मी हेअर कटिंग सलून मध्ये घुसलो आणि नंबरची वाट बघत बसलो. कटिंगच्या खुर्चीत एक सहावी – सातवीतलं पोरगं बसलेलं. डोक्यावर झुल्पांचं अमाप पीक आलेलं होतं.
” हे वरचे केस तसेच मोठे राहू द्या. साईडनी बारीक करून टाका” – पोरगं रुबाबात सलून वाल्याला म्हणालं.
म्हणजे त्याला क्रू (crew) कट पाहिजे होती पण त्याला काय म्हणतात माहिती नव्हतं.
” घरी विचारून आलाय का असे केस ठेवणार आहेस म्हणून ?” – इति. सलूनवाला. बहुधा काहीतरी जुना अनुभव कडू गाठीशी असला पाहिजे त्याच्या.
” ओ, तुम्हाला काय करायचंय? पैसे मी देतोय ना. तुम्हाला कशाला चौकशा ” – पोरगं अति तुसडेपणाने म्हणालं
एकूण काही पोरांच्या आगाऊपणाने डोक्यात तिडीक जाते नं त्या टाईपचं ते दिसत होतं.
“च्यायला काय आगाऊ पोरटं आहे” – माझ्या नंत्तर आलेलं गिऱ्हाईक पुटपुटलं . मलाही थोडी चीडच आली पण जाऊ द्या आपल्याला काय करायचंय.
त्याची कटिंग झाली. माथ्यावरची मोठी केसं आणि बाजूने मशीन मारून केलेली बारीक कट याने तो स्टायलिश वगैरे न दिसता पानांसकट असलेल्या अननसासारखा दिसायला लागला होता.
आरशात पाहून पोरगं मात्र भलतंच खुश झालेलं दिसलं. चार चार वेळा माथ्यावरच्या केसांवर हात फिरवून पाहिला. खुश तर खुश जाऊ द्या आपल्याला काय करायचंय.
सलूनवाल्याला पैसे देऊन तो निघाला आणि जाता जाता माझ्या पायावर पाय देऊन गेला. माझ्याकडे पाहून काही झालंच नाही अशा तोऱ्यात गेला. मला आता थोडी जास्तच चीड आली. पण तितक्यात सलून वाल्याने खुर्चीत बसायला सांगितलं म्हणून मी आपला खुर्चीत जाऊन बसलो. सलूनवाल्याने नसतं बोलावलं तरी मी त्या पोराला काही बोललो नसतोच कारण वयाच्या मानाने ते जरा जास्तच तोंडाळ दिसत होतं आणि उगाच उलट आपल्याला काही बोललं असतं तर माझा संडे खराब झाला असता. जाऊ द्या आपल्याला काय करायचंय.
माझी कटिंग चालूच होती तेवढ्यात एक धिप्पाड माणूस एखादं गाठोडं हातात धरून आणावं तसं त्या अननसाला धरून सलून मध्ये शिरला. एकंदर अवतारावरून शेठ नको त्या उद्योगातली कोणीतरी मोठी हस्ती असावी असं वाटत होतं. अननसाचं तोंड रडवेले झालेलं दिसत होतं. डोळ्याखाली गालावर थोडा लालसर पणा दिसत होता. जणू अननस पिकायला आलेला होता.
” कोणी सांगितली असली कटिंग करायला? ” – तो धिप्पाड माणूस सलूनवाल्यावर डाफरला.
” शेठ तोच बोलला अशी कटिंग करा म्हणून. मी विचारलं त्याला तुम्हाला विचारलं का म्हणून. ”
तसं शेठ ने खाऊ की गिळू अननसाकडे रागाने पाहिलं. ” काय बोलला होता तू? शांत्या सलूनवाल्यानं नवीन स्टाईल सांगून कापले केसं ”
मी गपगुमान बसून सगळं बघत होतो. म्हटलं जाऊद्या आपल्याला काय कराय…. एक मिनिट… हे अतरंगी आपल्याला पण लात मारून पळालंय.
“शेठ, खरंच शांताराम ने २-३ वेळा विचारलं त्याला घरी विचारल का?” – मी उगाचच मध्ये बोललो.
अननस खाऊ की गिळू अशा नजरेनं माझ्याकडे बघतंय तोवर एक सणसणीत झापड भणकण त्याच्या कानाखाली बसली. आणि अर्धवट पिकलेला अननस पूर्णच लाल झाला. डोळ्यातून धारा व्हायला लागल्या.
“शांत्या मशीन मार सगळ्या डोक्यावर याच्या. एवढे बारीक कर की २-३ महिने तुझ्याकडे यायचं कामच नाही लागलं पाहिजे. अभ्यास नको स्टाईल करायला पाहिजे फक्त साल्याला. ३ विषयात नापास झालय कार्टं. स्टाईल करायचा किडाच काढतो याचा आज मी ”
मी लगेच खुर्चीतुन उठून बाजूला झालो आणि शांत्याने पडत्या फळाची आज्ञा घेऊन लगेच मशीन काढली अन बघता बघता अननसाचे पानं जाऊन फक्त बारीक काटेच राहिले. आता तो अननस काटेरी फणसासारखा दिसायला लागला होता.
अननस घेऊन आलेला शेठ जाताना बखोटयाला धरून तो काटेरी फणस घेऊन गेला आणि मी पुन्हा सलूनवाल्याच्या खुर्चीवर अर्धवट राहिलेली कटिंग पूर्ण करायला निवांत जाऊन बसलो.
— अमोल पाटील.
Leave a Reply