नवीन लेखन...

उगाच काहीतरी – ४ (आमच्या आधीच्या पिढीचे दुःख)

आमच्या ओळखीचे एक मावशी आणि काका आहेत. दोघं ही रिटायर्ड शिक्षक. दोघंही उत्तम तब्येत राखून आहेत. मुलं माझ्याच वयाच्या आसपास. मोठा उमेश नोर्वे ला स्थायिक आहे आणि धाकटा राजेश हैदराबादला असतो. मुलं आमची लहानपणापासून मित्र.

मावशी फेसबुक आणि व्हॉटसअप वर फुल्टू ॲ‍क्टिव. काका आपलं काहीतरी थातुर मातुर टाकत असतात जास्त करून या ना त्या पोस्टवर कॉमेंट करत असतात. मावशी मात्र फेसबुक वर सारख्या आपल्या- ‘ पिल्लं घरटं सोडून उडून गेली, पाखरं एकटी राहिली ‘ छाप कविता किंवा ‘ आई वडील मरून 3 दिवस झाले तरी विदेशातल्या मुलांना कळलं नाही.’ अशा बातम्या किंवा मग ‘म्हाताऱ्या पालकांना सोडून दुसऱ्या शहरात गेलेली मुलं ‘ अशा काही पोस्ट फॉरवर्ड करत असतात. त्याला त्यांच्या जेनेरेशन चे बरेच लोकं प्रतिसाद देत असतात.

परवा सहज त्यांच्याकडे गेलो होतो. अशाच गप्पा सुरू झाल्या..
” कसे आहात मावशी – काका ?”
” कसे असणार बाबा, बरेच आहोत” – इति. मावशी
” उमेश , राजेश काय म्हणताहेत? येणार आहेत का इकडे?”
” त्यांचं काय विचारतोस, त्यांना जर एवढी आई वडिलांची पडली असती तर गेले असते का सोडून? इथे एवढं सगळं चांगलं होतं. नोकरी पण मिळाली असती पण नाही यांना दूरच जायचं होतं. राजा राणीचा संसार करायला.”
” हं. मावशी किती वर्ष झाली हो तुम्हाला मुंबईत येऊन?”
” अं….म्हणजे बघ आमचं लग्न झालं आणि लगेच मला वाटतं एक महिन्याने आम्ही मुंबईला आलो. तरी ४०- ४२ वर्ष झाली असतील. का रे?”
” काही नाही. असंच विचारलं. मुंबईला कसं येणं झालं होतं तुमचं?”
” अरे, कसं म्हणजे तिथे गावात काय केलं असतं. एवढं शिकून यांनी शेती नसती केली आणि पुन्हा चांगलं आयुष्य, मुलांना चांगलं शिक्षण, त्यांचं भवितव्य गावात राहून कुठे चांगलं झालं असतं. आता बघितलं ना कसे चांगले सेटल झालेत दोघं. तिथे राहून हे शक्य होतं का?”
” खरं आहे तुमचं. माणसाने प्रगती होईल तिथे गेलं पाहिजे.”
” आता कसं बोललास. तसे मुलं सुट्टीमध्ये जायचे गावी. पण जास्त थांबायचे नाहीत. थोड्या दिवसात कंटाळून जायचे.”
” मग सासू सासरे हे नाही आले का मुंबईला? ”
” अरे आमचंच नाकी नऊ यायचे सगळं मॅनेज करत करत. आणि तसं ही त्यांना इथे येण्यात इंटरेस्ट नव्हता. पण हे न चुकता पैसे पाठवायचे. आणि आम्ही जायचो कधीतरी सुट्ट्यांमध्ये त्यांना भेटायला. अरे, दरवेळेस निघतांना सासूबाई खूप काही बांधून द्यायच्या पण डोळ्यातून पाणी काढायच्या. शेवटी सांगावं लागलं की दरवेळेस असं रडून नाट नका लावत जाऊ . ….थांब चहा ठेवते”
असं म्हणून मावशी आत चहा उकळायला ठेऊन आल्या. काका आपले गुपचूप पेपर वाचत बसलेले होते.
” बरं जाऊ द्या ते सगळं. उमेश, राजेश बोलावतात की नाही तुम्हाला? ”
” ते बोलावतात रे पण आमची काही इच्छा नाही तिथे जायची. मोठा काहीतरी पाठवत असतो नॉर्वे वरून. पण २ – ३ वर्षातून एकदा येतो. राजेश येत असतो अधून मधून. पण तूच सांग त्याला काही अर्थ आहे का? आमच्या जवळ राहिले तर काही वाईट आहे का?”
” मावशी एक बोलू का? ”
” काय रे?”
” तुम्हाला असं नाही वाटत का की तुम्ही तुमच्या वेळेस तुमच्या आणि मुलांच्या बेटर लाईफ साठी जे काही निर्णय घेतले तेच तुमच्या मुलांनी त्यांच्या बाबतीत घेतले. तुम्हीं गाव सोडून मुंबईत आलात. तुमची मुलं मुंबई सोडून दुसरीकडे गेली. फरक एवढाच की तुम्हाला तुमचं दुःख मांडायला सोशल मीडिया मिळालंय आणि तुमच्या सासू सासऱ्याना त्यांचं दुःख दाबून टाकावं लागलं. नाट लागेल म्हणून ती आई नंतर रडू पण शकली नसेल. खरं सांगू का तुम्हीच नाही पण आमच्या आधीच्या म्हणजे तुमच्या पिढीच्या बहुतेक लोकांनी चांगल्या जीवनमानासाठी जे काही केलं तेच तुमच्या मुलांनी केलं तर तुम्ही आता सोशल मीडियावर त्याबद्दल तक्रार करताय. ”

मावशींच्या चेहरा एकदम कठोर झाला. मावशी चिडल्यावर त्यांच्या विद्यार्थ्यांना कशा दिसत असतील त्याचं दर्शन मला झालं. त्या तणतणत उठल्या आणि किचन मध्ये गेल्या.

आतून जोरात आवाज आला,

” आहो, तुम्हाला दूध आणायला सांगितलं होतं ना? आणलं नाहीच वाटतं”.

काकांनी फक्त माझ्या कडे पाहून स्माईल दिलं आणि घसा खाकरत पेपर चे पान पलटले. मला यापुढे चहा मिळणार नाही याची मला खात्री झाली.

सध्या मावशींनी मला गुपचूप फेसबुक वर ब्लॉक केलं आहे आणि मी जाताना कधी दिसलो तर त्यांच्या बरोबरीच्या त्यांच्या मंडळातल्या मावश्या मला पाहून नाकं मुरडताहेत. काका मात्र अजून.

— अमोल पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..