हुलकावणी
संधी ही क्षितीज असल्याची जाणीव होते , तेव्हाची गोष्ट !
‘ कॉलेजमधून घरी जाताना माळनाक्यावर थांबा . मी तिथे थांबलो आहे.’ ज्येष्ठ नाटककार प्र.ल मयेकर यांचा निरोप आला म्हणून मी काम संपल्यावर थेट माळनाक्यावर गेलो. प्र .ल. वाट बघत होते.
‘ आपल्याला हॉटेलवर जायचं आहे . तिथे प्रकाश बुद्धिसागर तुमची वाट बघतोय .’ माझ्या स्कुटरवर बसता बसता ते म्हणाले आणि मी स्कुटरला किक मारायला विसरलो.
‘ दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर ? ‘ मी अविश्वासाच्या नजरेतून विचारले . ‘ एवढा मोठा दिग्दर्शक माझी वाट कशाला बघेल?’ ‘ ते त्यालाच विचारा .’ त्यांनी विषय संपवला .आम्ही हॉटेलवर आलो .रूमवर प्रकाशजी वाट बघत होते .
ओळखदेख झाली आणि मी काही विचारायच्या आत प्रकाशजी म्हणाले ,
‘ जत्रा दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेली तुमची कथा मला आवडली , आपण त्याच्यावर काम सुरू करू या . त्या कथेवर मला तुमच्याकडून दोन अंकी विनोदी नाटक लिहून हवे आहे , व्यावसायिक रंगभूमीसाठी .’
‘ अहो पण …’
मला त्यांनी काही बोलू दिले नाही . ते आणि मयेकर माझ्या कथेवर बोलत राहिले . दोघांनीही कथा वाचली होती .
त्यावर्षी जत्रा दीपावली अंकाच्या संपादकांचं पत्र आलं होतं . मी यापूर्वी कधी विनोदी कथा लिहिली नव्हती .
पण त्यांच्या आग्रहाखातर कथा लिहिली होती . आणि अनेकांना ती आवडली होती . आणि बुद्धिसागर , मयेकर यांनाही ती आवडली होती. पण त्या कथेवर नाटक? मी अजून धक्क्यातून बाहेर आलो नव्हतो .
मयेकर व्यावसायिक रंगभूमीवरचे हमखास यशस्वी नाटककार .बुद्धिसागर यशस्वी अभिनेते आणि प्रतिभासंपन्न दिग्दर्शक . त्यांनी दिग्दर्शित केलेली नाटके मी पाहिली होती . हे दोघे एकत्र येण्याऐवजी मला उभं करण्यासाठी दोघे एकत्र आले होते .
शेवटी हो ना करता करता मी नाटक लिहायला तयार झालो . त्याअनुषंगाने खूप चर्चा झाली . दोघांनी अनेक बारकावे समजून सांगितले . एकप्रकारे व्यावसायिक नाटककार होण्यासाठी त्यांनी माझी कार्यशाळाच घेतली .
या काळात माझी संगीत नाटके स्पर्धेत यश मिळवू लागली होती , तो संदर्भ घेऊनच प्रकाशजी आले होते .
त्यानंतर अनेक वेळेला भेटीगाठी झाल्या . संहितेची अनेक वेळेला संस्करणे झाली . चौथ्या वेळी मात्र त्यांना संहिता पसंत पडली . प्र ल आणि प्रकाशजी यांच्यासमोर मी नाट्यवाचन केलं . प्र ल हे मंद स्मित करून दाद देत होते आणि प्रकाशजी एकदम गडगडाटी हास्याने दाद देत होते .पुढचे दोन तास मी केवळ त्यांची चर्चा ऐकत होतो .दिग्दर्शक म्हणून आपण काय काय करणार आहोत , कोणती ट्रीटमेंट देणार आहोत , बिटविन द लाईन्स लाफ्टर मिळवण्यासाठी काय करता येईल या आणि अशा अनेक गोष्टी ते सांगत होते . प्र ल नी दोन अंकात मिळून चार जागा अशा सांगितल्या की तिथे उडत्या चालीची चार गाणी आणखी धमाल उडवू शकणार होती .
‘ नाटकाचे नाव काय ठेवणार ? ‘ प्रकाशजीनी विचारलं .
अरे , चल उचल ! ‘ असं मला सुचलंय . पण तुम्ही अनुभवी आहात , तुम्ही सांगा .’
ते क्षणभर विचारात पडले आणि म्हणाले ,
‘ हेच नाव परफेक्ट आहे . एकदम कॅची आहे . अरे , चल उचल ! आता मुंबईला जातो आणि सुरुवातच करतो कामाला.’
— आणि असंच ते भरभरून बोलत राहिले . मानधन , स्टारकास्ट , प्रॉडक्शन हाऊस …अनेक गोष्टी . ‘खूप दिवसांनी ही दमदार संहिता हाती लागलीय , धमाल उडवून देऊ , काय ..’
त्यांना मी एक प्रत दिली. ते त्या रात्री मुंबईला गेले . नंतर फोनवरून काही दिवस संपर्क चालू होता .
अचानक संपर्क थांबला . मीसुद्धा व्यस्त होतो आणि एके दिवशी प्रलं चा फोन आला .
‘ प्रकाशची बातमी समजली का ? तो आजारी आहे , त्याला चालता येत नाही , बोलता येत नाही .अर्धांगवायू सारखं दुखणं आहे …’
मला धक्काच बसला.अनपेक्षितपणे व्यावसायिक रंगभूमीची संधी आली होती पण ती संधी क्षितिजासारखी दूर गेली होती .
नंतर प्रकाशजी भेटले ते रत्नागिरीतल्या सावरकर नाट्यगृहात . शासनातर्फे माझ्याच हस्ते त्यांचा सत्कार झाला , त्यावेळी आम्ही बोललो . ते महत्प्रयासानं शब्द उच्चारत होते . मला वाईट वाटलं . त्यांनासुद्धा वाईट वाटत होतं .पण परिस्थितीपुढं आपण हतबल आहोत हे आम्ही मान्य करून घेतलं . त्यानंतर त्यांनी आणि मी सुद्धा त्या नाटकासाठी प्रयत्न केले .
पण क्षितीज कधीही हाती आलं नाही . अनेक दिग्दर्शक , निर्माते , स्थानिक संस्था , अनेक जाणकार यांच्याकडे संहिता पाठवून दिली . चर्चा केली . पण त्या संहितेला रंगमंचावरील प्रकाश कधी दिसलाच नाही .
एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत.
मी अजूनही पॉझिटिव्ह विचार करतोय. केव्हातरी अशी संधी नक्की येईल आणि रंगमंचावरून उद् घोषणा होईल ;
“…श्रीनटेश्वर, रंगदेवता आणि रसिकांना अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी, धमाल विनोदी नाटक, अरे , चल उचल ! ”
आणि त्या दिवसाची मी वाट पहात आहे …
— डॉ . श्रीकृष्ण जोशी, रत्नागिरी.
९४२३८७५८०६
Leave a Reply