सध्या तुफान व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल…
लाकडी खाटेवर बसलेला एक पाच वर्षांचा लहानगा विडी ओढत आहे , असा ती व्हिडीओ आहे. बघायला गमतीशीर आहे तो. अगदी मोठ्या माणसासारखा बसलाय पायावर पाय टाकून. दोन बोटांत विडी. मधूनच तो झुरके मारतोय. धूर सोडतोय. दोन झुरक्यांच्या मधल्या काळात , विश्वाची चिंता लागावी आणि ती डोळ्यातून व्यक्त व्हावी , तसे हावभाव.
मध्येच बेफिकीरीनं सगळीकडे पाहणं. खूपच गमतीशीर. मी तर तो व्हिडीओ चारपाच वेळा पाहिला. प्रत्येकवेळी मला काहीतरी वेगळं जाणवत गेलं. काहीतरी वेगळं. अनोखं आणि खरंच ‘त्या ‘ व्हिडिओतील ‘ तो ‘मला भेटला. त्याच खाटेवर, त्याच स्टाईलने विडी ओढत आणि डोळ्यातले बोलके भाव दाखवत. पाठीमागे झोपडीचे अर्धवट उघडे दार. त्यातून डोकावणारे दैन्य. कसेही पडलेले जुने कपडे. थोडी पण मोजकी भांडी आणि सगळा परिसर निर्मनुष्य.
मी त्याच्याकडे बघून हसलो. त्यानं प्रश्नार्थक चेहरा केला आणि विडीचा एक जोरदार झुरका मारला. तोंडाचा चंबू करून धुराची वर्तुळं सोडली.
‘ काय रे , शाळेत नाही गेलास ?’ मी विचारलं.
‘ कशाला ?’ त्यानं मला प्रतिप्रश्न केला. मी उत्तर टाळलं आणि विचारलं.
‘ घरात कुणी नाही का? ‘
‘ तुला काय करायचंय? ‘ तो एकेरीवर येत पुन्हा प्रश्न फेकत विडी ओढू लागला.
‘ अरे इतक्या लहान वयात विडी ओढू नये.’
‘ का ? बा ओढतो , आज्जी वढते , घरातली सगळी वढतात , त्यानं काय होतंय? ‘
आता मी गप्प.
विडी संपली तसा तो उठला आणि खाटेवरून खाली उतरून झोपडीत गेला आणि विडीचं बंडल घेऊन बाहेर आला.
आता माझं त्याच्याकडे नीट लक्ष गेलं. त्याच्या अंगात शर्ट होता पण चड्डी नव्हती. पायात चप्पल नव्हती. अंगकाठी गुटगुटीत होती आणि ओठ शरीरापेक्षा जास्त काळसर जांभळे दिसत होते.
‘ अरे चड्डी पण नाही घालायला ? ‘
‘ कशाला हवी चड्डी ? ‘ विडीचं गुलाबी रंगाचं बंडल फोडून एक विडी तोंडात ठेवत आणि काडेपेटी पायाच्या आंगठ्यात धरून लीलया काडी ओढून विडी पेटवीत त्यानं विचारलं.
‘ म्हणजे काय ? अरे लज्जारक्षण होतं त्या चड्डीमुळं . ‘ असं उत्तर देणार होतो पण सगळी परिस्थिती पाहिली आणि आवंढा गिळला .
‘ कुठे गेलेत घरातले सगळे ? ‘ मी चिकाटीने विचारलं .
‘ आई रेशनवर फुकट मिळणारं रेशन आणायला गेलीय . बा शाळेत गेलाय ,मला फुकट मिळालेली पुस्तकं आणि कपडे आणायला . आज्जी गेलीय , माझ्यासाठी आणि आज्जासाठी विडी बंडलं आणायला .आज्जा भीक मागायला गेलाय मारुतीच्या देवळात .’ त्यानं प्रश्न न विचारता सांगून टाकलं .
‘… बा म्हणतो , चड्डी घालू नकोस , म्हणजे कुणाला ना कुणाला दया येईल . शाळेत जाऊ नकोस , तुला सरकार सगळं फुकट आणून देईल घरी. आज्जी म्हणते ओढ आणखी विड्डी म्हणजे आजारी पडशील. मग सगळं घर आजारी होईल. मग सरकार फुकट औषध दवा देईल. आई म्हणते या खाटेवर बस आणि राखण घराची. कुणी आलं गेलं तर सांग, चोरांनी लुबाडलं आम्हाला ,मग सगळेजण फुकट आणून देतील वस्तू .ही झोपडी , ही खाट , जुने कपडे , ती भांडी अशीच मिळवलीत. आता बा म्हणतो , सरकार शेत पण देणारेय आणि घर पण देणारेय फुकट . मग आज्जा म्हणतो , ते विकून दुसरीकडे जाऊ , मग आणखी मज्जा …सगळेच करतात असं…’
तो बोलत होता आणि माझ्या डोक्याचा भुगा होत होता.
माझ्या बॅगेतील वीजबिल , घरपट्टीची पावती , मुलांची फी भरलेल्या रिसीट्स , जमिनीचा सातबारा , इन्कमटॅक्सची रिटर्न्स , माणुसकीची महती सांगणारी पुस्तकं , विविध संस्थांना देणगी देण्यासाठी पगारातून कापून गेलेली रक्कम … असं सगळं डोळ्यासमोर नाचू लागलं. मला गुदमरल्यासारखं झालं. घुसमटल्यासारखं झालं. डोळे चुरचुरू लागले म्हणून मी चोळले आणि समोर पाहिलं. तो गुटगुटीत लहानगा माझ्या तोंडावर भसाभसा धूर सोडत होता.
अतिशय निरागसपणे !!!
( काल्पनिक )
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .
९४२३८७५८०६
Leave a Reply