“Life is like a box of chocolates, you never know what you’re going to get.” –Forrest Gump.
आयुष्य खरोखर अगदी असेच आहे. योगायोग आपण चित्रपटात पहात असतो आणि कधी कधी विचार करतो की यार हे कसं शक्य आहे . पण म्हणतात ना reality is stranger than fiction तसे काही उदाहरणं आपल्याला खऱ्या आयुष्यात दिसतात आणि विश्वास ठेवावा लागतो. असेच काहीसे माझ्या एका मित्राच्या बाबतीत घडले.
खरं तर बऱ्याच काळानंतर त्याच्याशी काल बोलणं झालं आणि त्यावेळेस वाटलं की त्याची इष्टोरी शेअर करायला पाहिजे. तर त्याला आपण रितेश उर्फ रितू म्हणूया.
१९९८-९९ दरम्यान माझी पहिली नोकरी पवईला एका तारांकित हॉटेल मध्ये टेक्निकल विभागात लागली. इंजिनियरिंग सुपरवायझर म्हणून मी कार्यरत होतो. तिथेच रितू म्युझिक ऑपरेटर म्हणून कामाला होता. त्यावेळेस सीडी किंवा पेनड्राईव वगैरे एवढे प्रचलित नव्हते त्यामुळे लॉबी मध्ये जे संगीत चालायचं ते म्युझिक रूम मध्ये डबल कॅसेट प्लेअर होता त्याच्या कॅसेट बदलत राहणे आणि कोणत्या रूम मधून केबल ची तक्रार आली तर जाऊन अटेंड करणे हे त्याचं काम.
केबलच्या तक्रारी कमी असायच्या आणि एक कॅसेट तासभर चालायची त्यामुळे रितू ला भरपूर वेळ असायचा. दिवसा हॉटेलमध्ये काम करून संध्यकाळी तो एका नाईट कॉलेज मध्ये बारावीची तयारी करत होता. पण अभ्यासात लक्ष कमीच. बाकी सर्व धंदे करून चुकला होता. दिसायला गोरा आणि स्मार्ट आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक नंबरचा गोडबोल्या त्यामुळे हॉटेलमध्ये सर्वांशी त्याचं चांगलं जमायचं. कधी नाईटशिफ्ट ला असला तर स्टाफ साठी मिडनाईट स्नॅक्स बनवायला शेफला मदत कर तर कधी रेस्टोरंट मधल्या स्टीवर्ड्स ला टेबल अरेंज करायला मदत कर असं त्याचं चाललेलं असायचे त्यामुळे त्याला हॉटेलमध्ये सगळीकडे परवानगी होती.
वडील दोन वर्षांपूर्वी वारलेले आणि आईला सासर आणि माहेरच्यांनी बेदखल केलेलं. मोठा भाऊ इंजिनीअरिंगला होता. वडिलांच्या बचतीमधून ती त्याचं कॉलेज आणि स्वतः काहीतरी काम करून प्रपंच चालवत होती. रितुने पण शिकावे असं तिला वाटत होतं पण याचे रंगढंग वेगळेच होते. कसातरी करून इव्हनिंग कॉलेज मधून बारावी तरी कर म्हणून त्याच्या मागे लागलेली. तिच्या दृष्टीने एवढं गोरं गोमटा पोरगा पण वाया जातो आहे हे जबर दुःख.
माझ्या लग्नाला सगळी माझी टीम आली होती त्यात हा पण होता. माझा भाऊ मला दादा म्हणतो पाहून हा पण दादा म्हणायला लागला. महत्वाचं काही असेल तर माझा सल्ला घ्यायचा. त्यामुळे कधी त्याच्या घरी जाणं झालं तर ती माउली रितूला काहीतरी समजव रे बाबा म्हणून सांगायची. एकदोन वेळा माझी पत्नी आणि मी दोघे जाऊन आलो होतो त्याच्या घरी.
कसातरी एकदाचा तो बारावी सुटला. सर्वांना पेढे वाटले.
एकदा एका मोठ्या हॉटेलची ट्रेनी स्टीवर्ड ची जाहिरात याने वाचली आणि माझ्याकडे आला ” दादा मेरेको अप्लाय करनेका हैं. ये कॅसेट बदलते बदलते जिंदगी नही गुजारनी “
अर्ज केला. त्यांचं बोलावणं पण आलं. इंटरव्हिव च्या आदल्या दिवशीच भाईने कोणाशीतरी मारामारी केली आणि कपाळावर पट्टी बांधून आला.
“दादा लफडा झाला. सगळ्यात मोठं हॉटेल आहे. जॉईन करून घ्यायच्या आधी मेडिकल पण करतात म्हणे. विचारल्यावर काय सांगू उद्या?”
” अरे उद्या इंटरव्हिव ला तर जा. विचारल्यावर पडलो वगैरे काहीतरी सांग. ऑल द बेस्ट”.
यथावकाश रितू इथून सोडून तिथे ट्रेनी म्हणून रुजू झाला. मी पण दुसरीकडे जॉईन झालो आणि आमचा संबंध तुटला. त्यावेळेस मोबाईल वगैरे काही नव्हते. रितूच्या घरी फोन नव्हता त्यामुळे संपर्क करायला काहीही साधन नव्हतं. मध्ये एकदा कोणाच्यातरी लग्नात भेटला तेव्हा तेव्हा त्याने सांगितलं की ट्रेनी म्हणून जबरदस्त काम करून घेतात. पहिल्याच दिवशी तिथल्या सिनीअर ने त्याला एका बाटली वर लिहीलेला शब्द वाचायला लावला. याने वाचलं चंपाग्ने आणि तिथे हास्याचे कारंजे उडाले. त्या दिवशी त्याला कळाले की इंग्रजीत शैंपेन चे स्पेलिंग Champagne आहे. तिथुन त्याची खर्या अर्थाने शिकायला सुरुवात झाली. काम खूप होते पण तिथे मजा पण येत होती. तो खुश दिसत होता.
तो होताच तसा, कुठल्याही वातावरणात खुश राहणारा.
पुढे कळलं की तो एका क्रूझ लायनर वर जुनियर स्टिव्हर्ड म्हणून रुजू झाला होता. आम्हाला समाधान वाटलं की चला मुलगा सेटल होतो आहे. तो त्याच्या जगात झगडत होता आणि मी माझ्या जगात. आमचा संबंध तसा संपलाच होता.
फास्ट फॉरवर्ड १२ – १३ वर्षे.
मी कतार ला होतो. फेसबुकने बाळसं धरलं होतं. आणि सगळे जुने सखे सवंगडी शोधत होते. आणि अशात एक दिवस एक फ्रेंड रिक्वेस्ट आली. रितू होता.
इतक्या वर्षाने तो परत भेटला फार बरं वाटलं. चॅटिंग वर कुशल मंगल कळले. तो UK ला होता मला वाटलं क्रूझवर असेल.
” दादा बहोत बाते करनी है. फुरसत मे skype पे कॉल करता हूँ “
कधी त्याला तर कधी मला वेळ मिळत नव्हता. त्यामुळे कॉल काही होत नव्हता आणि एक दिवस मुहूर्त लागला. आणि skype वर रितू दिसला. जसा च्या तसाच होता.
इतर बोलणं झाल्यावर त्याला विचारलं किती दिवस UK ला असणार आहेस?
तो हसला ” दादा नशीब ठेवेल तो पर्यंत”
” म्हणजे ? तिकडे हॉटेल जॉईन केलस का? काय म्हणून ?”
” दादा एका रिसॉर्ट चा ऑपरेशन्स मॅनेजर आहे. नेक्स्ट टू द ओनर. ओनर नसतोच त्यामुळे तो रिसॉर्ट माझ्या ताब्यात आहे. आय रन दॅट रिसॉर्ट.”
” ग्रेट !!” खरंतर मला तो एक धक्काच होता. ” मतलब ‘तेरी मेहनत रंग लायी”
” नशीब म्हण दादा. “
” म्हणजे”
” पिक्चर का स्टोरी लगेगा. तुझा विश्वास बसेल तर सांगतो. पण तू सांग तू कतार ला कसा आणि काय करतो आहेस.
” सध्या एका मेंटेनन्स कंपनीचा हेड आहे. आणि कसा आलो ती पण एक स्टोरीच आहे. पण तू तुझं बोल “
त्याने जे सांगितलं ती खरंच चित्रपटाची कथा शोभण्यासारखी होती.
तो क्रूझ वर लागला हे तर माहिती होतं. तिथे तो काही वर्ष होता. जुनिअर स्टीवर्ड चा स्टीवर्ड झाला. काही महिने लायनर वर तर मग काही दिवस घरी यायचा. आयुष्य असेच जाईल असं मनाने ठरवून घेतले होते. इंग्लिश बऱ्यापैकी सुधारले होते. तो त्याच्या आयुष्यात खुश होता.
त्याच्या क्रूझ वर एक गोरा पॅसेंजर नेहमी असायचा. म्हणजे रितू ने पहिली ट्रिप केली तेव्हा पासून.रितू ची प्रगती पण त्याला दर ट्रिप वर कळत होती. रितू बऱ्यापैकी बोलघेवडा असल्यामुळे त्याचं सगळ्या प्रवाश्यांशी जमायचे त्यापैकीच तो एक प्रवासी होता. पण नेहमी चे असले तर एक सहजपणा वागण्यात येतो तसा एक मर्यादित सहजपणा त्यांच्यात होता.
एक दिवस रितू काही ऑर्डर सर्व्ह करायला गेला तेव्हा तो इंग्रज (त्याला आपण मि. रॉक म्हणूया.) एक्दम चिडलेला होता आणि त्याचा फोनवर कोणाशी जोरदार वाद चालेला होता. तेवढ्यात हा तिथे पोहोचला. रॉक ने फोन बंद केला.
त्याचा तो रुद्रावतार पाहून रितू आपलं काम करत राहिला आणि रॉक थोडा शांत झाल्यावर त्याला पाण्याचा ग्लास पुढे केला.
” सर सगळं ठीक आहे का? तुम्ही बरे आहात का? तुम्हाला काही देऊ का? ” याने माणुसकीने विचारले.
” तो माझ्या रिसॉर्ट चा मॅनेजर होता. मी स्वतः जाऊन नाही बसू शकत रिसॉर्ट चालवायला. मला इतर बरेच बिझिनेस आहेत. आणि हा माणूस त्या रिसॉर्टचं वाटोळं करतोय. वर्षातून काही दिवस मी ब्रेक घेऊन या क्रूझ वर येतो पण इथेही शांती नाही मिळू देत…… माझ्या देशात सगळ्यांना पगार आणि बेनिफिट्स पाहिजे. काम मात्र नको करायला.”
“हं. तुमच्या देशात भारतीय पण भरपूर आहेत मग त्यांच्या बद्दल काय मत आहे तुमचं?”
खरं तर हा प्रश्न रितुने अगदी कॅज्यूली विचारला होता. त्याचा राग शांत करण्यासाठी थोडा वेगळा विषय घ्यावा म्हणून.
” फर्गेट इट ” रॉक म्हणाला आणि रितू त्याची ऑर्डर सर्व्ह करून बाहेर पडणार
तेवढ्यात रॉक ने आवाज दिला
” रितू विल यु वर्क विद मी अँड मॅनेज माय रिसॉर्ट ?” आणि हसायला लागला
रितू ला वाटलं रॉक जोक मारतोय म्हणून हा पण हसून म्हणाला ” या व्हाय नॉट ” आणि निघून गेला.
रॉक ,ची ट्रिप संपायच्या आदल्या दिवशी त्याने रितू ला बोलावून सांगितलं की त्या दिवशी त्याने जी ऑफर त्याला दिली ती काही मस्करी नव्हती तो सिरियसली विचारत होता.
विषयाचा गंभीरपणा रितू च्या लक्षात आला आणि त्याने रॉक ला स्वतःबद्दल सगळी माहिती दिली की तो फक्त बारावी आहे, त्याच्याकडे कुठलीही हॉटेल मॅनेजमेन्ट ची पदवी नाहीये, तो एक साधा स्टीवर्ड आहे. अजून तो साधा कॅप्टन पण नाहीये. त्यामुळे हो म्हणण्यात काही अर्थ नाहीये. आणि त्याला रॉक ची फसवणूक करायची नाहीये”
” वेल, मला तुझ्यात एक स्पार्क दिसला म्हणून तुला विचारले. पण ठीक बघूया काय करता येतं ते. पण तुझा ऍड्रेस, फोन नम्बर देऊन ठेव ” असं म्हणून तो निघून गेला.
या ऑफरचे पुढे काही होणार नाही हे रितूला माहिती होते पण ती ऑफर हेच त्याच्या चांगल्या कामाची पावती होती हे समाधान मानून रितू त्याच्या कामात लागला. नंतर तो त्याबद्दल विसरूनही गेला.
काही काळ गेला आणि ट्रिप संपवून रितू घरी परत आला. सकाळी उठल्यावर त्याच्या आईने हातात एक मोठं पॅकेट दिला.
” परवाच आलय. काय आहे माहिती नाही”
“दादा ने पाठवलं असेल” रितूच्या भावाची नुकतीच सिंगापूरला ट्रान्स्फर झालेली होती.
” नाहीरे त्याचा फोन आला होता तेव्हा विचारलं मी त्याला. बघ बाबा काय आहे ते”
त्याने उत्सुकतेने पॅकेट उघडले तर आत मध्ये UK च्या एका कॉलेजचे ब्रोशर होते, काही फॉर्म्स होते आणि एक पत्र होतं.
मि. रॉक चं
थोडक्यात मतितार्थ असा होता की- मी तुला कॉल करण्याचा प्रयत्न केला पण तुझा फोन लागत नव्हता. इथे एका कॉलेज मध्ये एक वर्षाच्या मॅनेजमेंट कोर्स साठी तुला ऍडमिशन मिळू शकते. ज्याची फी आणि शिक्षणाचा खर्च मी करेल पण तू कोर्स करत असताना माझ्या रिसॉर्टमध्ये काम पण करायचे ज्याचा पगार मी तुला देईन ज्याने तुझे इतर खर्च भागतील. विचार कर आणि जर तुला योग्य वाटत असेल तर खाली दिलेल्या पत्त्यावर एजेंटला भेटून हा फॉर्म भरून आणि व्हिसाचे डॉक्युमेंट जमा करून ये. आणि समजा इंटरेस्ट नसेल तर प्लिज मला तसा मेसेज करून टाक.”
विश्वासच बसत नव्हता त्याचा डोळ्यांवर. त्याने आईशी आणि भावाशी चर्चा केली. आता भाऊ पण कमवत होता त्यामुळे त्याने रिस्क घेऊन बघायला काही हरकत नाही म्हणून सांगितले. दुसऱ्याच दिवशी एजेंटला भेटून फॉर्मॅलिटीस पूर्ण केल्या.
काहीच काळात रितू UK ला गेला. शिक्षण घेतले त्याचबरोबर रिसॉर्ट मध्ये काम करून संपूर्ण माहिती करून घेतली आणि वर्षभराने परीक्षा पास करून रिसॉर्टचा ऑपरेशन मॅनेजर म्हणून सूत्र हातात घेतले.
तिथे गेल्यावर त्याला समजले की हा जो मि. रॉक होता हा राजघराण्याच्या नातेवाईकांपैकी होता.
मुंबईत असताना चाळीत समोरच्या घरात राहणाऱ्या मिनू बरोबर अफेयर होतं जे तिच्या घरच्यांना मान्य नव्हतं पण आता चित्र बदललं होतं. आता त्यांनी आनंदाने लग्न लावून दिलं.
आज वेल्स प्रांतात त्याचं रिसॉर्ट झकास चालतं. मि. रॉक कधीतरी एखाद्या वेळी येऊन जातो. रितू आल्यावर त्याला कुठलीही कटकट राहिली नाही म्हणून तो खुश आहे. त्याने रितूच्या बाबतीत खेळलेला जुगार यशस्वी झाला आहे. रितूला मुलगी तिथेच झाली. आज त्याची मुलगी १६ वर्षांची आहे. अधून मधून बोलणं अथवा व्हिडीओ कॉल होत असतो. एकदा त्याने मि. रॉक सोबत पण व्हिडीओ करून ओळख करून दिली.
आम्ही बोलताना मि. रॉक चा उल्लेख दगड म्हणूनच करतो.
अजूनही म्हणतो ” दादा मी अजूनही विचार करतो तो एक काय दिवस होता की दगड ने काय विचार करून एका परदेशी बारावी शिकलेल्या स्टीवर्डला स्वतः शिक्षण देऊन एक रिसॉर्ट चालवायला दिलं?कधी वाटलं नव्हतं असं काही होईल. माझं तर स्वप्न होतं की आयुष्यात कधीतरी रेस्टोरंटचा कॅप्टन बनेन पण आज कॅप्टन्स मला रिपोर्ट करतात. कधी कधी वाटतं की हे सगळं स्वप्न आहे आणि कोणीतरी झोपेतून उठवून म्हणेल -उठ बे क्या म्युझिक रूम मे सोया है, उठ कॅसेट पलटी कर,लॉबी मे म्युझिक कबसे बंद है”
–अमोल पाटील
Leave a Reply