शाळेतल्या दिवसांतील एक लख्ख आठवण !
विद्यार्थ्यांच्या कला गुणांना , लेखनाला वाव मिळावा , त्यांच्या प्रतिभशक्तीला योग्य व्यासपीठ मिळावे , म्हणून प्रत्येक शाळेत हस्तलिखित वा भित्तीपत्रके तयार केली जातात . त्यासाठी जाणकार शिक्षकांचे संपादक मंडळ असते . विद्यार्थ्यांकडून आलेल्या साहित्याची निवड करणे , योग्य ते संपादकीय संस्कार करणे आणि ज्यांचे हस्ताक्षर चांगले असेल त्यांच्याकडून लेखन करवून घेणे ही कामे ते संपादक मंडळ करीत असते. प्रत्येक शाळेत अनेक वर्षे सुरू असलेली ही एक चांगली प्रथा आहे . त्यातून अनेक विद्यार्थ्यांना आपल्यातील प्रतिभाशक्तीचा साक्षात्कार झाला आहे. अनेक लेखकांची पहिली सुरुवात बहुधा अशीच झाली असावी. पण माझ्या लेखणीच्या नशिबी तो योग नव्हता बहुधा.
मी ज्या शाळेत शिकत होतो ती एक नामवंत शाळा होती . सर्व शिक्षक वृंद ज्ञान आणि अनुभवसंपन्न होता . सर्वांबद्दल आदर युक्त भीती वाटायची . त्या शाळेतील अनेक उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित असायचे . हस्तलिखित हा तर खास उपक्रम होता . त्यात आपले साहित्य प्रकाशित होणे हे अभिमानास्पद असायचे .
मी शाळेत असल्यापासून कविता करायला लागलो होतो . त्यात वाङ्मयीन मूल्य किती होते , ते कळण्याचे ते वय नव्हते . मग त्यासाठी एक मार्ग होता . आपली कविता शाळेच्या हस्तलिखितासाठी द्यायची . निवड झाली तर कविता चांगली असं समजायचं , असा एक तेव्हाचा आमचा ठोकताळा होता .
तर मी कविता दिली आणि दुसऱ्याच दिवशी स्टाफरूम मध्ये त्या शिक्षक संपादकांनी बोलावलं. मी उत्साहाने गेलो .
त्यांनी माझ्याकडे एकदा पाहिलं , मी दिलेला कवितेचा कागद परत दिला आणि पुढची दहा मिनिटं ते माझ्या कवितेची खिल्ली उडवीत होते. त्यातले शब्द , मी वापरलेल्या प्रतिमा सगळ्याची त्यांनी यथेच्छ खिल्ली उडवली. स्टाफरूम मधील अनेक शिक्षक हसत होते. मला भयंकर काहीतरी वाटू लागले. मी काहीतरी मोठा गुन्हा केला असेच वाटू लागले.
मी शरमून मान खाली घालून वर्गात येऊन बसलो. शाळा सुटल्यावर खेळायला न थांबता , शाखेत न जाता थेट घरी आलो.
माझा उदास चेहरा बघून काकूने कारण विचारले . ते कळल्यावर ती हसायला लागली.” तू आत्ता लगेच तात्यांकडे जा आणि त्यांना दाखव कविता. काय म्हणतात ते ऐक. ” मी तसाच उठलो आणि तात्यांकडे निघालो .
तात्या म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे खासदार मोरोपंत जोशी. नवकोकण या नावाच्या साप्ताहिकाचे ते मालक , मुद्रक , संपादक होते. तेव्हा आम्ही टिळक आळीत रहात होतो. नवकोकण चा छापखाना आणि कार्यालय टिळक आळीत होते. तात्यासुद्धा टिळक आळीत राहायचे. ते वृद्ध होते , राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याबद्दल सर्वाना आदर होता. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते . मी त्यांना हाक मारली . तेव्हा चष्मा थोडा पुढे ओढून त्यांनी माझ्याकडे पाहिले .
” काय हवंय ?”
मी भीतभीत कवितेचा कागद पुढे केला .आणि सगळं धैर्य एकवटून म्हणालो. ” मी कविता केली आहे , शाळेतल्या हस्तलिखितासाठी सरांनी ती घेतली नाही. तुम्ही वाचाल का? ”
ते हसले , म्हणाले ;
” ठेव त्या पेपरवेटखाली आणि उद्या संध्याकाळी ये , मग वाचून सांगतो .”
त्यांनी सांगितल्याप्रमाणे कविता ठेवली आणि घरी आलो. ती रात्र आणि दुसरा सगळा दिवस मी बेचैन होतो . तात्यानासुद्धा कविता आवडली नाही , तर… याच विचाराची बेचैनी लागून राहिली होती. दुसऱ्या दिवशी शाळेतून घरी न जाता थेट तात्यांच्या नवकोकण मध्ये गेलो. तात्यांसमोर उभा राहिलो. त्यांनी चष्मा काढून हातात घेतला .
” तू काल कविता दिली होतीस ना वाचायला ? वाचली .”
मला काय बोलावं कळेना. मी चुळबूळ करीत तसाच उभा राहिलो.
“तुझी कविता मी नवकोकणच्या अंकात छापायला घेतली आहे . येत्या अंकात आपण ती प्रसिद्ध करू , चालेल ना ? मला तुझी कविता आवडली . आता पुन्हा कविता केलीस की घेऊन ये .”
मी त्यांच्याकडे बघत राहिलो. त्यांच्या शब्दांचा अर्थ मेंदूपर्यंत पोहोचायला वेळ लागला आणि अर्थ कळला तेव्हा आनंदानं उडीच मारली मी.ज्या कवितेची सगळ्यांसमोर खिल्ली उडवली गेली होती , जी कविता हस्तलिखितासाठी योग्य वाटत नव्हती , ती कविता चक्क वृत्तपत्रात प्रसिद्ध होणार होती.
मी तात्यांना नमस्कार करून पळतच घरी आलो. ही बातमी सर्वात आधी मला काकुला सांगायची होती …
– उगवतीच्या त्यावेळच्या कळा शब्दातीत होत्या. माझी जडण घडण होत होती आणि अनेक दीपस्तंभ मला प्रकाशमान करीत होते .
— डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply