नवीन लेखन...

त्या दुर्दैवी जीवांना दया- मरण द्या

मी बरीच वर्षे मनोरुग्णालयांत वैद्यकीय अधिकारी म्हणून, मनोरुग्णाच्या सहवासांत घलविली आहेत.  ‘ मनोरुग्ण ‘ हा सर्वसामान्यजनांना विनोदाचा विषय असतो. हे एक कटू सत्य आहे. मनोरुग्णाकडे बघण्याचा मनोरंजनात्मक दृष्टीकोण सर्वसामान्यामध्ये आढळून येतो. तुम्ही वेड्याच्या सहवासांत आहात, तुम्हाला कोणता त्रास होतो कां ?  तुम्हाला त्याची भिती वाटते कां ? ते दगड मारतात कां ?  गाणी म्हणतात कां ? नाचतात कां, ते नाचत असताना करमणूक होत असेल ना ?  त्यांची असंबद्ध भाषा ऐकून तुम्हाला गम्मत वाटत असेल नाही का ? कुणी स्वतःला श्रीमंत समजत तर कुणी अधीकारी वा नेता समजून तशा पद्धतीने हातवारे करुन बोलत असेल ? कुणी रडत असेल तर कुणी हसत असेल ? कुणी तासंतास एकाच ठिकाणी हलचाल न करता बसलेला असेल ?  कुणी अंगावरचे कपडे काढून फेकून देत असेल नाही का  ? कितीतरी वैचित्रपूर्ण वागण्याचे नमुने दिसत असतील ना ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न विचारुन माहीती घेणारे अनेक भेटतात. आम्हाला पण एकदा मेंटल हॉस्पिटल बघावयाचे आहे. मिळेल कां त्यासाठी परवानगी ? इत्यादी. ह्या सर्व चौकश्यामध्ये जे दिसून येते ती केवल करमणूक, विनोद, मनोरंजनाची भावना. बंदीस्त झालेल्या प्राणी वा पक्षांच्या संग्रहालयाप्रमाणे.

त्यांचा काय दोष ?  

दुर्दैवैने आणि नशीबाने त्यांच्यावर  ‘ मनोरुग्ण ‘ ?  होण्याची पाळी आणली आहे. नियतीच्या खेळाला बळी पडलेली ही मंडळी आहेत. ह्यांचा ह्यात काय दोष असेल ? गुन्हा असेल ? हे एक निसर्गालाच माहीत. कारण कुणीही मनोरुग्ण होऊ शकतो. कदाचित् सभोवतालच्या परिस्थितीमुळे मानसिक संतूलन बिघडलेल्या व्यक्तीला, ती परिस्थिती हानीकारक म्हणून बोट दाखविता येईल व तो योग्य प्रकारे सामना करु न शकल्यामुळे दोष देता येईल. परंतु कित्येक मनोरुग्णाच्या माहीतीनुसार त्याच्या जन्माच्या वेळची परिस्थिती, आई वडीलातील वा अनुवंशीक दुर्गुण, रक्तातील गुणदोष इत्यादी प्रामुख्याने कारणीभुत असलेले दिसतात. त्यावेळी ह्या रुग्णाबद्दल एक वेगळीच भावना येते की, ह्यात त्या रुग्णाचा स्वतःचा कोणता गुन्हा की ज्यामुळे त्याच्या नशिबी  ‘मनोरुग्ण’ होण्याचे आले आहे. ?  परंतु सामान्य माणसे मनोरुग्णाच्या, त्यांच्या मनोरुग्ण होण्याच्या कारणमिमांसेविषयी, परिस्थितीविषयी कुणीही फारसे खोलांत जाऊन तसदी घेत नाही. खरे म्हणजे त्यावर होणाऱ्या नैसर्गिक कोपाबद्दल कुणीही सहानुभूतीने विचार करीत असल्याचे दिसून आले नाही.

अर्थात ज्याच्या नात्यागोत्यामधली व्यक्ती मनोरुग्ण असेल व त्याना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रितीने मनोरुग्णाचा मानसिक वा शारीरिक त्रास होतो, त्यांची मात्र मनोरुग्णाकडे बघण्याची द्दष्टी निराळी असते. ज्याचे ‘ जळते त्यानाच कळते ‘ ह्या उक्ती प्रमाणे ते मनोरुग्णाकडे सहनुभूतीने बघतात. त्यांच्याविषयी चौकशी करतात. अशा रुग्णाच्या उपचारासाठी व आरोग्यासाठी ते उत्सुक असतात. ह्यात शंकाच नाही.

आजकाल बऱ्याच सामाजिक संस्था, समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती निरनीराळ्या सामाजीक समस्यांकडे आपली शक्ती, कौश्यल्याचा वापर आणि सहानुभूती व्यक्त करतात. जसे कुटूंब कल्याण, बाल कल्याण, वृद्धाश्रम, अंध व्यक्ती, अपंग, अंधश्रद्धा निर्मुलन, व्यसनमुक्ती, एड्स विषयी जाण निर्माण करणे, स्त्रियांवरील अत्याचार, इत्यदी समस्यांचा सामाजीक संस्था अभ्यास करुन त्याबद्दल निरनीराळ्या प्रचार माध्यमाद्वारे सर्व नागरिकांना त्याची माहीती देतात. चर्चासत्र होऊन सहानुभूतीपूर्वक मदत करतात. मात्र दुर्दैवाने अशा पद्धतीने मनोरुग्णाबद्दल लोकजागृती करण्याचे प्रयत्न क्वचितच दिसून येतात.

सहानुभीतीची गरज.

ज्या कुटूंबात दुर्दैवाने एखादा मनोरुग्ण असेल, त्याचा त्या कुटूंबाला त्रास तर होतोच. परंतु सर्व शेजारी पण त्याच्या विषयी त्रस्त झाल्याची भावना व्यक्त करतात. त्याला कुणाचीच सहानुभूती मिळत नाही. अशा मनोरुग्णास कसेही करुन त्या वातावरणातून काढून मनोरुग्णालयांत दाखल करण्याचा प्रचत्न होतो. ह्याचा अर्थ त्या मनोरुग्णाच्या विक्षिप्त वागण्याकडे दुर्लक्ष करुन त्याला घरीच ठेवावे असे नाही. परंतु त्याच्या आजाराकडे इतर आजारा प्रमाणे बघीतले जात नाही. एक ब्याद म्हणून समजले जाते. शिवाय अशा मनोरुग्णाला मनोरुग्णालयांत दाखल केले की, संबंधित नातेवाईकापैकी बहूतेक मंडळी त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करतात. त्याच्या भेटीस येण्याचे टाळतात. तो बरा होत असेल व त्याला घरी नेण्यास सांगीतले तरी कित्येकजण ते टाळतात असे दिसते. मनोरुग्णास उपेक्षित वागणूक दिल्याचे जाणवते. ह्या प्रक्रियेमध्ये कोणतीही सामाजिक संस्था भाग घेऊन मनोरुग्णाच्या पुनर्वसनाकडे फारसे लक्ष देत असल्याचे दिसून येत नाही. हे चित्र निश्चितच निराशजनक आहे.

मनोरुग्णाचे प्रकार      

मनोरुग्णालयांत येणाऱ्या रुग्णांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे रोगी आलेले दिसतात. १) कांही रोगी येतात. उपचारानी बरे होतात व पुन्हा समाजात कार्याकत होतात. २) कांही रोगी अल्पकाळासाठी बाहेर चांगले राहू शकतात. परंतु पुन्हा आपले मानसिक संतुलन बिघडल्यामुळे मनोरुग्णालयांत येतात. ठराविक काळानंतर त्यांचे येणे जाणे चालूच असते.   तिसऱ्या प्रकारातील रुग्णामध्ये बुद्धीची वा मेंदूची जन्मापासूनच परिपूर्णता नसते. आजच्या घडीला असलेल्या उपचारपद्धती त्यांच्यात मुळीच सुधारणा करु शकत नाही. असे मनोरुग्ण हे मनोरुग्णालयांत वर्षानुवर्षे जगत असलेले दिसतात. ह्या वर्गामध्ये असलेल्या रुग्णाची संख्यापण बरीच आहे. कित्येकजण तर २०ते ३५ वर्षे ह्या रुग्णालयांत आहेत. कुणी तरी त्यांना येथे आणून सोडले. कुणाही त्याना बघण्यासाठी येत नाही. त्याना आणताना दिलेल्या पत्यावर कुणीही मिळत नाही. कित्येकजण वेडे, अज्ञानी, न बोलणारे, रस्त्यावर पडलेले, अशा कितीतरी वेगवेगळ्या परिस्थीतीत, लहान वयांत पोलिसानी आणलेले, रुग्ण आहेत की ज्यांचा ठावठिकाणा नाही. मग त्याना कोण बघणार. त्याना कुणाकडे सोडले जाणार. ही सर्वजण मंडळी गरीब आहेत म्हणून नव्हे, तर ते मनोरुग्ण आहेत म्हणून. आज तरी अशा असंख्य रुग्णाना सरकार आसरा देत आहे. येथे मानसिक रोगतज्ञ आहेत. वैद्यकीय मंडळी आहेत. परिचारक वा परिचारीका, आणि इतर सेवक मंडळी आहेत.

सारेजण आपल्या शक्ति व कर्तव्यानुसार  काळजी घेतात. त्या सर्व मनोरुग्णाना जगवितात. म्हणूनच आज कांहीजण ३० वर्षापेक्षाही जास्त काळ मनोरुग्णालयांत रुग्ण म्हणून जीवन जगत आहेत. त्यांच्या शारीरिक प्रकृतीची, खाण्यापिण्याची, इतर नैसर्गिक विधींची काळजी घेतली जाते. आणि म्हणून हे रुग्ण जीवन जगत आहेत.

भयानक वातावरण   

मी येथे उल्लेख करीत असलेल्या माझ्या विचाराला प्रथम समजा. ते खो़डण्यापूर्वी, टिकात्मक दृष्टीकोण घेण्यापूर्वी,  सहानुभूती, भूतदया इत्यादी उच्यप्रतीच्या मुल्याधिष्टीत भावनिक विचार करण्यापूर्वी त्यांच्या जीवनाचा अभ्यास करा.  त्या विरोधक व्यक्तीनी मला प्रत्यक्ष भेटून मनोरुग्णालयातील त्या मनोरुग्णाच्या सहवासांत अल्पसा काळ घालवून स्वतः हे जाणून घेऊन मगच माझा विचार योग्य आहे कां हे ठरवावे. मी हे त्या रुग्णाबद्दल बोलतो ज्यांची परिस्थिती जनावरापेक्षाही वाईट आहे. त्याना फक्त मानव म्हणावे लागते कारण ते माणूस म्हणून जन्मले आहेत. त्यांच्यात बुद्धीचा भाग मुळीच नसल्याप्रमाणे असतो. त्याना भावना विचार इत्यादी असतात हे समजण्यापलीकडचे असते. कित्येकजणाना तर पाणी पाजावे लागते. जेवण चक्क भरवावे लागते. पाणी वा जेवण जरी समोर ठेवले तरी ते घेणार नाहीत. दिले तर ते सांडून देतील. अंगावर कपडे ठेवणार नाहीत. कुठेही संडास लघवी करतील. सारे शरीर बरबटून घेतील. जनावराप्रमाणे दुसरा रोगी ते चाटेलही. कोठेही ओकतील. झोपतील. बैल म्हशींच्या गोठ्यांत चांगले वातावरण अशू शकेल, इतके भयानक वातावरण ह्या रोग्यांच्या सहवासांत असते. ह्याचा अर्थ त्यांच्याकडे मनोरुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष होत असेल असे नाही. अशा रोग्यासाठी चार चार कर्मचारी एका एका वॉर्डत असतात.  रोग्याना खाऊ-जेऊ घातले जाते. नियमित वेळवर पाणी दिले जाते. स्वच्छता राखली जाते. स्नान घातले जाते. कपडे बदलले जातात. ज्याप्रमाणे आई आपल्या लहान मुलाचे सर्व कांही करते,त्याप्रमामेच येथील कर्मचारी रुग्णासाठी सर्व ते करीत असतात. येथे रुग्णाच्या शारिरीक वाढीचा प्रश्नच उदभवत नाही. परंतु ते मेंदूच्या विकारांनी त्रस्त आहेत. एक कधीही बरी न होणारी नैसर्गिक व्याधी. ते आहेत तसेच जगणार. एका कष्टमय, भयानक विकलांग परिस्थितीमध्ये जीवन कंठणार. फक्त अन्न-पाणी मिळते म्हणून जगणार. ह्या पलीकडे कोणतेही सत्य द्दष्टीक्षेपांत नाही.

केवळ भोग भोगणे हेच जीवन

जेंव्हा असल्या संपूर्ण वाया गेलेल्या रुग्णांना वा बऱ्या होऊ न शकणाऱ्या रुग्णाकडे बघीतले जाते तेंव्हा विचार पडतो की, ह्यांचे जीवन कशासाठी ? हे केवळ मनुष्य आहेत म्हणून ? त्याना कायद्याने कुणी मारु शकत नाही म्हणून ? नरकवास भोगणाऱ्या ह्या मानवाकडे वेगळ्या भुमिकेतून कुणी बघणार नाही कां ? त्यांच्या पोटांत दुखत असेल, त्यांना असंख्य वेदना होत असतील, तर कळण्यास मार्ग नाही. ते आपले दुःख व्यक्त करण्यास पूर्णपणे असमर्थ आहेत. केवळ भोगणे हेच त्यांच्या नशीबी आलेले दिसते. एक अत्यंत असमाधानी, भयावह, आणि ज्याची उकल करण्याची शक्ती कुणांत नाही, अशी ही परिस्थिती. त्यांच्या ह्या नर्क यातना त्यांच्या मृत्युमुळेच सुटलेल्या आम्ही बघतो.

स्वतंत्र यंत्रणा असावी

आपण सारी सुसंकृत, शिक्षित आणि समाज मुल्यांची जाण असलेली माणसे आहोत. ह्या अशा दुर्दैवी व्यक्तीसाठी दयामरण  हेच आजच्या घडीला उत्तर आहे. त्याचा प्रत्येकाने विचार करावा. सरकारने अशा दुर्दैवी जीवांची सुटका भूतदया ह्या जाणिवेमधून करावी. अशासाठी एखादी स्वतंत्र यंत्रणा असावी. ज्यामध्ये मानसोपचार तज्ञ, उच्य न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी, प्रतिष्ठीत बुद्धीवादी नागरीक, समाजसेवक इत्यादींचा समावेश असावा. सर्वानी स्वतंत्रपणे अभ्यास करुन आपला अहवाल सादर करावा. दयामरण मान्य करण्याचे त्यानुसार ठरवावे. केवळ विरोधासाठी विरोध करु नये. असा खऱ्या दुर्दैवी व्यक्तीची मुक्तता ही त्यांच्या आत्म्याला मुक्त केल्या सारखे ठरेल.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..