आपल्याकडे ‘पेराल ते उगवते अशी एक म्हण आहे. ही म्हण तंतोतंत लागू पडणारे जगातील एक प्रमुख राष्ट्र म्हणजे पाकिस्तान. आजवर भारताविरुद्ध आणि जगाविरुद्धच्या दहशतवादाला खतपाणी घालणार्या पाकिस्तानची अवस्था आज दयनीय झाली आहे. तेथे अंतर्गत दहशतवादाने थैमान घातले असून पंजाब या पाकिस्तानचे हृदय समजल्या जाणार्या प्रांतात नुकत्याच झालेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये तेथील गृहमंत्र्यांचा मृत्यू झाला आहे. वास्तविक, पेशावरमधील हल्ल्यानंतर धडा घेऊन पाकिस्तानने दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते; मात्र तेथील सरकार केवळ त्यांच्याविरुद्ध कारवाया करणार्या दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम राबवते आहे. त्याचवेळी अफगाणिस्तानात हिंसाचार करणार्या आणि भारताविरुद्ध कारवाया करणार्या गटांना मदत केली जात आहे. अशाने हे दुष्टचक्र कधीही संपणारे नाही. याची परिणती महाभीषण असेल हे नक्की !
पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे गृहमंत्री शुजा खानजादा हे १५ ऑगस्ट रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये ठार झाले. त्यांच्यावर दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये संरक्षण दलाचे इतर १३ सैनिकही मरण पावले आहेत. तसेच अन्य १७ जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानातील सर्वांत मोठी दहशतवादी संघटना तेहरिक ए तालिबान पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गृहमंत्री खानजादा हे पाकिस्तानी सैन्यामधून कर्नल या पदावरून निवृत्त झाले होते. आपल्या गावामध्ये जनता दरबारामध्ये बोलत असतानाच आत्मघातकी हल्लेखोरोने त्यांच्यावर हल्ला केला. २०१४ मध्येच खानजादा यांनी पंजाब प्रांताचे गृहमंत्री पद स्वीकारलेले होते. त्यानंतर पंजाबमध्ये वाढणारा दहशतवाद निपटून टाकण्यासाठी त्यांनी पुष्कळ प्रयत्न केले होते. मागच्याच महिन्यामध्ये पाकिस्तानमध्ये “पाकिस्तान अल् कायद्याचा” प्रमुख मारला गेल्याची घोषणा केली होती. त्यामुळे त्यांना अनेक दहशतवादी संघटनांकडून धमक्या मिळत होत्या. गेल्या दहा वर्षांपासून पाकिस्तानमध्ये दहशतवाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे. याचे मुख्य कारण पाकिस्तान दहशतवाद्यांना आपले एक सामरिक शस्त्र समजतो. भारताविरुद्ध काश्मिरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून या दहशतवाद्यांचा वापर पाकिस्तानकडून केला जात आहे. पण त्यामुळे दहशतवादाच्या भस्मासुराने थैमान घातले असून तेथे दहशतवाद्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटनांची विभागणी प्रामुख्याने तीन प्रकारात करता येते. यापैकी लष्करे तैय्यबा, हिजबुल मुजाहिद्दीन, जैश ए मोहम्मद यांसारख्या अतिरेकी संघटना या प्रामुख्याने भारताविरोधी कारवाया करत असतात; तर इतर काही संघटना या प्रामुख्याने पाकिस्तानी सरकार आणि पाकिस्तानी सैन्याविरुद्ध त्यांच्याच देशात कारवाया करत असतात. यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करावा लागतो तो तेहरिक ए तालिबान पाकिस्तानचा. याखेरीज तिसर्या प्रकारच्या संघटना या पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षांपासून जोर धरत असलेल्या स्वतंत्रता चळवळींमध्ये सहभागी होताना दिसतात. आज “बलुचिस्तान लिबरेशन आर्मी” ही संघटना वेगळ्या बलुचिस्तानसाठी प्रयत्न करत आहे. याशिवाय सिंध प्रांतामध्येही स्वतंत्रता चळवळ मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. याखेरीज अनेक दहशतवादी संघटना पाकिस्तानातील ख्रिश्चन, शिख, हिंदू आणि मुस्लिमांमधील काही जमाती अशा अल्पसंख्यांकांविरुद्ध कारवाया करत आहेत. अशा संघटनांची संख्याही मोठी आहे.
याशिवाय जगभरात दहशतवाद माजवणार्या काही अतिरेकी संघटनांचे मूळही पाकिस्तानात आहे. यामध्ये तालिबान, अल् कायदाचा उल्लेख करावा लागेल. ह्या संघटना जागतिक दहशतवादी संघटना असून अफगाणिस्तानामध्ये सध्या त्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. हे दहशतवादी गट पाकिस्तानातील वझिरिस्तान, फताह या भागातून अफगाणिस्तानमध्ये हल्ले करतात. पाकिस्तानच्या दृष्टीने चांगले दहशतवादी गट (गुड टेरोरिझम) अशी ज्यांची व्याख्या केली जाते त्यामध्ये फक्त भारताविरुद्ध कारवाया करणार्या अतिरेकी संघटनांचा समावेश आहे. इतर संघटनांकडे पाकिस्तान सरकार वाईट दहशतवादी गट (बॅड टेरोरिझम) या दृष्टीने पाहते. या अतिरेकी संघटनांच्या सततच्या हिंसक कारवायांमुळे पाकिस्तान पूर्णपणे पोखरून गेला आहे. गेल्या काही वर्षांपासून वाढलेल्या हिंसाचाराचे आकडे भीषण आहेत. २००३ पासून १० ऑगस्ट २०१५ पर्यंत पाकिस्तानमध्ये २० हजार ५३२ सामान्य नागरिक, ६२२९ सैनिक आणि पोलिस, ३१६६८ वेगवेगळ्या गटांचे दहशतवादी मारले गेलेले आहेत. म्हणजेच पाकिस्तानमधील हिंसाचार हा भारताच्या तुलनेने दहापटींनी जास्त आहे.
पाकिस्तानातील सर्वच प्रांतात दहशतवाद पसरलेला आहे. पण सर्वाधिक दहशतवादी हे अफगाणिस्तानजवळच्या फ़ाटा (फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरिया) आणि उत्तर वझिरिस्तानमध्ये आहेत. याच भागामध्ये पाकिस्तानी सैन्याविरुद्ध कारवाया करणार्या तेहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेचेही मोठे जाळे आहे. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तानी सैन्य या संघटनेविरुद्ध दहशतवादविरोधी मोहिम राबवण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र यामध्ये त्यांना फारसे यश मिळालेले नाही. पाकिस्तानात घडणार्या हिंसाचाराचा गेल्या एक वर्षाचा अभ्यास केला तर असे दिसते की मरणार्यामध्ये शियांची संख्या लक्षणीय आहे. अनेक सुन्नी दहशतवादी संघटना शियापंथियांना मारण्याचा प्रयत्न करत आहेत.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या “कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजस फ्रीडमच्या” अहवालानुसार २०१४ या एका वर्षामध्ये अल्पंख्यांकांविरुद्ध २२२ हून अधिक दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये ४३० अल्पसंख्यांक मारले गेले असून त्यात शिया, अहमदिया, शिख, हिंदू, ख्रिश्चन यांचा समावेश आहे. तेहरिक ए तालिबान पाकिस्तान ही संघटना सध्या वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी हल्ले करत आहे. यामध्ये सुसाईड बॉम्बिंग म्हणजेच आत्मघाती हल्ले करून पाकिस्तानी सैनिकांना आणि महत्त्वाच्या नेत्यांना मारण्याचा प्रयत्न करत आहे. २०१४ ते २०१५ या काळात या संघटनेने असे अनेक हल्ले केलेले आहेत. यामध्ये सर्वांत भीषण हल्ला हा पेशावरमधील पाकिस्तानी सैन्याच्या शाळेवर केला गेला. या हल्ल्यात १३५ शाळकरी मुले मारली गेली.
यानंतर पाकिस्तान सरकारने या संघटनेविरुद्ध सुरू असलेली युद्धमोहीम अधिक तीव्र केली. या मोहिमेला “झर्ब ए अज्ब” असे नाव आहे. पाकिस्तानी सैन्याने या मोहिमेअंतर्गत एका वर्षामध्ये २००० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यामध्ये यश मिळवले आहे. २०० दहशतवाद्यांना जिंवंत पकडण्यात आले आहे. २६ दहशतवाद्यांना फ़ाशीवर लटकवण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे २०० सैनिक मारले गेले असून अनेक जण जखमी झालेले आहेत. तथापि, पाकिस्तानी लष्कराने मारलेल्या या दहशतवाद्यांच्या आकडेवारीला तेथील माध्यमांकडून दुजोरा मिळताना दिसत नाही. याचे कारण ज्या भागात ही मोहीम सुरू आहे तेथे माध्यमांना मज्जाव करण्यात आला आहे. त्यामुळे मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या आकडेवारीवर विश्वास ठेवता येत नाही. आत्मघाती हल्ल्यांबरोबरच तेहरिक ए तालिबान पाकिस्तान ही संघटना मोठ्या प्रमाणावर बॉम्बस्फोट आणि गोळीबारही करत आहे. या संघटनेने पाकिस्तानच्या नाविक तळांवर आणि विमानतळांवरही हल्ले केलेले आहेत.
आज पाकिस्तानमध्ये शस्रास्रे आणि दारूगोळा हा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. असे मानले जाते की, पाकिस्तानमधील प्रत्येक नागरिकासाठी दोन एके-४७ रायफल्स उपलब्ध होऊ शकतील, इतकी ही शस्रांस्रांची संख्या मोठी आहे. यामुळे कोणत्याही दहशतवादी संघटनांना हत्यारांची, दारुगोळ्याची वा बॉम्बस्फोट घडवण्यासाठी आवश्यक सामग्रीची कधीही कमी पडत नाही.
या दहशतवादाने संपूर्ण पाकिस्तानला विळखा घातला असला तरी अफगाणिस्तानच्या सीमेलगतच्या फ़ाटा या भागात तो सर्वाधिक प्रमाणात आहे. २०१४ च्या आकड्यांनुसार या भागात २८०० हून अधिक नागरिक मारले गेले आहेत. सिंध प्रांतात ११८०, बलुचिस्तानमध्ये ६४३, पाकव्याप्त काश्मीरमध्ये ६१७ आणि पंजाब प्रांतामध्ये १८० नागरिक २०१५ सालात मारले गेले आहेत. म्हणजेच हिंसाचाराच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर पंजाब प्रांतात तो सर्वांत कमी आहे. पंजाबला पाकिस्तानचे हृदय मानले जाते. याचे कारण पाकिस्तानचे बहुतेक राजकीय नेतृत्त्व, सैनिक आणि आर्थिक शक्ती ही या प्रांतातून येत असते. आता मात्र तहरिक ए तालिबान पाकिस्तान या संघटनेने पंजाब प्रांतामध्येही प्रवेश केलेला आहे आणि तेथील हिंसाचारही वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाज हुसेन हे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सख्खे भाऊ आहेत. लष्करे तैय्यबा, जमात उल दवा यांसारख्या अतिरेकी संघटनांना सरकारकडून मदत मिळवून देण्याच्या कामी शाहबाज हे अग्रेसर आहेत.
एकूणच, पाकिस्तानमध्ये अतिशय विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. भारताविरुद्ध कारवाया करणार्या अतिरेकी संघटनांना पाकिस्तान सरकारकडून मदत केली जाते. दुसरीकडे पाकिस्तान सरकार आणि सैन्याविरुद्ध कारवाया करणार्या अतिरेकी संघटनांविरोधात लष्कराने “झर्ब ए अज्ब” ही युद्धमोहीम सुरू केलेली आहे. तिसरीकडे अल् कायदा आणि अफगाणिस्तानमध्ये काम करणार्या दहशतवाद्यांना पाकिस्तान मदत करत आहे. पाकिस्तानातील सामान्य जनता आणि अनेक राजकीय नेते हे या सततच्या दहशतवादाला कंटाळलेले आहेत. या सर्वांकडून दहशतवादाला कडाडून विरोध होत असून दहशतवादाची ही विषवल्ली पाकिस्तानमधून कायमची उखडून टाकण्याची मागणी सरकारकडे पुन्हा पुन्हा केली जात आहे. नवाझ शरीफ यांनीही आम्ही पाकिस्तानातून दहशतवादाचे उच्चाटन करू अशा प्रकारच्या घोषणा अनेकदा केल्या आहेत. पण केवळ घोषणाबाजीच होत आहे. प्रत्यक्षात अंमलबजावणीसाठी पाकिस्तानचे सैन्य त्यासाठी तयार आहे असे दिसत नाही.
भारतामध्ये आपण दहशतवादविरोधी अभियान राबवतो त्यावेळी आपले फक्त सैन्य हातातील शस्रांच्या साहाय्याने या अभियानात सहभागी होतात. पाकिस्तानात मात्र अशा प्रकारच्या अभियानामध्ये हवाई दल, आर्टिलरीच्या मोठ्या तोफा, हेलिकॉप्टर्स, रणगाडे आदींचाही वापर होत आहे. मात्र त्यामुळे प्रत्यक्षात खरे दहशतवादी मारले जाण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांचाच जास्त हकनाक बळी जात आहे. याचा परिणाम उलटा होताना दिसत आहे. त्यातून शेकडो नवीन युवक दहशतवादी बनून पाकिस्तानी सैन्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी तयार होताहेत. यामुळे पाकिस्तानमधला हा दहशतवाद कधीही न संपणारा दहशतवाद आहे. इतका हिंसाचार होत असूनही पाकिस्तान सरकारला ही गोष्ट लक्षात येत नाही, हे अनाकलनीय आहे. वास्तविक, पाकिस्तानी सरकारने पूर्ण देशभरात दहशतवादविरोधी मोहीम राबवणे गरजेचे आहे. पण तसे होत नाही, कारण पाकिस्तान सरकार, सैन्य आणि आयएसआय यांना ते नको आहे.
अफगाणिस्तानमधून अमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर अर्ध्याहून जास्त अफगाणिस्तानवर आपला ताबा राहण्याच्या दृष्टीने त्यांना या दहशतवाद्यांची गरज आहे. वास्तविक, अफगाणिस्तानमध्ये काय होईल? तेथे पाकिस्तानचे नियंत्रण राहील का? तेथिल दहशतवाद, हिंसाचार थांबेल का? हे येणारा काळच सांगेल. पण सध्याची परिस्थिती पाहता अफगाणिस्तानमधील हिंसाचार हा वाढण्याची शक्यता अधिक आहे. या विषारी खेळामध्ये पाकिस्तानचे आणि त्यांना मदत करणार्या चीनचे हात भाजणार आहेत हे नक्की. पण तरीही पाकिस्तान यापासून काहीही शिकायला तयार नाही.
दुसरी एक महत्त्वाची घटना अशी की इसिस ही दहशतवादी संघटना आता पाकिस्तानमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांनी पाकिस्तानमधील इसिसच्या गटाकरिता एका पाकिस्तानी नागरिकाची प्रमुखपदी नियुक्ती केली आहे. अमेरिकन गुप्तहेर खात्याच्या माहितीप्रमाणे इसिसला पाकिस्तानमधून मोठ्या संख्येने युवक मिळत आहेत. ही अतिशय चिंतेची बाब असून येत्या काळात पाकिस्तानातील हा दहशतवाद अतिउग्र रूप धारण करणार असे दिसते आहे. या सर्वांमुळे पाकिस्तान हे न संपणार्या विवरामध्ये अडकलेले आहे आणि यातून बाहेर पडण्याची शक्यता दिसत नाही.
Leave a Reply