नवीन लेखन...

उद्यान एक्सप्रेसचा थरार

श्रीयुत मुरलीधरन आज नेहमी प्रमाणे कामावर निघाले होते. चष्मा चढवलेले मुरलीधरन आपल्या मिचमीचत्या डोळ्यांनी पाहत झपझप पायऱ्या उतरत होते. कामावर पोहचायला आज त्यांना तसा  उशीर झाला होता. मुंबई च्या रेल्वे विभागात ते नोकरीला होते. सेवानिवृत्ती अवघ्या तीन महिन्यांवर आली होती. सुरुवातीचे दहा वर्षे त्यांनी मुंबई लोकल मध्ये सेवा दिली होती. गेले बारा वर्षे लांब पल्ल्या च्या गाडीवर ते लोकोपायलट म्हणून काम पाहत होते. इतक्या वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत त्यांच्या हातून एकही दुर्घटना झाली नव्हती. निवृत्ती पर्यंतचा काळ सुखाने जावा हीच त्यांची कामना होती. निवृत्ती नंतर गावी स्थायिक होण्याचा त्यांचा मानस होता. मुलं- नातवंडांच्या सानिध्यात आपले उर्वरित आयुष्य त्यांना घालवायचे होते.

कार्यालयात पोहचल्यावर त्यांना उद्यान एक्स्प्रेस चा ताबा घ्यायचा होता.  ट्रेन  नेहमीच्या वेळापत्रकानुसार निघणार होती.  स्टेशन  येताच ट्रेन च्या इंजिनवर नजर टाकून त्यांनी सर्व काही व्यवस्थीत असल्याची खात्री करून घेतली. इंजिन चा ताबा घेतल्यावर त्यानी एक व्हिसल दिली आणि एक एक स्थानक मागे टाकत ट्रेन भरदाव वेगाने मुंबई च्या दिशेने निघाली. मार्गात कोणत्याही प्रकारचा अडथळा दिसून न आल्या मुळे मुरलीधरन आपले काम व्यवस्थित पार पाडत होते. रेल्वे ट्रॅक च्यां दोन्ही बाजूंनी डोंगर रांगांची माळ एक एक करत मागे सरत होती. सर्व सिग्नल यंत्रणा जणू काही त्यांना त्यांचा मार्ग मोकळा करून देत होती.

सध्या कोविड च्या आजाराने सर्वत्र धुमाकूळ घातला होता. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती. कोविडला आळा बसावा म्हणून राज्य शासनाने लॉकडाऊन घोषित केला होता. त्याचा परिणाम सर्वच रेल्वे स्थानकावर झाला. नेहमी प्रमाणे असणारी गर्दी स्थानकावर दिसत नव्हती. म्हणून मुरलीधरन यांची ट्रेन विना अडथळा भरधाव वेगाने मुंबई कडे निघाली होती.

इकडे वांगणी स्टेशन ला पॉइंटमन या पदावर कार्यरत असलेला स्वप्नील येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन ला झेंडा दाखवण्याचं काम इमाने इतबारे करत होता. रेल्वे रुळावर सर्व काही आलबेल आहे की नाही हे पाहण्याचे काम त्याच होतं. वयाची पंचविशी पार केलेला स्वप्निल अंगापिंडाने मजबूत होता. तरुणाईच रक्त  त्याच्या अंगात भिनत होत. संकटाला सामोरे जाण्याची धमक त्या नवीन रक्तात होती. त्याने पदवी पर्यंत चे शिक्षण घेतले होते. सोबत सेफ्टी ऑफिसर चा कोर्स पूर्ण केला होता. गेल्या चार वर्षांपासून तो या पदावर काम करत होता. मागच्याच वर्षी त्याचे लग्न झाले होते. नुकताच त्याला पुत्र रत्न चा लाभ झाला होता. दोन दिवसांनी त्याचा बारसा साजरा करण्याचं स्वप्नील ने ठरवलं होत. घरात अगदी आनंदाचं वातावरण होत.

नेरळ लाच राहणारी शुभांगी नेत्रहीन होती. वयाची तिशी पार केलेली  शुभांगी  अंगाने सडपातळ शरीर यष्टी ची व सतत चेहऱ्यावर हास्य ठेवणारी, लोकांशी मिळून मिसळून वागणारी होती.दोन्ही डोळ्यांना अंधत्व आलेलं होतं. तिचे पती या जगात हयात नव्हते.

शुभांगी  भाड्याने घर घेऊन राहत होती.तीच्या खांद्यावर मुलाला सांभाळण्याची जबाबदारी आली होती. दोघांचा उदर निर्वाह करण्यासाठी तिला रेल्वे मध्ये भिक मागण्याच काम करावं लागतं होत. त्याशिवाय तिला दुसरा पर्याय नव्हता.  रोज ती मुलाला सोबत घेऊन जात असे. वयाने 5 वर्षाचा शुभम आईला योग्य तो हातभार लावत होता.

शुभम च्या भविष्याची शुभांगी ला सतत काळजी वाटत असे. त्याच्या शिक्षणा विषयी तिला चिंता वाटत होती. त्याच भविष्य तिच्यासारखं अंधकारमय असू नये असे तिला सतत वाटे. शुभम हाच तिचा भविष्याचा एकमेव आधार होता आणि त्याला सुध्धा आईचाच आधार होता. आज ते दोघेही आपल्या रोजच्या कामावर निघाले होते. दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आल्यामुळे तिला शुभम च्या खांद्यावर हात ठेऊन त्याच्या मागे मागे चालावं लागे. आजही त्यांचा तोच जीवनक्रम होता.

कर्जत स्टेशन  आल्यावर मुरलीधरन यांनी स्वतःला थोड सतर्क ठेवण्याचं ठरवलं, कारण येथून पुढे मुंबई पर्यंत लोकल ट्रेन च्या फेऱ्या सुरू होत असत.प्रत्येक स्टेशन वर मोटारमन ना हॉर्न वाजवावा लागत असे. मुंबई कडची सर्वच स्टेशन्स  लांब पल्ल्याच्या गाडीच्या मानाने खूपच जवळ आहेत. मुरलीधरन यांनी आता नवीन जोमाने ट्रेन चा ताबा घेतला.

नुकतच नेरळ स्टेशन पार करून ट्रेन शेलू स्टेशन च्या दिशेने निघाली होती. डाव्या बाजूला दिसणारी माथेरान ची हिरवागार डोंगर रांग हळू हळू मागे सरत होती. लवकरच मुरलिधन यांचा  आजचा प्रवास संपणार होता.

इकडे वांगणी स्टेशन वरील स्टेशन मास्तरांनी स्वप्नील ला आवाज दिला. थोड्याच वेळात येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस ला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी त्याला पलीकडच्या बाजूला जाण्यास सांगितले. स्वतः स्टेशन मास्टर नेहमीच प्रत्येक ट्रेन ला हिरवा झेंडा दाखवत असत. लोकोपायलट ला पुढचा मार्ग मोकळा आहे व कोणत्याही प्रकारचा अडथळा  नाही असे ते सूचित करत असत.

लॉकडाउन मुळे ट्रेन ला गर्दी खूपच कमी असते . त्यामुळे शुभांगी ची कमाई सुध्धा खूपच कमी प्रमाणात व्हायला लागली होती. शुभम आणि शुभांगी दोघेही वांगणी स्टेशन कडे जाण्यास निघाले. थोड्याच वेळात कर्जत कडून मुंबई कडे जाणारी लोकल ट्रेन येणार होती म्हणून शुभांगी घाई करत निघाली होती.’  शुभम, चल लवकर ट्रेन येईल आता’.  असं म्हणत त्याला वेगाने चालण्यास सांगत होती.पण शुभम मात्र त्याच्याच दुनियेत मग्न होता.

शुभांगी त्याच्या खांद्यावर हात ठेवून पुढे पुढे जात होती. लवकरच वांगणी स्टेशन  आल. लोकल ट्रेन यायला थोडा उशीर होता म्हणून दोघेही निवांत पणे दिव्यांगांसाठी असलेला विशेष डबा जिथे थांबतो तिकडे जायला निघाले.

उद्यान एक्स्प्रेस ने आता शेलु रेल्वेस्टेशन सोडले होते. मुंबई कडे ती वेगाने धावत होती. पुढील स्टेशन वांगणी  होते. मुरलीधरन सावकाश पणें आपले काम करत होते.

इकडे वांगणी स्टेशन परिसरात  उद्यान एक्स्प्रेस येणार म्हणून स्टेशन वर स्टेशन मास्तर हातात हिरवा व लाल झेंडा घेऊन उभे होते. तर पलीकडच्या बाजूला स्वप्नील झेंडा घेऊन उद्यान एक्स्प्रेस येण्याची वाट बघत उभा होता.

शुभांगी आणि तिचा मुलगा शुभम आपल्या निर्धारित डब्याच्या दिशेने निघाले होते. दोघेही प्लॅटफॉर्म च्या अगदी कडेने चालले होते. डोळ्यांना दिसत नसल्यामुळे शुभांगी ला याची कल्पना नव्हती. आणि शुभम सुध्धा त्याच्या बाळबोध विचारात पुढे पुढे जात होता.

कसं कोण जाणे पण त्या लहानग्या शुभम चा तोल गेला आणि तो रेल्वे ट्रॅक वर कोसळला.  शुभांगी चा हात त्याच्या खांद्यावरून निसटला. काहीतरी आघटित घडलय अस  तिला जाणवलं.  पुढच्याच क्षणाला तिला कळले की शुभमच खाली पडला आहे. त्या मातेला काय करावे काहीच सुचेना. ती कावरीबावरी झाली. समोरून उद्यान एक्सप्रेस धडधडत येत होती.  शुभम  आपला तोल सावरत उठण्याचा प्रयत्न करत होता.   आई… अशी मोठ्याने त्याने आरोळी मारली. त्याच क्षणी शुभांगी च्या काळजात धस्स झाले. ती जिवाच्या आकांताने ओरडू लागली,” वाचवा, वाचवा, कोणीतरी माझ्या मुलाला वाचवा.”  तेवढ्यात काही दूर अंतरावरून वळसा घेत उद्यान एक्स्प्रेस शुभम ला येताना दिसली. त्यानें मोठ्या शर्थीने प्लॅटफॉर्म वर चढण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला होता. कारण प्लॅटफॉर्म ची उंची त्याच्या उंचीच्या मानाने जास्त होती. तो खूपच घाबरला होता. जिवाच्या आकांताने त्यानें टाहो फोडायला सुरुवात केली. आई …,आई…. अस म्हणत तो कसातरी प्लॅटफॉर्म वर चढण्याचा प्रयत्न करत होता. शुभांगी सुध्दा मोठमोठ्याने ओरडून मदतीच्या याचना करत होती. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे आजूबाजूला कोणीच प्रवासी मदती साठी उपलब्ध नव्हते. शुभांगी ला काहीच कळत नव्हते, काय करावे ते तिला समजत नव्हते, फक्त  वाचवा…..  वाचवा…  कोणीतरी माझ्या मुलाला वाचवा एवढंच तीच्या तोंडून आवाज निघत होता.कोणत्याच प्रकारची मदत मिळत नाही हे बघून ती खूपच घाबरली होती.  त्या धक्क्याने तिची शुद्ध्द हरपत होती. हळू हळू ती बेशुद्ध वस्थे मध्ये जात होती.

जसं जसं वांगणी स्टेशन जवळ येत होत तस तस मुरलिधन यांना प्लॅटफॉर्म जवळ काहीतरी विपरीत घडतय अस दिसू लागलं होत.

इकडे स्टेशन मास्तरांच्या एव्हाना ही घटना दृष्टीस पडली होती. त्यांनी स्वप्नील कडे नजर टाकली आणि शुभांगी च्या दिशेने हात करत बोलले,” स्वप्नील,  तिकडे  बघ,  कोणीतरी लहान मुलगा ट्रॅक वर पडला आहे.” स्वप्नील ने तिकडे बघितले आणि तो एकदम बेभान झाला. काय करावे हा तो विचार करत होता तेवढ्यात स्टेशन मास्तरांनी आपल्या हातातील लाल झेंडा उंच उभारून उद्यान एक्स्प्रेस च्या लोकोपायलट ला धोक्याचा इशारा दिला होता. स्वप्नील ने शुभम ला ट्रॅक वर पडलेले पाहिले. कसलाही विचार न करता  त्याने वाऱ्याच्या वेगाने त्याच्या दिशेने धाव घेतली. सुपरमॅन ला शोभावे असे ते दृश्य होते. क्षणाचाही विलंब न करता स्वप्नील शुभम च्या दिशेने  निघाला होता. वाघाच्या चपळाईने तो पुढे सरसावला .  मुरलीधरन यांनी स्टेशन मास्तरांनी दाखवलेला लाल झेंडा पाहिला. स्वप्नील ला ट्रेनच्या दिशेने धावत येताना पाहून मुरलीधरन यांना आपल्या हातून आता दोघांचा मृत्यू होणार हे निश्चित झाले. मात्र प्रसंगावधान राखून  त्याच क्षणी त्यांनी एक मनोमनी निर्णय घेतला.120 ते 125 किमी वेगाने धावणारी उद्यान एक्स्प्रेस ला त्यांनी  इमर्जन्सी ब्रेक लावला.पण वेगाने येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेस चा वेग एवढ्यात कमी होणार नाही हे त्यांना माहीत होते. परंतु त्याशिवाय त्यांच्या कडे दुसरा पर्याय नव्हता.

इकडे प्लॅटफॉर्म वर  मदतीच्या याचना करणारी शुभांगी अखेर हतबल झाली. स्वप्नील वाऱ्याच्या वेगाने शुभम ला वाचविण्यासाठी  येत होता. मात्र समोरून येणाऱ्या ट्रेन चा वेग पाहून व समोरचे  कमी अंतर बघून थोड्या वेळासाठी त्याचा कॉन्फिडन्स हलला होता. त्यात आपला सुध्धा जीव धोक्यात येऊ शकतो याची त्याला कल्पना आली होती. तो मध्येच थांबला. त्यानें ट्रॅक वरून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. धावताना त्याने आपली दिशा ट्रॅक च्या बाहेरील बाजूस वळवली.

हे दृश्य पाहून स्टेशन मस्तरांच मन सुद्धा हळहळले. त्या चिमुकल्या शुभम चा जीव जाणार असे त्यांना मनोमन वाटू लागले.

स्वप्निल ने बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्या बद्दल मुरलीधरन यांना मात्र बरे वाटले. कारण त्यांच्या हातून आता दोन ऐवजी  एकाचे तरी  प्राण वाचणार होते.

स्वप्नील  आपल्याकडे येत असताना  चे पाहून, शुभम ला आपण वाचू असे वाटले होते. मात्र त्याला बाहेरच्या दिशेने पळताना बघून आता आपण वाचणार नाही याची त्याला खात्री झाली. तो स्वतःच वर चढण्याचा अयशस्वी प्रयत्न करत होता.

मुरलीधरन यांनी इंजीनवर ताबा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण तो काही यशस्वी होत नव्हता.

बाहेर पडताना वेगाने येणाऱ्या ट्रेन कडे बघत स्वप्निल ची नजर मदतीच्या अपेक्षेने पाहणाऱ्या शुभम वर स्थिरावली. आणि त्याचे हृदय द्रावले. त्याला शुभम मध्ये आपला मुलगा दिसला. काय करावे हे त्याला सुचेचना. त्याच्या डोळ्यासमोर ती अंध माता आणि तिचा एकमेव आधार असलेला मुलगा दिसत होता. त्याने अचानक पुन्हा निर्णय बदलला. जीवाची पर्वा न करता त्याने शुभम कडे धाव घेतली. शुभम त्याच्याकडे एखाद्या देवदूता प्रमाणे पाहत होता. हे दृश्य पाहून सर्वांच्या नजरा स्वप्नील वर खिळल्या होत्या. काहीजण स्वप्नील ला एखाद्या शूरवीर प्रमाणे पाहत होते तर काही जणांना स्वप्नील ने आपला जीव धोक्यात घालून मूर्खपणा केलाय असे वाटले होते..

स्वप्नील कडे आता फक्त 8 ते 10 सेकंदाचा अवधी शिल्लक होता. ट्रेन अगदी काही फुटांवर आलेली स्वप्नील ने बघीतली. मुरलीधरन आणि स्वप्निल ची नजरानजर झाली. दोघांनाही पुढे काय होणार याची कल्पना  नव्हती. मुरलीधरन यांनी आपले काम चोख बजावले होते. पुढचे सर्व स्वप्निल वर अवलंबून होते.

शुभम च्या जवळ गेल्यावर त्याने अतिशय स्फूर्तीने एका हाताने शुभम ला उचलले.त्याला पटदिशी प्लॅटफॉर्म वर चढवले. चीत्याच्या चपळाईने आणि विजेच्या वेगाने स्वतः  सुखरूप प्लॅटफॉर्म वर चढला. अशा परिस्थतीत सुद्धा त्याने आपल्या हातातील झेंडा सोडला नाही. हा सर्व खेळ अगदी काही सेकंदाचा होता.तेवढ्यात वेगाने धावणारी उद्यान एक्स्प्रेस त्यांच्या बाजूने सरकन….  पुढे धावली. सर्वांच्या नजरा स्वप्नील आणि शुभम वर होत्या.दोघानाही सुखरूप प्लॅटफॉर्म वर बघून सगळ्यांना अतिशय आनंद झाला. मोठ्या अभिमानाने स्टेशन मास्तरांनी हिरवा झेंडा दाखवत सर्व काही सुरळीत असल्याचे निर्देशित केले.

इमार्जन्सी ब्रेक लावल्यामुळे उद्यान एक्स्प्रेस  हळूहळू वेग कमी करत प्लॅटफॉर्म च्या पुढे जाऊन थांबली. मुरलीधरन यांनी मागे वळून पाहीले.दोघेही सुखरूप असल्याचे दिसले आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.

आपला एकुलता एक आधार आज स्वप्नील च्या समयसूचकतेने आणि चपळता पूर्ण शौर्याने वाचला याचे शुभांगी ला कौतुक वाटत होते. स्वप्नील आज आपल्या मुलासाठी देवदूतच्याच रुपात आला होता असे ती डोळ्यात आनंदाश्रू आणून स्वप्नील ला आशीर्वाद देत सांगत होती.

घडलेला प्रकार स्वप्निल ने आपल्या घरात कोणालाही सांगितला नव्हता. मात्र दोन दिवसांनी रेल्वे विभागाने घडलेल्या प्रसंगाचे सी सी टिव्ही फुटेज सोशल मीडिया मध्ये प्रसारित केले. त्याच बरोबर स्वप्निल रातोरात स्टार झाला होता. सकाळ पासूनच अनेकांनी त्याला फोन वरून शुभेच्छा दिल्या होत्या. आपल्या मुलाला  अचानक एवढे फोन आलेले बघून आईने स्वप्नील कडे विचारणा केली.  टिव्ही वर दिवसभर होणारे आपल्या मुलाचे कौतुक पाहून तिला सुध्धा आनंद झाला..

सोशल मीडिया वर झालेले स्वप्नील चे कौतुक बघून रेल्वे मंत्र्यांनी त्याला पन्नास हजाराचे इनाम जाहीर केले. स्वप्निल चा हिरोयिझम इथेच संपत नाही. तर खरा हीरो कसा असतो आणि देव कसा माणसांमध्ये च असतो ते बघा.

इनामाची घेषणा स्वप्नीलच्या कानावर पडताच त्याने त्यातील अर्धी रक्कम शुभम च्या पुढील शिक्षणासाठी आणि त्याच्या उपजिविकेसाठी देण्याचे घोषित करून टाकले. अश्या प्रकारे स्वप्निल खरोखरीच देवदूत झाला होता.म्हणूनच आपले शब्दच इथे खुंटतात असे आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही..

दोनच दिवसांनी त्याच्या मुलाचा नामकरण सोहळा होता. स्वप्नील ने घडलेला प्रसंग लक्षात घेत मुलाचे नाव शौर्य ठेवले.

— भैय्यानंद वसंत बागुल

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..