अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली आहे. पं. उल्हास बापट यांनी संगीताचे रीतसर शिक्षण श्रीमती झरीन शर्मा, पं के जी गिंडे आणि पं वामनराव सडोलीकर या संगीत क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तींकडून घेतले. ‘क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत आहे. संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या ‘क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे.
संतूरवर ‘मींड’ काढण्याचीही त्यांची खास पद्धत आहे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही ‘क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करतात. प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपतात. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ वादक आहे. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या ‘संतूरच्या भावविश्वात’ या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी ‘बंदिश’ म्हणून पाहिले आहे व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला आहे.
पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं आहे. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पंचम अर्थात आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले आहे. तसंच पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या “सहज स्वरांतून मनातलं” हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी आहेत. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून सादर केल्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1
Leave a Reply