खूप वर्षांपूर्वीची गोष्ट !
मी तेव्हा माझ्या हरचिरी या गावी रहात होतो आणि जवळच्या एका हायस्कुल मध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होतो .
– त्यादिवशी शाळेत जाण्यासाठी मी बाहेर पडलो तेव्हा पोस्टमनने एक पत्र माझ्या हाती दिलं. ते मी वाचलं आणि अक्षरश: उड्या मारू लागलो.अण्णांनी (माझ्या वडिलांनी ) विचारलं , ‘अरे काय झालं काय तुला असं वेड्यासारखं उड्या मारायला?’
मी त्यांना ते पत्र दिलं आणि वाचताक्षणीच त्यांच्या आणि मग आईच्यासुद्धा डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी पत्र त्यांच्याच हाती ठेवून शाळेत गेलो पण मन मात्र हवेत तरंगत होतं. खूप काहीतरी वेगळं वाटत होतं. शब्दात व्यक्त करणं अवघड असणारं. अप्राप्य असं काहीतरी हाती लागलं याची जाणीव करून देणारं.
लेखक म्हणून प्रस्थापित होण्यासाठी असणारी दृश्य स्वरूपातली पहिली पायरी खुणवायला लागली होती . १९७३ पासून कविता , कथा लिहीत होतो, त्या प्रसिद्ध होत होत्या , पारितोषिकं मिळत होती. पण पुस्तक प्रकाशित झालं नव्हतं. तो योग , वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आला होता .
पुण्यासारख्या ठिकाणाहून प्रसिद्ध होणारं मेनका मासिक सर्वदूर जात होतं. त्याचा वाचकवर्ग खूप होता. सर्क्युलेशन खूप होतं. संपादक असणारे राजाभाऊ बेहेरे अतिशय चिकित्सक आणि आपल्या मासिकातून प्रसिद्ध होणारा प्रत्येक शब्द तोलून मापून घेणारे ,म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी माझं मूल्यमापन केलं होतं आणि मगच कादंबरी स्वीकारली होती .
क्रमश: प्रसिद्धी , मग पुस्तक , त्याचं योग्य ते करारपत्र, नियमित मिळणारं मानधन आणि मला मिळालेला वाचकवर्ग , त्यामुळं झालेली खूप प्रसिद्धी .
लेखक होणाऱ्याला वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी आणखी काय हवं होतं. मी ग्रामीण भागात राहत होतो. वाङ्मयीन जगतात लागणारी कसलीही ओळखदेख नव्हती. कुणी गॉडफादर नव्हता. तरीही मला यश मिळालं. पण ते वाटतं इतकं सहज शक्य झालं नव्हतं.
शेम्बी ही कादंबरी मी राजाभाऊंकडे ओळखदेख नसताना आगंतुकपणे पाठवली , ती पंधरा दिवसात साभार परत आली, सोबत चुका दाखवणारं पत्र आणि पुनर्लेखन करण्यासाठी आग्रह . मी निराश झालो होतो , पण मनाची समजूत घालून पहिलं बाड फाडून त्यांच्या सूचनेनुसार पुनर्लेखन केलं , त्यांच्याकडे पाठवलं , पुन्हा पंधरा दिवसांनी कडक शब्दात चुका सुधारून पुनर्लेखन करण्या विषयी आग्रह.मी एक महिना दुर्लक्ष केलं . आता त्यांचंच पत्र आलं, कादंबरी लिहून झाली असेल तर लगेच पाठव ,म्हणून. आता मला वाटलं ,ज्या अर्थी संपादक पुन्हा पुन्हा सांगताहेत त्या अर्थी मला अतिशय काळजीपूर्वक लेखन करायला हवं. मी तसं ते केलं आणि अहो आश्चर्यम ! त्यांचं स्वीकृतीचं पत्र आलं.त्या घटनेमुळं मी अंतर्बाह्य बदलून गेलो.
लेखक होणं सोपं नसतं. अभ्यास , व्याकरण , घटनाप्रसंगाकडे पाहण्याची दृष्टी , पात्र आणि प्रसंगासह कथानक मांडणी, आणि असं बरंच काही, मला राजाभाऊंमुळं शिकायला मिळालं. माझं लेखक म्हणून असणं त्या दिवसापासून बदलून गेलं . आपले शब्द अधिक जबाबदारीनं लिहिण्याची एक चांगली सवय हाताला लागली. हे सारंच अविस्मरणीय !
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कथा , कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या आणि मला स्वतःची अशी ओळख दिली. त्यावेळी महाराष्ट्रभर जाणाऱ्या माहेर , मेनका या लोकप्रिय मासिकांमधून आणि रविवारची जत्रा या लोकप्रिय साप्ताहिकामधून त्यांनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली ,जी रत्नागिरीसारख्या ठिकाणी असणाऱ्या मला दुर्मिळ होती .
यथावकाश अन्य पुस्तकं प्रसिद्ध झाली. मानसन्मान , पुरस्कार लाभले. पण त्या पहिल्या पुस्तकाच्या आठवणी काही औरच!
– त्यासुद्धा उगवतीच्या कळाच होत्या. सुखावणाऱ्या आणि पुढच्या प्रवासासाठी शिदोरी असणाऱ्या !
— डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply