दिवाळी दरम्यान काही खरेदीसाठी बाजारात गेलो होतो. माझी खरेदी करून झाली असल्यामुळे आणि कडक ऊन होतं म्हणून तिथेच असलेल्या एका उसाच्या रसाच्या स्टॉलवर मी रस पीत उभा राहिलो. त्या स्टॉलला अगदी लागून एक छोटसं साड्यांचे फॉल, शिलाई चे धागे, सुया वगैरे मिळतात असं दुकान होतं आणि तिथे एक तरुण उभा होता. देव जाणे का पण फोन तो स्पीकर फोन वरती ठेवूनच बोलत होता.
स्वारी च्या संभाषणातून इंग्लिश शब्दांचा अगदी भडीमार होत होता आधी त्याच्या मित्राचा फोन असावा बहुतेक यावर त्याने त्याच्या ऑफिस बद्दल बर्याच फुशारक्या मारल्या.
नंतर मग त्याने बहुतेक बायकोला फोन केला असावा. बायकोच होती कारण तो कुठे आहे, फोनवर कानाला आहे की स्पीकर वर आहे याचा काहीही तमा न बाळगता डायरेक्ट त्याच्यावर बरसली “” अहो असं काय करताय. मजेंटा कलर चा धागा घेऊन या. साधं नाव लक्षात राहत नाही. उगाच मागच्या वेळेस सारखं मौव सांगितलं तर मरून कलरचा घेऊन आले तस नका करू… आणि हो वांगी रंगाचा पण धागा घेऊन या “”
त्याने दुकानदाराला मजेंटा कलर चा धागा मागितला दुकानदाराने दोन मिनिटे विचार केला आणि अख्खा धाग्यांचा बॉक्स त्याच्या समोर ठेवून दिला “” साब, जो चाहिये निकाल लो””
बिचाऱ्या तरुणाचं तोंड बघण्यासारखा झालं. तो केविलवाण्या नजरेने इकडे तिकडे बघायला लागला. मी शेजारी होतोच. त्याला सांगितलं अरे गूगल करून बघ कुठला रंग आहे ते. पण गुगलच्या रंगाची कुठली शेड तिथे मॅच होत नव्हती. मग शेवटी थोडासा गुलाबीसर वगैरे दिसणारा असा एक कलर त्याने उचलला माझ्याकडे दाखवला मी पण अंगठा दाखवून त्याला होकार दिला. हं!!
“बर.” याच्यातला वांगी रंग कुठला आहे? “” असं मग त्याने मला विचारलं.
एव्हाना माझा पण रस पिऊन झालेला होता. त्याला म्हटलं थांब नक्की कुठला वांगी रंग पाहिजे ते विचारून घे
“म्हणजे?””
“अरे म्हणजे हे विचार की जांभळे वांग येतात त्या वांग्यांचा रंग पाहिजे की हिरवट पांढरट वांगी असतात त्यांचा पाहिजे की ते पूर्ण हिरवे वांगे असतात त्या वांग्यांच्या रंगाचा धागा पाहिजे की आपले भरीत करतात या वांग्याच्या रंगाचा धागा पाहिजे?”
त्याने मान हलवली आणि बायकोला फोन लावायला घेतला आणि मी लगेच तिथून काढता पाय घेतला उगाच त्याच्या बायकोच्या शब्दाच्या वरवंटयाने त्याचे झालेले वांग्याचं भरीत पहायची माझी इच्छा नव्हती… पण पुढे आयुष्यभर त्याला लक्षात राहील असा एक क्षण त्याच्या जीवनात दिल्याच्या समाधानाने मी तिथून चालता झालो.
— अमोल पाटील.
Leave a Reply