रविवार, चित्रपट आणि आम्ही
AKA
How we watch movies every sunday
संध्या काळी ७. ०० या
मी – चल मस्त पिक्चर बघु या.
सौ – हो. काहीतरी छान पिक्चर लावा.
मी – हो
नेटफ्लिक्स, प्राईम, युट्युब, अ, ब, क, वगैरे वगैरे फिरत बसतो..
७.३० वा
सौ- तुम्ही यातच वेळ घालवत बसाल. नक्की ते भुताप्रेतांचे नाहीतर खुन मारामारी चे नाहितर इंग्लिश पिक्चर शोधत असाल. मला ते हॉरर, थ्रिलर, नाही पाहायचे. चांगला लावा एखादा.
सौं – अहो, तो झिम्मा चांगला आहे म्हणतात तो लावा.
मी- ए बाबा एकतर कधीतरी वेळ मिळतो तो ते झिम्मा फुगडी मध्ये नाही घालवणार. तू एकटी असल्यावर पाहुन घे.
मी- अरे, पुष्पा नाही पाहिलाय अजुन. तो पाहुया. मै झुकेंगा नहीं सा….
सौ- बिल्कुल नाही. मला हाणामारी नको हल्का फुल्का पिक्चर पाहायचाय.
मी – अगं हल्का फुल्काच आहे. गाणी पण छान आहेत. तेरी झलक अशर्फी….
सौ- ते गाणं आहे की फिजीयोथेरीपिस्टची ऍड आहे. तो खांदा वाकडा करून पाय घसरत चालतो आणि ती सारखी कंबरेवर हात ठेवून उठते बसते. काही नको पुष्पा. एकटे असाल तेव्हा पाहुन घ्या.
रात्री ८.०० वा
मी – अरे वा. बघ मस्त स्वप्निल जोशी चा पिक्चर सापडला. आता तरी चालेल?
सौ- कुठला आहे हो?
मी- काही बाली की बाळी नाव आहे. नविन दिसतोय.
सौ – एक मिनिट. तुम्हाला स्वप्निल जोशी केव्हा पासुन आवडायला लागला? तुम्ही तर त्याला शुद्ध तुपात भिजवून काढलेला शाहरूख म्हणता ना??
मी – तुझ्यासाठी मी काहीही कॉंप्रोमाईज करायला तयार आहे.
सौ- आता आलं लक्षात. हा तो हॉस्पिटल मधल्या भुताचा पिक्चर आहे ना? म्हणून तुम्ही पहायला तयार झालात. बाली आणि बाळी नाही बळी नाव आहे त्याचं. मला नाही पहायचा. बदला तो..
मी – हो का? तुला बरं माहिती आहे मला खरंच नव्हतं माहिती. मी तर स्वप्निल…
सौ – बस.. बस… एवढे कसे इनोसंट तुम्ही.
रात्री ९.००वा
युट्युब वर पटकन एक कॉमेडी पिक्चर ऑन करतो
सौ- कोणता लावला?
मी – कॉमेडी आहे..
दुसऱ्या मिनीटाला स्क्रीन वर मोठ्या तोंडाचा आणि त्याहून मोठ्या केसांचा दाक्षिणात्य कॉमेडियन योगी बाबू हजर.
सौ- बदला हो हे मद्रासी पिक्चर. फार ओढुन ताणून विनोद असतात त्यांच्यात. तुम्हाला काहीच सापडणार नाही. थांबा मी चिऊ ला विचारते. तिला सगळं माहिती असतं ती सांगेल मला.
चिऊ ला कॉलेज च्या हॉस्टेल ला फोन करते.
दहा मिनीटांनी….
सौ – तुमची पोरगी तुमच्या पेक्षा जास्त वात्रट. काय तर कुठला तो इटर्नल्स बघा म्हणे.
शेवटी प्रियदर्शन छाप कुठला तरी विनोदी पिक्चर लावला जातो.
सौ. पाचव्या मिनीटाला बसल्या बसल्या गुडुप.
१५ मिनीटांनी डोळे चोळत उठत..
सौ – काय लावलय हो काहीच लिंक लागत नाहीये.
मी – अगं पण तुच झोपून गेली होतीस.
सौ – काही नाही. डोळे मिटून ऐकत होते मी सगळं. बदला ते नाहीतर बंद करून टाका. नुसता वेळ घालवून टाकला.
रात्री १०.०० वा
आम्ही दोघं एकाग्रतेने बघत बसलेलो..
पिक्चर – दाल तडका, चिकन सुक्का , वांग्याची चटणी, वटाट्याचे भरीत, लोणचं भरलेल्या पोळ्या,…
कलाकार – संज्योत किर, मधुरा, हेब्बर, रणवीर ब्रार, इ. इ. इ.
–अमोल पाटील
Leave a Reply