सभागृह तुडुंब भरलं होतं .
व्यासपीठावर गोगटे महाविद्यालयाच्या सहकार अंकाच्या प्रकाशनाचा सोहळा सुरू होता .
त्यावेळी मी विद्यार्थी असल्याने गर्दीत बसलो होतो .
मनात प्रचंड उत्सुकता होती .
आयुष्यातील पहिलीवहिली कथा मी लिहिली होती आणि सहकाराच्या संपादक मंडळाकडे दिली होती .
ती त्यांनी प्रसिद्धीसाठी स्वीकारली की नाही , ते कळलं नव्हतं. त्याचीच उत्सुकता लागून राहिली होती. प्रकाशन झालं आणि सहकारमधील विद्यार्थीलेखकांची नावे घोषित होऊ लागली. ती नावे जाहीर झाली आणि मी नर्व्हस झालो कारण माझे नाव त्यांनी घेतले नव्हते. याचा अर्थ माझ्या कथेची निवड झाली नव्हती. मी घरी जाण्यासाठी उठू लागलो , पण गर्दीमुळे बाहेर पडता येत नव्हतं आणि अचानक टाळ्यांचा गजर सुरू झाला. मी व्यासपीठाकडे पाहू लागलो. सहकाराच्या पारितोषिकांची घोषणा होऊ लागली. ज्याचं नाव घेतलं जातं होतं , तो व्यासपीठावर जाऊन पारितोषिक आणि अंक घेत होता.
शेवटी घोषणा झाली .’ या वर्षीच्या सर्वोत्कृष्ट कथेचं नाव आहे, ज्याचा त्याचा पथ ठरलेला ! आणि लेखक आहे , श्रीकृष्ण जोशी .
क्षणभर सन्नाटा पसरला आणि पुढच्या क्षणी टाळ्यांचा गजर सुरू झाला. माझा , माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता .
माझ्या पहिल्याच कथेला पारितोषिक मिळालं होतं. गुरुवर्य प्रा .बी . के . नेने सर आणि प्रा . सौ. मीनाक्षी केळकर यांच्या निवड समितीने माझ्या कथेची निवड केली होती.
दोन्ही परीक्षक अत्यंत चिकित्सक. इंग्रजी , संस्कृत , मराठी , हिंदी साहित्याचा त्यांचा अभ्यास सर्वश्रुत होता . गाढा व्यासंग होता. त्यामुळं माझ्या कथेत निश्चित वाङ्मयीन मूल्यं त्यांना आढळली असणार , हे निश्चित होतं. मी भांबावल्यागत व्यासपीठावर गेलो आणि पारितोषिक स्वीकारलं. नेने सर आणि केळकर मॅडम कौतुक करीत होत्या पण मला त्याक्षणी काही बोलायला सुचत नव्हतं. मी खाली उतरलो. विद्यार्थ्यांच्या गर्दीत मिसळून गेलो.
त्या कथेची पण एक गंमत आहे. मला मध्यवर्ती कल्पना सुचली ती माझ्या अनुभवामुळे. महाविद्यालयाच्या शेजारीच असणाऱ्या इमारतीतील जिल्हा उद्योग केंद्रात मी तेव्हा शिपायाची नोकरी करीत होतो .अर्थात प्राचार्यांची रीतसर परवानगी घेऊनच . सकाळी नऊ वाजेपर्यंत पिरिअड्सना बसायचं आणि नंतर शिपायाची नोकरी. दोन तीन महिनेच नोकरी केली असेल पण त्या तिथल्या अनुभवांनी खूप काही शिकवलं. गेल्यागेल्या ऑफिस झाडायचं , स्वच्छता करायची , पाणी भरायचं आणि मग प्रत्येक टेबलाजवळ पळत राहायचं . मध्येच जाऊन कॉलेजच्या कॅन्टीनचा चहा आणायचा . तेव्हा मात्र भयंकर वाटायचं .कारण ओळखीचे सगळे विद्यार्थी माझ्या खाकी कपड्यांना , खाकी टोपीला हसायचे .मला कराव्या लागणाऱ्या कामाला हसायचे , बोलून दाखवायचे , पण कुठलंही काम कमी प्रतीचं नसतं , या काकूच्या शिकवणीमुळे मी त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत असे. ऑफिसात तर जाणूनबुजून त्रास दिला जायचा . पण मी गप्प राहून काम करीत असे .
शिपायाची नोकरी तात्पुरती होती. पण अनुभव कायम स्वरूपाचे मिळाले होते. तेच मला कथालेखनाला उपयुक्त ठरले होते आणि वास्तवाधिष्ठित असल्याने असेल कदाचित पण माझ्या कथेला योग्य ते स्थान मिळाले होते .
त्यानंतर अनेक कथांना पारितोषिकं मिळाली पण पहिल्या कथेच्या पारितोषिकाच्या वेळी मिळालेल्या टाळ्या अजूनही कानात गुंजत आहेत .
– दिल्ली येथील दादासाहेब मावळंगकर सभागृहात त्या टाळ्यांची पुनरावृत्ती झाली होती .
आकाशवाणीनं आयोजित केलेल्या अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. माझ्या डेथ ऑफ कॉमनसेन्स या नभोनट्याला अखिल भारतीय स्तरावरचा प्रथम क्रमांक मिळाला होता , त्याचे चौदा भारतीय भाषांत भाषांतर झाले होते. ते पारितोषिक दिल्लीत स्वीकारताना असाच टाळ्यांचा गजर झाला होता .
यशाची सुरुवात गोगटे महाविद्यालयात झाली होती आणि केंद्र शासनाच्या पुरस्काराने त्या यशाला झळाळी लाभली होती .
मात्र शिपायाच्या नोकरीमुळं मी कायम जमिनीवर राहिलो होतो .
– उगवतीच्या त्यावेळच्या कळा सुखद होत्या .
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply