उजडा फकीर अल्ला जाने
कौन हैं कौन पेहचाने
कुंवा कितना भरा भितर
अंधेरा इतना कोई ना माने!!
अर्थ–
हा व्यक्ती दिसतो तसा नाहीये, त्याच्या कपड्यांवर जाऊ नका, अमुक अमुक ठिकाणी 2 फ्लॅट आहेत याचे, अमुक हिल स्टेशन ला रिसॉर्ट आहे याचं. किंवा याच्या दिसण्यावर जाऊ नका, फिरतो गाडीतून पण देणी इतकी आहेत की कधीही लोकं येऊन मारू शकतात.
अशा प्रकारची माणसं या जगात, आपल्या आजूबाजूला फिरत असतात, कधीकधी आपणही अशा लोकांच्या संपर्कात येतो पण खरं माहीत असूनही आपण कोणास ते सांगायला जात नाही. निदान ते कबूल तरी करत नाही. गोस्सीपिंग च्या नावाखाली दुसऱ्यांची चौकशी आणि चोमडे पणा याला आता कॉर्पोरेट दर्जा मिळाला आहे. पण कोणाचं सत्य किती आहे हे मात्र अजूनही कोणाला ठाऊक नसते.
वेष, भाषा, खाणं, राहणीमान, बोलण्याचा ठेहराव, वैचारिक शुद्धता यावरून माणूस नक्की कोण आहे हे ठरवणे म्हणजे समुद्राच्या तळापाशी जाऊन मोती हुडकून आणण्यासारखे आहे.
सुरतेवर स्वारी करून ती लुटल्यावर, इंग्रज अधिकार्यासमोर जेव्हा महाराज स्वतः आणि त्यांच्या बाजूस बहिर्जी नाईक गेले तेव्हा त्या इंग्रज अधिकाऱ्याने बहिर्जीस पाहून डोळे मोठे केले. त्याचे कारण असे होते की त्याने शंका व्यक्त केली , काही दिवसांपासून आमच्या वखारींच्या बाहेर, ऑफिस बाहेर एक भिकारी बसलेला असायचा. त्याचे कपडे फाटलेले, केस पिंजारलेले असायचे पण, त्याचा चेहरा, त्याचे डोळे मला या बहिरजीं सारखे वाटतायत.
कोण कसं दिसतं यावर त्याचं आयुष्य कसं आहे हे ठरायला लागलं तर तारे तारका अतिशय सुखाचे आणि आनंदाचे जीवन जगतात हा भ्रम खरा ठरेल.
शेवटी कोणाच्या घरात आनंदाची बाव किती भरल्ये हे कळणे कठीणच.
— सुमंत परचुरे.
Leave a Reply