नवीन लेखन...

उगाच काहीतरी -३०

चहा, कॉफी आणि आम्ही
चहा हे आम्हा पती पत्नीचा वीक पॉईंट आहे. आमचे गुण जर जुळवले असतील तर इतर ३६ गुण जुळो न जुळो चहा नावाचा सदतिसावा गुण नक्की जुळला असणार. ती शिक्षिका आणि मी इंजिनियर या मुळे बहुतेक तो नैसर्गिकरित्या आला असेल. चहाला नाही म्हणायचं नसतं हा आमचा पासवर्ड. मी कधी कधी मॅनेज करून घेतो पण हिला तुम्ही रात्री २-३ वाजता झोपेतून उठवून सहज जरी विचारलं -चहा घेणार का? ती हो म्हणेल आणि झोपून जाईल…. आणि मग पंधरा मिनिटांनी डोळे न उघडता विचारेल ” चहा झाला का?” आणि मग अलार्म जसा वाजतो तशी ती दर पंधरा मिनिटाने विचारत राहील – “चहा झाला का ?” तोपर्यंत जो पर्यंत तुम्ही तिला चहा बनवून देत नाहीत. आणि मग तो घेऊन ती पुन्हा तेवढीच गाढ झोपून जाईल. आम्हाला आपला साधा चहा आवडतो. बाहेर गेलो तरी तो स्वर्गीय आनंद देणारे अमृततुल्य वगैरे चहा जास्त चालत नाहीत. आपण पृथ्वीवर आहोत ना, मग साधा चहा सारखा चहा हवा. साधा टपरीवरचा चहा.
तिचे हे चहा प्रेम कुठे उफाळून येईल हे सांगता येत नाही. एकदा रविवारी आम्ही मॉल मध्ये होतो तेव्हा अचानक हिला चहा ची आठवण आली. ‘ अहो, चहा पाहिजे ” आता चहा घ्यायचा तर फूड कोर्ट मध्ये जावं लागणार. तिथे ही KFC, McD, Burger King, Dominos, वगैरे मंडळी साधा चहा नाही ठेवत ते cappucino, mocha वगैरे आपल्याला उच्चारता येणार नाहीत अशी नावं असलेली कॉफी किंवा मग ग्रीनटी आणि काय काय टी असे प्रकार ठेवतात. आता या माउलीला साधा चहा कुठून आणायचा हा प्रश्न डोळ्यासमोर पडला.चहा साठी मॉलच्या बाहेर जायचं आणि चहा पिऊन परत आत यायचं याला माझी जीवावर आली होती. शेवटी इकडे तिकडे बघताना मला कोपऱ्यात एक स्टॉल दिसला चाय व्हिलेज असं काहीतरी नाव होतं. एखाद्या चहाच्या टपरीवर असावा असा सेटअप तिथे केला होता. चला म्हटलं इथे साधा चहा मिळेल म्हणून तिथे गेलो.
” वेलकम टू चाय व्हिलेज. व्हॉट वूड यु लाईक टू ह्याव सर ?”
“अरे चहा चं दुकान आहे ना? मग चहाच दे ना”
” वूड यु लाईक टू ट्राय हिमालयन, दार्जिलिंग, जास्मिन टी ऑर एनिथिंग एल्स सर?”
” ते सादा चाय लिहिलंय ना तो दे दोन कप”
” सर, वूड यु लाईक टू ह्याव इट इन कप ऑर ग्लास ?”
” च्यायला एका चहा साठी किती प्रश्न रे. ग्लासात दे… आणि आता प्रश्न नाही फक्त चहाच पाहिजे’
मी वैतागलो हे त्याच्या लक्षात आलं असावं.
त्याने प्रिंटर मध्ये पावती फाडली आणि शेजारी त्याच्या साथीदाराने चहाचे दोन ग्लास आणून ठेवले. लगेच हिने एक उचलला आणि तोंडाला लावला. मी रिसीट वाचून ३० रुपये त्याच्या हातात ठेवले.
” सर, तीनशे रुपये झाले” त्याने मराठीत सांगितलं
” अरे इथे तर ३० पॉईंट ००० दिसतंय”
” सर, तो पॉईंट ३०० नंतर आहे ३० नंतर नाही”
” काय रे साधा चहा दीडशे रुपयाला???”
” सर, तो चहा आमच्या कंपनीच्या स्वतःच्या टी गार्डन मधला आहे”
मी मागे पाहिलं तर ही मस्त पैकी चहाचा घोट घेत मॉल मधली गंमत बघत होती. झक्कत ३०० रुपये टेकले आणि माझा ग्लास घेऊन तिच्याकडे आलो. आणि पहिलाच घोट घेतला आणि यापेक्षा स्टेशनवरचा चहा बरा असं वाटलं. नुसतं लाल रंगाचं गरम पाणी लागत होतं.
हिने माझ्याकडे पाहिले ” काही खास नाही. एकदम बेकार चहा आहे. तरी मॉल असल्यामुळे महाग असेल. ३० रुपये तर असेल ना.?”
” दीडशे रुपयाचा एक कप आहे”
” म्हणजे आपण तीनशे रुप्याचे हे लाल पाणी घेतलं? हिला आता फक्त चक्करच यायची बाकी राहिली.
” आहो मग कशाला घेतला? याच्या पेक्षा मग स्टारबक्स मध्ये कॉफी नसती घेतली का आपण? माझा महिन्यभाराचा चहा झाला असता हो “
आता हिला काय सांगू की बाई पैसे द्यायच्या आत तू कप उचलून तोंडाला देखील लावला होता. तोंड देखल्या अग जाऊदे ग. असं म्हणून तिला बाहेर काढलं.
हिचं दुसरं आवडतं पेय म्हणजे मशिनवाली कॉफी. म्हणजे ती प्रिमिक्स कॉफी जी बहुतेक ऑफिसेस मध्ये मशीन मधून मिळते. आता पंचाईत अशी आहे की ती घरी बनवता येत नाही आणि चहा सारखी अशी जागोजागी मिळत नाही. त्यावर पण आम्ही आता उपाय काढला आहे. कुठे फिरायला जाताना मशिनवाली कॉफी प्यायची लहर आलीच तर सरळ कुठल्यातरी बिल्डरच्या सेल्स ऑफिस मध्ये अथवा कारच्या शोरूम मध्ये घुसून जायचे. (हो, आम्ही तसे डेरिंगबाज आहोत ) हमखास चहा की कॉफी विचारलं जातं आणि दिलं ही जातं. लक्षात ठेवा ही युक्ती बाईक्स च्या शोरूम मध्ये चालत नाही. ते तुम्हाला एन्क्वायरी तर सोडूनच द्या पण विकत घेऊन गाडीची डिलिव्हरी घ्यायला गेले तरी चहा कॉफी तर सोडाच पण पाणी देखील विचारणार नाहीत.
आता नुसतं कॉफीसाठी जाऊन उगाच एन्क्वायरी करायची त्यात गिल्टी फील करायचं काही कारण नसतं कारण पहिले तर त्यांच्या सेल्सच्या कस्टमर डिलाईट बजेट मध्ये तो खर्च धरलेला असतो, दुसरं म्हणजे त्यांच्या वॉक इन एन्क्वायरी कस्टमर फूटफॉलची संख्या वाढते म्हणून तो सेल्समन खुश असतो. अहो आम्ही कार घेतली तेव्हा दोन वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या कार आम्ही शॉर्टलिस्ट करून ठेवल्या होत्या पण त्यातल्या एका शोरूमवाल्याने शेवटपर्यंत चहा कॉफी विचारली नाही पण दुसऱ्याने मात्र त्या एक तासात तीन वेळा कॉफी पाजली म्हणून हिने मला त्या दुसऱ्या शोरूम मधून गाडी घ्यायला लावली. अर्थात गाडीची क्वालिटी, सर्व्हिस, किंमत वगैरे गोष्टी महत्वाच्या होत्याच बट स्टील….
गेल्या रविवारी असंच झालं. आम्ही कुठेतरी चाललो होतो. बऱ्याच दिवसापासून मला एक कार बद्दल उत्सुकता होती आणि बघायची होती पण हिच्यासमोर विषय काढला तर ही वैतागली असती ” आहे ती गाडी काढत नाहीत.” ” नुसती धूळ खायला घेतली आहे” असं बोलून त्याला पूर्ण नकार दिला असता.पुन्हा ते शोरूम शहराच्या दुसऱ्या कोपऱ्याला त्यामुळे ऑफिस वरून येता जाता बघून येणं शक्य नव्हतं. आता समोर त्या कारचं शोरूम दिसत होतं. हिने हमखास असहकार आंदोलन पुकारलं असतं. मग आयडिया सुचली
“अगं तुला मशिनवाली कॉफी प्यायची आहे का?”
ही नाही म्हणणार नाही याची खात्री होतीच.
” हो. पण इथे कुठे दुकान आहे का ?”
” तू चल फक्त” असं म्हणत तिला त्या कार शोरूम मध्ये घेऊन गेलो.
एका दगडात दोन पक्षी. ती पण खुश आणि मी पण.
तिथे मला पाहिजे त्या कार ची चौकशी केली. सगळी माहिती घेतली. टेस्ट ड्राइव्हला मात्र नकार दिला. एवढं सगळं झालं. निघायची वेळ झाली. तरी कोणी चहा कॉफी विचारेना. सेल्समन पण थोडा बेरकीच होता सतत त्याचा फोन चालू होता मध्येच कुठेतरी गायब होऊन जात होता. माहिती मात्र त्याने व्यवस्थित दिली. .
हिच्या लक्षात यायला वेळ नाही लागला की कोफी तो सिर्फ बहाना था. हिने माझ्याकडे बायको मंडळीं वैतागल्यावर नवर्याकडे बघताना चेहऱ्यावरचं हास्य कमी न करता फक्त डोळे बारीक करून जी एक स्पेशल नजर असते त्या नजरेने पाहिले. मी तिला हातानेच ‘थांब बालिके’ असा इशारा केला.
शेवटी मग त्यांचा कस्टमर एक्सपेरियन्स रेटिंग चा कागद आला आणि सेल्समनच्या पण चेहऱ्यावर लगेच स्माईल आलं. आता तो एकदम लक्ष देऊन बघायला लागला.
” सर, आजका आपका जो एक्सपेरियन्स उसको आप १ से १० में से कितना रेटिंग देना चाहेंगे. १ इज व्हेरी पुअर और १० इज एक्ससेलेन्ट.
मी सरळ ७ वर टिक केलं आणि तो हबकलाच.
“सर क्या हो गया. कुछ बात आपको पसंद नही आयी क्या? चाहिये तो आप टेस्ट ड्राइव्ह करके देख लिजिए या मैं आपके घर या ऑफिस लेके आता हूँ.”
मी हिला म्हटलं चल निघूया. तेवढ्यात त्याचा टीम लीडर पण आला आणि त्यांच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये “अरे सर डोन्ट वरी, मैं हूँ ना. आय विल गेट यु द बेस्ट डील ऑन कार” वगैरे मखलाशी सुरु केली.
“बट सर प्रॉब्लेम क्या है वो तो बताईये. आय विल रिसॉल्व्ह इट “
” यार एव्हरीथिंग इस गुड अबाउट द कार.बट प्रॉब्लेम ये है की आगर कोई आपके शोरूम मे शहर से बाहर इतना दूर आता है और यु गायज डोन्ट ह्याव कर्टसी इव्हन तो आस्क फॉर टी कॉफी.अभी ये हाल है तो तो मैं सोच रहा हूँ की आपका आफ्टर सेल्स कैसा होगा?”
बस एवढं ऐकताच टीम लीड बाजूला जाऊन रिसेप्शन , सेल्समन, पॅन्टरी बॉय सगळ्यांवर डाफरला आणि सर प्लिज आप बैठिये करत आम्हाला बसवलं. दोन मोठे मग्स भरून मशिनवाली कॉफी आली. मी गाडी घ्यायची ठरवली तर त्याच्या कमिशन मधूनही तो मला डिस्काउंट देईल असं वचन मिळालं
आणि मग तृप्त मानाने मशिनवाली कॉफी पिऊन आम्ही तिथून बाहेर पडलो.
–अमोल पाटील

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..