त्या काजळ रात्री
पाऊस बरसत होता,
घन व्याकुळ मी अशी
श्वास तो कोंडत होता..
आरक्त डोळ्यांत अश्रूंचा
बांध आल्हाद साचला होता,
पापणी आड अश्रूंचा थेंब
मिटून हलकेच डोळ्यांत होता..
कळले होते मला अंतिम
श्वास माझे त्या वळणावरी,
जाणार हा देह सोडून
लांब दूर जग हे सोडुनी..
परी मन तयार न होते
त्या अंतिम कातर क्षणी,
देव देतो जन्म अन मृत्यू
ऋणानुबंध असतात उरुनी..
किती आठवणीत जीव
व्याकुळ भावुक होतो,
जाणारा अचानक जातो
जीव दुःखात हलकेच बुडतो..
जगरहाटी ही न चुकली
कुणाला जन्माला येउनी,
मरणं आहे अंतिम खरे
सत्य न चुकले कुणाला कधी..
मरणं वाटेवर ह्या असेल
मी ही अनामिक उभी,
कधी जाईल जीव क्षणात माझा
उरतील माघारी शब्दांची कहाणी..
ध्यास असतो शब्दांचा
कवी असतो काव्य जगुनी,
जन्म मरणाच्या फेऱ्यात या
काव्य राहते ओळख कवीची..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply