सार्वजनिक वाहतुकीत दिवसेंदिवस बदल होत आहेत. नाही म्हटल तरी लोकांना उपयोगी पडतील अशा साधनांचा त्यात वापर केला जातो आहे. जसं लोकल मध्ये लावलेले पुढील स्टेशन दाखवणारे डिजिटल इंडिकेटर्स आणि ती स्पीकर वरून होणारी अनाउन्समेंट. गर्दीत अडकल्यामुळे कुठलं स्टेशन गेलं हे न समजणारे, नवखे, आपले स्टेशन येईपर्यंत सीटवर गाढ झोपलेले ( किंवा तसे दर्शविणारे) असे सगळे आपल्या स्टेशनची अनाउन्समेंट झाली की सावध होऊ शकतात.
त्यामुळे सगळ्यांना सोयीचं याबद्दल दुमत नाहीच पण नशीबच खराब असेल तर याचा देखील काही लोकांना त्रास होऊ शकतो.
संध्याकाळची सिएसटी ते कल्याण स्लो लोकल. एक माणूस दादरला येतो आणि माझ्या समोर बसतो. कुर्ल्याहून लोकल नुकतीच निघाली होती आणि त्याला पहिला कॉल आला, त्याचे उत्तर “” बस ठाणे पहुंच रहा हुं. 20 मिनिटे मे डोंबिवली उतरुंगा और मिलता हूँ. फिर बैठेंगे””
काहीतरी मस्त प्लॅन शिजलेला दिसत होता. असो, आपल्याला काय करायचंय?
ही थाप बऱ्याच लोकांनी ऐकली बट दॅट्स ओके. प्रत्येकाने स्टेशनच्या बाबतीत अशा थापा मारलेल्या असतात.
लोकल डोंबिवलीच्या जवळ पोहोचेपर्यंत सर्व ठीक असतं आणि त्याला दुसरा फोन आला, बायकोचा आहे असे दिसते, त्याचे उत्तर: “” अगं आता अजून सायनलाच आहे. काय माहिती पण ट्रेन खूप स्लो जाते आहे. पोहोचायला बराच उशीर होईल””
आणि नेमक्या त्याच क्षणी, डब्यातील स्पीकर्सने “”पुढील स्टेशन डोंबिवली, अगला स्टेशन डोंबिवली, नेक्स्ट स्टेशन डोंबिवली”” अशी घोषणा दिली. …… आणि त्याचा चेहरा एकदम उतरला आणि मग “”नाही माझ लक्ष नव्हतं, केव्हा डोंबिवली आलं ते.””
“अगं खरच झोप लागून गेली होती”
“नाही तू समजते तसं काही नाही.”
“”कुठलाच प्लॅन नव्हता. घरीच येणार होतो”” इ इ इ इ …… आणि
नाही! तो डोंबिवलीला उतरला नाही, ट्रेन अखेर कल्याणला पोहोचेपर्यंत बिचाऱ्याचा खुलासा सुरूच होता.
असो, आपल्याला काय करायचय? तरी पण मला उत्सुकता एकाच गोष्टीची आहे की घरी पोहोचल्यावर त्याची चटणी झाली की भरीत झालं?
मिळालेली शिकवण : सोयीसाठी लावलेली वस्तू नेहमी उपयोगीच राहील असं नाही आणि बायको हा जीव फोन वर बोलताना नवऱ्याचा आवाज कमी आणि बॅकग्राऊंड चा आवाज जास्त ऐकत असतो. त्यामुळे वेळ काळ आणि परिसर बघून थाप मारावी.
— अमोल पाटील.
Leave a Reply