माझ्याकडे शिकणारी लहानशी सात वर्षांची ‘समृद्धी’…तिने माझ्याकडे नृत्याचे धडे घ्यायला सुरुवात केली त्याला आता एक वर्ष झालंय..तिच्या वडिलांची, नोकरीमुळे इथे वर्षभरापूर्वी बदली झाली , नाहीतर हे कुटुंब मूळचं कोलकाता चं, बंगाली बोलणारं . आई वडील, समृद्धी व दोन वर्षांची धाकटी बहीण असं यांचं छोटं चौकोनी कुटुंब.
वर्षभरापूर्वी समृद्धीने डान्स शिकायला सुरुवात केली तेव्हा तिला खूप कठीण जात होतं. भरतनाट्यम च्या बेसिक पोझिशन्स करण्यापासून ते इतर गोष्टींपर्यंत. मात्र अतिशय मेहनती मुलगी आहे ती. या एका वर्षात तिने स्वतःला इतकं तयार नक्की केलं कि गेल्या रविवारी झालेल्या क्लास च्या वार्षिक कार्यक्रमात आत्मविश्वासाने आणि अतिशय प्रसन्न चेहऱ्याने स्टेज वर नाचणाऱ्या या मुलीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं . तिची ताई म्हणून मला तिचं खूप कौतुक वाटलं .
समृद्धी मूळची बंगाली भाषिक असल्यामुळे तिला आजही हिंदी व इंग्रजी भाषेचा अडसर जाणवतो . घरात बंगाली बोलणारी लोकं , वडिलांना जरी इंग्रजी येत असलं तरी काम सांभाळून ते तिला किमान इंग्रजी बोलायला शिकवू शकतील एवढा वेळ ते देऊ शकत नाहीत. समृद्धी ची आई बेताचं हिंदी बोलणारी , इंग्रजी फारसं बोलता न येऊ शकणारी. असं जरी असलं तरी स्वतः बंगाली साहित्यात मास्टर्स केलेल्या त्याही उच्च विद्या विभूषित आहेत हे विशेष सांगण्या सारखं.
मात्र केवळ प्रांत वेगळा , भाषेचा अडसर म्हणून आजही भाषेशी संबंधित त्यांच्या समस्या सुटलेल्या नाहीत. राहणाऱ्या सोसायटीत त्यांच्याशी हाय बाय पलिकडे फारसं कुणी बोलत नाही. का तर हे परप्रांतीय आहेत . आणि दुसरं म्हणजे त्यांची भाषा आपली नाही आणि ते ज्या पद्धतीने तोडकं मोडकं हिंदी बोलतात तेही आपल्याला समजत नाही. तर मग सोपा उपाय काय तर त्या कुटुंबाशी बोलायला जायचं नाही. आणि हे अगदी मोठ्यांपर्यंत मर्यादित नाही तर लहान मुलांमध्ये सुद्धा आहे. अशामुळे समृद्धीलाही खेळायला कुणी घेत नाही हे आज तिच्या आई कडून कळल्यामुळे मला वाईट वाटलं.
ते परप्रांतीय नक्कीच आहेत , त्यांना इथलं होण्याकरता इथली भाषा अवगत होणं गरजेचं आहे हेही बरोबर. ती त्यांनी शिकली पाहिजे हेही बरोबर . पण म्हणून त्यांना आपलंसं न करणं बरोबर आहे का? भाषा ते तेव्हाच शिकतील जेव्हा ती भाषा बोलणाऱ्या माणसांमध्ये त्यांचा वावर वाढेल आणि ती भाषा त्यांच्या कानावर जास्त वेळ पडेल. तसं झाल्यास त्या प्रांताची भाषा (उदा. मराठी) किंवा राष्ट्रभाषा हिंदी हि सुद्धा बोलता बोलता त्या कुटुंबाला अवगत होईल.
याकरता त्यांच्याशी ओळख करून घेण्याचा पुढाकार कुणी घ्यायला नको का? आम्ही इथले नाही म्हणून आमच्याशी कुणी ओळख करत नाही पण मी कुणाशी बोलायला गेले तर माझ्याशी बोलायची कुणाची इच्छा दिसत नाही हे आज बोलता बोलता समृद्धी च्या आई ने माझ्याशी शेअर केलं .
आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाली खरी पण आपल्या विचारांच्या कक्षा आजही रुंदावलेल्या नाहीत. विविधतेत एकता वगैरे वगैरे आपण शिकतो पण जेव्हा ती एकता दाखवण्याची वेळ येते तेव्हा मात्र आपण केवळ ,आपलं शहर , आपली भाषा , आपली माणसं इथपर्यंत मर्यादा घालून घेतो. गॅजेट्स वापरताना आपण स्थल , काल , अवकाश याच्या मर्यादा झुगारून देतो मात्र माणूस भलेही भारतीय असो पण मराठी भाषिक नाही, परप्रांतीय आहे म्हटल्यावर त्याला भिरकावून देतो.
अशावेळी पुण्यात स्थायिक झालेल्या एखाद्या बंगाली कुटुंबाला left out वाटतं . इथे कुठेही भारतीयत्वाची भावना आपल्याला आठवत नाही. त्यांना आपल्यातलं एक होण्याकरता पुढाकार घेणं हे एक भारतीय म्हणून आपलं कर्तव्य नाही का हा विचार त्यांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांनी करायची गरज आहे.
माझ्याकडून मी क्लास च्या थोडा वेळ आधी समृद्धी चा स्पोकन इंग्लिश चा अभ्यास घ्यायचा प्रयत्न करते. ती हिंदी बोलता बोलता त्यातलं व्याकरण ठीक करून तिला पुन्हा ते वाक्य सांगते. याने तिच्या नकळत तिचा हिंदी आणि इंग्रजी चा अभ्यास होत राहतो. हा मी उचललेला खारीचा वाटा.
या सगळ्या पलीकडे जाऊन समोरचा माणूस आपली मातृभाषा बोलणारा नाही तरीही भारतीय आहे याचं भान ठेवून त्या व्यक्तीला किंवा कुटुंबालाही आपल्यात सामावून घेण्याकरता प्रयत्न केले पाहिजेत. यातूनही आपलं राष्ट्रप्रेमंच दिसणार आहे.
असं न केल्यास भारतात नुसतीच विविधता दिसेल..एकता मात्र हरवून जाईल …there will be only diversity, but no unity…
हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे एकतेची भावना निर्माण होईलच. याशिवाय आपण आपल्याकडून आपल्या आसपास असलेल्या अशा एखाद्या कुटुंबालाही आपल्यात सामावून घेऊन एकतेची भावना जागृत ठेवूया.
जय हिंद ??
— गौरी पावगी
Leave a Reply