नवीन लेखन...

‘त्या’ पराभवानंतर भारतीय संघ कुठे होता?

पुण्यातील पहिली-वहिली कसोटी अवघ्या अडीच दिवसांतच संपली. भारतीय संघाचा विजयरथ ऑस्ट्रेलियाने रोखला. गेले 18 महिने यशाची विविध शिखरे पादाक्रांत करणाऱ्या भारतीय संघाचे उडू पाहणारे विमान या भयानक पराभवामुळे खाडकन जमिनीवर उतरले. पण पाच दिवसांचा सामना तिसऱ्याच दिवशी आटोपल्याने दोन्ही संघांची मैदानाबाहेर गडबड झाली.

पुढील कसोटी सामना बंगळूरला आहे. या सामन्यासाठी 28 फेब्रुवारी रोजी दोन्ही संघ प्रवास करणार होते. त्यामुळे ‘दोन दिवस पुण्यात करायचं काय’ असा प्रश्‍न संघ व्यवस्थापनासमोर उभा राहिला. सततच्या क्रिकेटमुळे भारतीय संघ शरीराबरोबरच मनानेही थकला होता. त्यातून, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाच्या दणक्‍यामुळे निराशेचे ढग पसरत होते. चाणाक्ष अनिल कुंबळे यांनी संभाव्य धोका ओळखला. पुण्यातील दोन खास विश्‍वासातील मित्रांना बोलावून दोन दिवस संघासाठी काही उपक्रम करण्याचा विचार कुंबळे यांनी बोलून दाखविला. या मित्रांनी सुचविलेला उपाय कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांनी मान्य केला आणि मग योजना पक्की झाली..

26 फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता संपूर्ण भारतीय संघ आणि सर्व सपोर्ट स्टाफ बसमध्ये बसले. रविवार असल्याने हिंजवडी परिसरात अजिबात गर्दी नव्हती. हिंजवडीतून मागच्या रस्त्याने बस मुळशी रस्त्याला लागली. मुळशी धरण पार करून बस ताम्हिणी घाटाकडे निघाली. कुंबळे यांच्या मित्राने ताम्हिणी घाटाच्या अलीकडे असलेल्या ‘गरुड माची’च्या व्यवस्थापनाला या कार्यक्रमाची कल्पना दिली होती. ‘कुणीतरी खास व्यक्ती येत आहेत’ असं ‘गरुड माची’च्या कर्मचाऱ्यांना कळलं होतं. प्रत्यक्षात सगळा भारतीय संघच इथे अवतरला. संचालक वसंत वसंत लिमये यांच्या कडक सूचनांनुसार, ‘गरुड माची’च्या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापले मोबाईल फोन बंद करून ठेवले. ‘गरुड माची’च्या व्यवस्थापकांनी अत्यंत चोख व्यवस्था आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे गोपनीयता बाळगली होती.

संध्याकाळी सह्य्राद्रीच्या कुशीत विसावणारा सूर्य पाहताना खेळाडू मनोमन शांत झाले. सूर्यास्तानंतर अंधाराचे राज्य चालू झाले. मिलिंद कीर्तने आणि सुरेंद्र चव्हाण यांनी खेळाडूंसाठी मजेदार ‘ट्रेजर हंट’चे आयोजन केले होते. हातात कंपास, टॉर्च आणि नकाशे घेऊन लपवलेल्या गोष्टी मिट्ट अंधारात शोधून काढण्यात दोन तास मस्त धमाल झाली. रात्रीचे जेवण चांदण्यात झाले. खेळाडूंच्या आहाराची काळजी लक्षात घेतच जेवण तयार केले होते.

दुसऱ्या दिवशी बरोबर सकाळी सात वाजता महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण यांच्यासोबत सगळे जण ताम्हिणीतील ‘कॅमल बॅक’वर ट्रेकिंगसाठी निघाले. डोके चालवत सुरेंद्र यांनी तिरंगा बरोबर घेतला होता. एका तासाच्या चढाईनंतर सगळे घाट माथ्याला पोचले, तेव्हा पहाटेच्या कोवळ्या सूर्य प्रकाशातील दऱ्याखोऱ्या बघण्यात सगळे रमले. बऱ्याच खेळाडूंनी तिथेच बरेच फोटो काढले. भारतीय खेळाडूंनी सुरेंद्र चव्हाण यांना ‘हिमालयातील भटकंती आणि एव्हरेस्ट मोहिमेविषयी’ प्रश्‍न विचारून भंडावून सोडले. टेकडीच्या माथ्यावर ताठ मानेने तिरंगा फडकावून त्याला घामेजलेल्या खेळाडूंनी सॅल्यूट केला.

थकलेल्या अवस्थेत परतल्यानंतर सगळेजण ब्रेक-फास्टवर तुटून पडले. एक संपूर्ण दिवस इथे घालवला, तरीही कुणाचाही पाय ‘गरुड माची’च्या कॅम्प साईटवरून निघत नव्हता. ‘बऱ्याच दिवसांनी मोकळ्या आकाशाखाली हुंदडायला मिळाले. सह्याद्रीच्या सौंदर्याने आम्ही हरखूनच गेलो..’, अशी भावना एका खेळाडूने व्यक्त केली.

काही काळ खेळापासून लांब जाऊन मनाने ताजेतवाने होण्यासाठी कोहली आणि कुंबळे यांनी हा खटाटोप केला होता. याचा प्रत्यक्षात खूपच चांगला परिणाम झाला. 24 तासांच्या मजेदार सहलीनंतर सगळे जण ताजेतवाने झाले. चेहऱ्यावरची निराशा नाहीशी झाली होती. गेले 18 महिने भारतीय संघ अव्याहत क्रिकेट खेळत आहे. यामुळे सगळेच जण थकले होते. ‘गरुड माची’ची सहल गोपनीय राखण्यात यश आल्याने खेळाडूंना कोणताही त्रास झाला नाही. येथील व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना कसलाही त्रास दिला नाही किंवा फोटो काढण्याचा हट्टही धरला नाही. त्यामुळे खेळाडूंना मनसोक्त दंगा करता आला.

अखेरीस खेळाडू इतके खुश झाले, की त्यांनीच कर्मचाऱ्यांना बोलावून फोटो काढले. इतकेच नाही, तर खास प्रशस्तिपत्रकही बहाल केले. मंगळवारी सायंकाळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार दुसऱ्या कसोटीसाठी खेळाडू बंगळूरला रवाना झाले.

सुनंदन लेले

Avatar
About Guest Author 525 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

1 Comment on ‘त्या’ पराभवानंतर भारतीय संघ कुठे होता?

  1. आणि कुम्बळे व त्यांच्या मित्रांचा हा सगळा खटाटोप बन्गळुरु कसोटी अतीतटीने जिंकण्यास नाक्किच सत्कारणी लागला !! ह्यालाच अनुसरुन संघ विजयी झाल्यावर सुद्धा एखाद्या अनाथाश्रम वा उपेक्षित वर्गास मदत करणार्या संस्थेस भेट देउन खेळाडुंना देशातील \’नाही आहेरे\’ जनतेची वास्तव जाणिव करुन दिल्यास त्यांचे पाय सदैव जमिनिवरच रहातील.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..