त्या तिथे पलिकडे तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे
वळणावर आंब्याचे झाड वाकडे
प्रियेचा किती छान पत्ता सांगितला आहे त्या रसिक प्रियकराने, वा वा! सुंदर! तुला रस्त्यात पारिजातकाचा सडा पडलेला दिसला की तिथून डावीकडे वळ, पुढे नदीच्या किनाऱ्यावर केवड्याचा सुवास येईल, तिथे वेढा घालून बसलेल्या नागिणीला विचार, ती तुला माझ्या घराचा पत्ता सांगेल. किंवा वसंतात घरी येणाऱ्या प्रियकराला तू पहाटे पहाटेच तिथे पोहोच, सकाळी मोगरा तुला माझ्या घरी ओढून घेऊन येईल.
पत्ता सांगताना ऋतू प्रमाणेही तो बदलतो, संस्कृत साहित्यामध्ये असे अनेक साहित्यिक चमत्कार बघायला मिळतात. प्रेमात धुंद झालेली प्रिया आपल्या प्रियकराला आपल्या घराचा पत्ता सांगताना कदाचित, रातरणीची जाई जुईची खूण सांगेल. मुघल लिटरेचर मध्ये मात्र असे प्रसंग आढळून येत नाहीत, हे असे अधीरतेने चाललेले कोर्टिंग आढळून येत नाही. तिकडे सुरवात थेट बारादरीमध्ये झालेल्या भेटीपासूनच होते. ती तिथे कशी आली हा काळा कुट्ट इतिहास सोयिस्करपणे इतिहासापासून लपवलेला असतो.
तू सकाळी लवकर येशील तेव्हा कोकिळा तिच्या संगीताने तुझे स्वागत करेल आणि तिच्या साथीला बुलबुल दयाळ चिमण्या त्या संगीतात रंग भरत असतील, तीच माझ्या घराची खूण आहे हे ओळख, असे एखादी देवयानी कचाला सांगून भेटीची ओढ लावून ठेवतही असेल.
इकडे मात्र प्रेयसी शहजाद्याला आवडेल ते ड्रेस त्याच्या आवडीची अत्तरं आणि आकर्षक केशरचना करून उतावीळ होऊन बसलेल्या त्या सत्ताधाऱ्याच्या भेटीला लाजत मुरडत पुढे पुढे जाते. इकडे अभिनय आहे, भौतिक आकर्षण आहे, सेवा आहे, लीनता आहे. तिकडे अभिनय नाही, मनाची उत्कटता आहे, स्वखुशी आहे, एकमेकांच्या आवडीनिवडीचा विचार आहे, आणि रसिकता आहे. अशी साहित्यिक वर्णनं वाचताना माझ्या अंगावर सर्रकन काटा येतो.
मी जर माझ्या प्रेयसीला असा रसिकतेने माझा पुणे महापालिकेतील पत्ता द्यायचा ठरवला तर कसा देता येईल? असा स्वाभाविक विचार माझ्या मनात येऊन गेला.
प्रिये तू स्टेशनपासून तुझ्या स्कुटर वरून निघालीस की कुठल्या दिशेने जायचे? या विषयी तुझे कन्फ्युजन होईल. रस्ते कुठे जातात आणि कोणत्या रस्त्याला सध्या वन वे आहे? हे सांगण्याचं कंत्राट महापालिकेने गुगल मॅप्सला दिलेलं असल्याने ते पाट्यांवर आजिबात खर्च करीत नाहीत आणि तुला दुचाकी वर बसून हेल्मेट घालून गुगल मॅप बघता येत नाही, हि मोठीच अडचण तुला होऊ शकते. प्रिये तू गुगल मॅप्स बघत बघत थोडीशी जरी पुढे गेलीस तरी महापालिकेने कानाकोपऱ्यावर ट्रॅफिक पोलिसांची योजना केलेली आहे, ते तुला फटक्यात पाचशेचं चलन देऊन वसूली करतील. प्रिये महापालिका आणि ट्रॅफिक पोलिसांची अशीच समजूत असते की त्यांच्या एम्प्लॉईज प्रमाणेच सर्व नागरिकांना लोकांची अडवाअडवी करून प्रचंड धनलाभ होत असतो, त्या धनाचा लाभ उठविण्यासाठी त्यांनी पुण्यात ट्रॅफिक पोलिसांची योजना केली आहे. ट्रॅफिक फ्लो बॉम्बललं तरीही चालेल पण वसूली मात्र भरमसाठच हवी अशा तत्वाने महापालिका काम करते, हे तू विसरू नकोस. मी सांगतो त्या सूचना तू पाळत पुढे आलीस तर संध्याकाळी पर्यंत तू नक्कीच माझ्या घरी पोहोचशील यात शंका नाही. प्रिये ज्या दिशेला वन वेच्या चढावर एक उंचच उंच स्पीडब्रेकर तुला दिसेल, त्या उंच स्पीड ब्रेकर वरून तू न हडबडता पुढे ये, कदाचित पहिले चाक तू प्रयासाने पुढे नेऊ शकशील पण दुसरे चाक नेताना तुला कदाचित उतरून गाडी ढकलतच पुढे यावे लागेल. तिथून पुढे आलीस की उतार सुरू होतो, त्या उताराच्या शेवटी एक असाच टंण्णू स्पीडब्रेकर तुला दिसेल, तुझी गाडी उतारावर वेगात असल्यामुळे शॉक अबसोरबर्स चेक करण्याच्या दृष्टीने तो बसवलेला आहे, त्याला लगेचच लागून एक ट्रेंच खोदून त्याचे अंतर्वक्र डांबरीकरण केलेले आहे, इथे तू हमखास पडशील आणि तुला हेल्मेटचे महत्व लक्षात येईल. प्रिये तिथून सरळ पुढे आलीस की रस्त्यात छोटे छोटे पाईप ठेवल्या प्रमाणे डांबराचे स्पीडब्रेकर तुला लागतील, त्या स्पीडब्रेकर पेक्षा त्या दोन स्पीडब्रेकर मध्ये पडलेल्या खड्ड्यांना सांभाळत पुढे येणे हे महादिव्य काम आहे. पुढे तुला सिग्नल लागेल, त्या सिग्नलला ट्रॅपिझोईडल आकाराचा स्पीड ब्रेकर आहे, त्याच्या चढावर आणि उतारावरही खड्डे आहेत. त्या स्पीडब्रेकर वरून येताना तुला तुझी स्कुटर रस्त्याला काटकोनात करावी लागेल, जर तू सरळ निघून जाण्याचा विचार केल्यास तर, तुझे पुढचे चाक पुढच्या उतारावर मागचे चाक मागच्या उतारावर आणि गाडीचे खालचे पोट स्पीडब्रेकर वर आपटून अनर्थ होण्याची शक्यता आहे. हाच सिग्नल संपला की दोन टण्णू स्पीडब्रेकर एकमेकांना लागून पसरलेले आहेत, त्यांच्यवरून कसे पुढे यायचे ते तुझे तुलाच ठरवावे लागेल. तिकडून सुरक्षित पुढे निघालीस की रेन वॉटर ड्रेन मध्ये गाडी दणकून आपटते, तुझ्या तोंडून ओह मेले, असा उच्चार आपोआपच येईल.
त्या खड्डयातून बाहेर आलीस की दोन छोटे उगीचच केलेले स्पीड ब्रेकर क्रॉस केले की डावीकडे वळ, वळली रे वळलीस की तिथेच ड्रेनेजचे एक चेंबर चांगले रस्त्यापासून सहा इंच उचललेले आहे, त्यावर गाडीचे चाक धडकून तुला कदाचित व्हॉल्व्ह बदलायला लागू शकतो. तू न बिचकता अंगावर येणाऱ्या ट्रॅफिककडे दुर्लक्ष करत करत तशीच पुढे ये, इथे दोन ट्रॅपिझोईडल स्पीडब्रेकरच्या डोक्यावर तुला साधे स्पीडब्रेकर लावलेले दुसतील, ते हिकमतीने पार करून पुढे ये. रस्त्यात तीन ठिकाणी खोदलेले रस्ते तसेच अंतर्वक्र काँक्रीटिंग करून त्याचे उलटे स्पीडब्रेकर करून चालकांची परीक्षा घेतलेली आहे, तिथेच तुला काँक्रिटचे रस्ते पेव्हर ब्लॉक लावून रिपेयर केल्याचे दिसेल, ते ब्लॉक्स भरपूर खचलेले आहेत, त्यातून चलाखीने पुढे आलीस की तुझी कोणतीतरी ट्रॅफिकची चूक काढून तुझ्याकडून पाचशे तरी कमीतकमी वसूल केले जातातच. तिथेच तू उजवीकडे वळून हळूहळू सरळ आलीस की मी दारातच स्ट्रेचर घेऊन तुझी वाट पहात उभा असेन. तू सावकाश ये, शहजाद्या सारखा मी उतावीळ नाही, तू आज पोहोचलीस तरी मी खूप खुश होईन, प्रेम करायला सगळा जन्म बाकी आहे. फक्त पालिकेच्या रस्त्यावरून सहीसलामत घरी येणे महत्वाचे आहे.
हि लोकशाही सामान्य माणसाला रसिक होण्यासाठी वेळच मिळू देत नाही.
आमेन.
–विनय भालेराव.
Leave a Reply