महिला दिनाच्या शुभेच्छा देतांना महिलांच्याच एका प्रश्नाकडे आपलं लक्ष वेधून घ्यावं असं वाटत..
आंतरराष्ट्रीय महिला दिन व महिला पोलिस काॅन्स्टेबल्स/सुरक्षा रक्षकांचा गणवेश..
‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’च्या निमित्ताने माझ्या मनात बरीच वर्ष रेंगाळणारा एक प्रश्न आपल्यासमोर ठेवतो. मुळात हा प्रश्न आहे की नाही हे मला नीट्सं कळत नाही, तरी त्यामुळे मी अस्वस्थ होतो हे खरं..!
हा प्रश्न आहे महिला पोलिसांच्या गणवेशाविषयीचा..महिला पोलिसांना जो ‘पुरूषी’ गणवेश दिलाय तो त्यांना योग्य नाहीय असं मला वाटतं. म्हणजे असं मला वाटतं, प्रत्यक्ष तो पोशाख परिधान करणारांना वाटतं की नाही हे कळण्यास काही मार्ग नाही.
जगातल्या कोणत्याही भागातल्या स्त्री-पुरूषांचा वेष त्या त्या भागातील हवामान, संस्कृती आणि मुख्य म्हणजे लाजेच्या त्या त्या समाजातील संकल्पाना यावर अवलंबून असतो. जगभरातील महिलांचं शरीर, शरीर धर्म आणि स्त्री सुलभ स्वभाव साधारणत: सारखाच असला तरी स्त्रीकडे बघण्याचा त्या त्या समाजाच्या व स्वत: स्त्रीच्याही कल्पना भिन्न असू शकतात, नव्हे असतातच. या पार्श्वभुमीवर खऱ्या स्त्री-पुरूष समानतेपासून कोसो दूर असलेल्या आपल्या देशातील/समाजातील महिला पोलीस काॅन्स्टेबल अथवा महिला सुरक्षा रक्षक यांना जो पुरूषी गणवेश मुक्रर केलाय, तो त्यांच्यासाठी योग्य नाही असं माझं मत आहे. केवळ वेश पुरूषी केल्याने समानता येणार नाही, तर त्यासाठी ‘नजरे’त समानता बिंबवावी लागेल हेच आपल्याला (माझ्यासहीत) अजून कळलेलं नाही.
महिलां पोलिस अथवा महिला सुरक्षा रक्षकांना पुरूषांसाठी बनवलेल्या व पुरूषांना सोयीचा असलेल्या गणवेषात का कोंबलं जातंय हे माझ्या लक्षात येत नाही. मी फक्त महिला काॅन्स्टेबल/सुरक्षा रक्षक येवढ्यासाठीच म्हणतोय कारण त्यांचा संपर्क सातत्याने ‘पब्लिक’शी येत असतो. याच किंवा इतरही गणवेशीय व्यवसायात वरिष्ठ पदावर काम करणाऱ्या महिलांच्या गणवेषाविषयी मी काही बोलणार नाही कारण त्यांचा संबंध पब्लिकशी फारसा येत नाही.
महिला काॅन्स्टेबल्स/सुरक्षा रक्षक यांच्यावर काही विशिष्ट जबाबदारी असली तरी त्या प्रथम आपण शरीराने स्त्री आहोत हे विसरू शकत नाहीत व स्त्री शरीराच्या ‘शरीर धर्मा’विषयी, विशेषत: ‘त्या” दिवसाच्या आगेमागे त्या नेहेमी अलर्ट राहातात हे सॅनिटरी नॅपकीनच्या जाहिरातींमुळे कळतं. त्यात त्यांना जीथे ड्युटीवर पाठवलं जातं, त्या प्रत्येक ठिकाणी ‘स्वच्छ’तागृहाची सोय असते असंही नाही. स्त्रीने स्वत:विषयी येवढं अलर्ट असणं म्हणजे त्यांच्यावर सोपवलेल्या जबाबदारीकडे काहीसं दुर्लक्ष होण हे ओघानेच येत.
पुन्हा आपला समाज (यात त्या त्या दलातले वरिष्ठ पुरूषही आलेच) संपूर्ण कपडे परिधान केलेल्या स्त्रीच्या ‘शरीरा’कडे, मग ती कोणीही असो, ज्या ‘एक्स-रे’ नजरेने बघतो, त्या नजरेचा जाच व त्रास पुरूषी गणवेश घातलेल्या स्त्रीला होत नसेल असं म्हणणं धार्ष्ट्याचं होईल.
आपल्या समाजात स्त्रीचं सार शरीर झाकून वर तीचं स्त्रीत्वही सुरक्षित आहे अशी भावना निर्माण करणारा ‘पंजाबी ड्रेस’ हा एकमेंव वेष आहे असं मला वाटतं. साडीही असली तरी ती पंजाबी ड्रेसप्रमाणे सुटसुटीत नाही. शिवाय पुरूषांच्या पॅन्टसारखाच बा वेषही काम करतो, उलट महिलांना कमरेखाली व वरही तसल्या ‘नजरां’पासून जास्त प्रोटेक्शन देतो याबद्दल दुमत होऊ नये. या प्रकारच्या पोशाखामुळे स्त्रीच्या स्त्रीत्वाचाही सन्मान राखला जाईल असं वाटतं. मग पॅन्ट-शर्ट ऐवजी असा एखादा डौलदार गणवेश जनतेत निम्न पातळीवर काम करणाऱ्या महिला काॅन्स्टेबल अथवा सुरक्षा रक्षकांसारख्या व्यावसायीकांसाठी डिझाईन करावासा का वाटत नाही कुणाला.
‘महिला दिना’च्या निमित्ताने मला भेडसावणारा हा प्रश्न मी तुमच्यासमोर मांडलाय. तो योग्य आहे अथवा नाही यावर चर्चा होऊ शकते. असा ड्रेस मंजूर करताना तळातल्या काम करणाऱ्या स्त्रीला विचारात घेतलं होतं की नाही मला माहित नाही परंतू घेतलं नसेल तर तिचाही विचार केला जायला हवा होता असं मला वाटतं. मुळात त्या महिला आहेत याचा तरी विचार झाला होता की नाही कुणास ठावूक..! अर्थात पोषाख बदलून फारसं काही होईल असं नाही, ‘नजरा’ बदलणं हा हमखास उपाय पण तो नजिकच्या भविष्यात तरी शक्य होईल असं वाटत नाही..!!
जयहिन्द.
-नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply