उजाड जमीन उजेड खाती
पाणी पिऊनी शांत रहाती
उजेड मिळतो क्षणभर तरीही
दाट जंगले सृष्टी जगविती!!
अर्थ–
मागे एकदा सुधागड ला जाताना पाली गावात गेलो होतो. गावात गडाबद्दल विचारणा केली असता सौ पुराणिक यांचे नाव काही लोकांनी सुचवले. कॉलेज प्राध्यापिका, इतिहासात जाणकार त्यामुळे आम्ही त्यांचे घर गाठले. मग ओळख, गडाबद्दल माहिती, काय करता वगैरे विषय झाले. पुराणिक मॅडम त्यांच्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेविषयी उत्साहाने बोलत होत्या, दर पावसाळ्यात आम्ही सुधागडावर वृक्षारोपण करतो. त्यांचा चेहरा अभिमानाने खुलला होता. मात्र ठिकाण तेच असते हे ऐकून माझा चेहरा मात्र हसू की रडू या विवंचनेत पडला. सांगायचं तात्पर्य इतकंच, आपण कुठे काय पेरतो यावर खूप काही अवलंबून असते. मोकळ्या प्रदेशात पाणी मुरतंच नसेल तर तिथे पीक लावण्यात काय अर्थ आहे. जमिनीत पाणी शोषून घेण्याची क्षमता नसेल तर तेथे शेत उगवेल काय? किंवा जमीन पोषक असूनही चुकीचे बियाणे पेरले तर त्याचा उपयोग किती होईल?हा विचार करायला हवा.
हेच आयुष्यात कोणतेही पाऊल टाकताना, कोणा सोबत काय पेरतोय ओळखणे गरजेचे असते. आपलं म्हणणारे पोषक नसून शोषक आहेत हे नंतर कळले तर त्या जमिनीची रान उगवायचीही योग्यता टिकणार नाही हे खरे. मग नुसतेच वृक्षारोपण होत राहील वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply