला माझ्या क्लासरूम मध्ये पाहिले.  उंच बांधा, लांब सडक केस, हरणी सारखे डोळे, गालावर पडणारी खळी अन् नदीच्या खळखळणाऱ्या पाण्यासारख तिचं हास्य मला घायाळ करून गेलं. पहिल्या क्षणातच रागिणी च्या रूपाने बेचैन होवून मी तिच्या प्रेमात पडलो. आता रात्रंदिवस तिचाच विचार सुरू होता. तिच्याशी कसे बोलावे या एकाच विचारात होतो. एक दिवस, अखेर केलं धाडस आणि तिच्याशी बोलायला गेलो खरा पण रागिणी ने एक कटाक्ष टाकताच माझी बोलतीच बंद झाली होती.  यावेळी दोघांच्याही नजरा मिळाल्या पण रागिणी ने लागलीच नजर खाली वळवली आणि  निघून गेली. एवढ्या रागात तर ती अजुनच सुंदर दिसत होती. दुसऱ्या दिवशीही क्लासरूम मध्ये आम्ही परत एकमेकांच्या समोर आलो तिने हळूच एक स्मितहास्य केलं. अर्थातच मी ही दिसायला रुबाबदारचं… रागिणीच्या ही नजरा लपून छपून मला शोधत होत्या. तीही माझ्या प्रेमरूपी समुद्रात बुडायला लागली होती. काही दिवसातच आम्ही दोघांनीही आपल्या प्रेमाची एकमेकांना कबुली दिली. कॉलेज संपल पण आमचं प्रेम अधिकच बहरत गेलं. या प्रेमाला लग्नाच्या रेशीम गाठीत गुंफून आम्हाला एक व्हायचं होत. आम्ही प्रेमात तर पडलो, मात्र संसार चालवायला दमडीही लागते हे लक्षात येताच नोकरीसाठी हात पाय मारायला सुरवात केली. नोकरीच्या शोधात असतानाच एकदिवस पेपर मध्ये सैन्यदलात मेगा भरतीची जाहिरात वाचली. आता आपण सैन्यात जाव असे मनोमन मी ठरवलं, रागिणीही माझ्या निर्णयाने खुश होती. रात्र दिवस एक करून मी जीव ओतून मेहनत घेतली. या मेहनतीचं फळ ही मला मिळालं. अखेर मी सैन्यात सामील झालो. सुरवातीची दोन वर्ष ट्रेनिंग संपवून सर्वांच्या सहमतीने रागिणीशी  लग्न केले. याच दिवसाची आम्ही दोघेही आतुरतेने वाट पाहत होतो.
लग्नाच्या आनंदाचे चार दिवस संपायचेच होते की, माझी बदली सियाचीनला झाली. जगातील सर्वाधिक उंच युद्धभूमी म्हणून सियाचीनला ओळखले जाते. सियाचीनचे नाव ऐकूनच कित्येकांच्या पायाखालची वाळू सरकते. या भयावह युद्धभूमीवर तैनात असणाऱ्या प्रत्येक सैनिकाला वेगवेगळ्या समस्येला रोजच समोर जाव लागतं. जीवन जगण्याची एक वेगळीच लढाई आम्हा प्रत्येक सैनिकाला लढावी लागते. शत्रुपेक्षा तर येथील वातावरणाशी आम्हाला रोज भांडावे लागते. येथे फक्त बर्फाने लादलेले पर्वत आणि अंग गोठवणारी थंडी. या ठिकाणी तैनात सैनिकांसारखे कठीण जीवन जगणे साध्या माणसाचे काम नव्हेच, ते तुमच्या कल्पनाशक्ती पलीकडेच आहे.  अशातच रागिणीला त्याठिकाणी घेऊन जाणे माझ्यासाठी शक्य तर सोडा साधा विचार ही करण्याची मला अनुमती नव्हती. यामुळे रागिणीचा हिरमोड झाला. शेवटी तो दिवस आलाच. तीन वर्षांसाठी मी भारत मातेच्या रक्षणासाठी सियाचीनच्या दिशेने निघालो. रागिणीला एकट सोडून जातांना मला खूप वेदना होत होत्या. पाणावलेल्या डोळ्यांनी रागिणीने निरोप दिला अन् सासू सासरे, नातेवाईकांच्या सेवेत स्वतःला झोकून दिले.
आमचा प्रेम विवाह होता. त्यामुळे आम्ही एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेत होतो. परंतु सियाचीनला गेल्यापासून रागिणीच्या स्वभावात फार बदल झाला होता. एरवी समजून घेणारी बायको आता मला समजूनच घेत नव्हती. कसातरी महिन्यातून एकदा तिच्याशी बोलायला जीवाचा आटापिटा करायचो परंतु रागिणी मात्र त्या तुटपुंज्या वेळेतही भांडण करायची.  मी रागिणीला बरेचदा समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती काही समजण्याच्या मनःस्थितीतच नव्हती. चौफेर बर्फाच्या डोंगरात शारीरिक आणि मानसिदृष्ट्या स्वतःला टिकवणे फार अवघड आहे.  हक्काची बायकोही माझ्यावर रुसली होती. मन मोकळं करायला आणि माझे गाऱ्हाणे ऐकायला जवळ होते ते फक्त कानाला बोचनारी थंडी हवा अन डोक्यावरील बर्फाची चादर… एकतर रोज वाटेत येणारी जीवघेणी आव्हाने आणि त्यात संसारात निर्माण होणारी पोकळी यामुळे मी पुरता दमलोय. रोज वेळ देवू शकत नसल्याने रागिणीने  फोन  उचलणे बंद केले. एका सैनिकाच आयुष्य सोप नसत, पण हे रागिणीला कळत नव्हते, तिच्या त्या अबोल्याने मी खचलो होतो.
रुसवे फुगवे करण्यातच तीन महिने निघून गेलेत. मी एक महिन्याच्या सुट्टीवर घरी आलो. आपल्या लोकांना भेटण्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.  येवढ्या दिवसानंतर आपल्या प्रेयसीला अर्थातच हक्काच्या बायकोला डोळे भरून बघणार होतो. परंतु रागिणीने अद्याप अबोला सोडला नव्हता. रागिणी मला सोबत घेवून चला या हट्टावर अडून बसली होती. वाघांच्या कळपात एखाद हरणाचं पिल्लू अडकल की कशी त्याची अवस्था होते तशीच माझ्या मनाची झाली होती. सियाचीन वर रोज जगण्यासाठी स्वतःशीच लढावं लागत हे तिला पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण तरीही रागिणीला समजण्यात रस नव्हता. एवढ्या दिवसानंतर आलेल्या नवऱ्याचे लाड पुरवावे हे सुध्दा तिला लक्षात नव्हते. सुट्टीवर येवून काही दिवसच झाले होते पण घरच्यांनी सहा महिन्यांपासून पेंडींग राहिलेल्या घराच्या कामात मला गुंतवले. माझ्या शरीराला आरामाची गरज होती, मात्र सर्वांना खुश करण्याच्या आनंदात स्वतःचे दुःख विसरून गेलो होतो. मी सियाचीनला कसा जगतोय याची साधी विचारपूस ही कोणी केली नाही. सुट्टीवर आल्याचे समजताच नातेवाइकांचे सारखे फोन… मी कसा आहे हे विचारायला नव्हे… तर आम्हाला कँटीनमधुन सामान हवे आहे यासाठी…. कधी आलास हा प्रश्न तर दूर पण तुम्ही परत कधी जाणार हाच प्रश्न आधी. माझ्या प्रकृतीची विचारपूस करण्याची तसदी ही कोणी घेतली नाही. कुठेतरी मनात खूप वाईट वाटले पण मी चेहऱ्यावर दिसू दिले नाही.  बनावटी हसू घेवून वावरत राहिलो. आम्हा सैनिकांना ही वेदना असतात हो, आम्ही ही तुमच्या सारखेच हाडामासानेच बनलेले आहोत, आमच्या डोळ्यातून ही अश्रू वाहतात फक्त पुसायला कोणी नसतं.
हळूहळू दिवस गेलेत अन् माझी सुट्टी ही संपली पण जाण्याची इच्छा नव्हती, नोकरी अशी की जाणे भागच होते, मी जाण्यासाठी निघालो, निरोप द्यायला घरची सगळी होती, पण रागिणी मात्र बेडरूमचे दार बंद करून बसली होती. तिचा पारा चढलेला होता. तिने मला निरोप दिला नाही.
एक वर्ष पूर्ण झाल पण यंदाच्या सुट्टीत काही महत्त्वाची कामे असल्याने मी सुट्टीवर येवू शकलो नाही. आज महिन्याभरानंतर मला घरी फोन करण्याची संधी मिळाली. रोज रागिणीची आठवण यायची पण नेटवर्क मुळे फोनच लागत नव्हता. आज मी मनमोकळ्या गप्पा मारणार या विचारानेच माझे मन खुश झाले होते…….पण रागिणी अद्याप रुसलेली च होती. मी फोन केला पण तिने वारंवार तो कट केला.
डायरीच्या शेवटच्या पानाचे हे अखेरचे शब्द वाचत रागिणीने हंबरडा फोडला… डायरी वाचताना रागिणीला तिच्या चुकांची जाणीव झाली होती. पण वेळ निघून गेली होती…  त्यांनी फोन केला त्याच्या दोन दिवसानंतर सियाचीन मध्ये हिमस्खलन झाल्याने बर्फाच्या ढिगाऱ्याखाली दबून नचिकेतचा मृत्यू झाला. देश सेवा करताना पुन्हा एक जवान शहीद झाला होता. नचिकेतच्या प्रेमाला समजायला तिला फार वेळ लागला. आनंद कुठल्याही दुकानात विकत मिळत नाही अथवा उधार मिळत नाही,  प्रत्येक लहान लहान क्षणात तो दडून बसलेला असतो त्याला फक्त शोधावे लागते, हेच समजवण्याचा नचिकेतने प्रयत्न केला होता मात्र तो अपूर्णच राहिला. नचिकेत आुष्यभरासाठी अबोला धरून वेगळ्याच जगात निघून गेला.
हे सगळं आठवून रागिणीच्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते.  तिला ग्लानी आल्यासारखे वाटत होते, आता आपल्याला ही काही जगण्याचा अर्थ नाही याला आपणच जबाबदार असल्याचा भास होत होता. मनोमन तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला…..पण तेवढ्यातच बेडवर झोपलेले बाळ दचकून जोरजोरात रडायला लागले. ( रागिणी ने नचिकेतला तो बाबा होणार हे सांगितलेच नव्हते. रुसव्या फुगव्यात तिने हा आनंद ही त्याच्या वाटेला येवू दिले नाही.)  रागिणीने बाळाला कवेत घेत त्याच्या सोबत आपल्याही अश्रूंना वाट मोकळी केली, अन् त्यांच्या संसार रुपी वेलीवर उगवलेले हे चिमुकले बाळ सोहमकडे पाहुन पुन्हा जगण्याचा निर्णय बदलला. आता सोहम मध्येच नचिकेत चे प्रतिबिंब पाहून ती जगणार होती.
टीप -: प्रेयसी असलेल्या बायकोने कधीच नचिकेतच्या मनाला समजून घेतले नाही. त्यामुळेच त्याने स्वतःचा भावना ऐका निर्जीव डायरीत जीवित करून ठेवल्या होत्या. रागिणी ने आज ही डायरी वाचल्यानंतर बंदिस्त(नचिकेत) एका सैनिकाची सुटका झाली. एक सैनिक हा फक्त कुटुंबाच्या प्रेमाचा भुकेला असतो, त्याच्या कर्तव्याला समजून घ्या आणि त्याला भरभरून प्रेम द्या…..

— सौ. शिल्पा पवन हाके

Avatar
About सौ. शिल्पा पवन हाके 6 Articles
'वाचाल, तर वाचाल'
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..