आपले आयुष्य उभे करणे हे कष्टाचे काम असते हे खरेच, पण कृतार्थ आणि कीर्तिमान जीवन उभे करणे हे तर आणखीनच कष्टाचे काम आहे. त्यासाठी एखाद्या मोठ्या ध्येयाचा ध्यास घ्यावा लागतो. एखादे स्वप्न पाहून, ते पूर्ण करण्यासाठी अविश्रांत श्रम करावे लागतात. असे कितीतरी थोर लोक आपल्या आजूबाजूला असतात. अगदी वर्तमानातलेच एक उदाहरण पाहा ना! आधी बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनाचे एक स्वप्न पाहिले, त्यासाठी ते आयुष्यभर झटले. विकास आमटे आणि प्रकाश आमटे हे दोघे भाऊ त्याच ध्येयाने पछाडून पित्याच्या वाटेवर चालत राहिले. आणि आता या दोघांची मुलेही घराण्याचा वारसा चालवत आहेत. आपल्यासारखे सामान्य लोक स्वार्थातच रमलेले असतात. आपण आपल्या आत्मस्वरूपाचा शोध घेणे, त्यातून बोध घेणे आ त्यानुसार आपले जीवन जगणे म्हणजेच परमार्थ असे जीवन अल्प काळात घडत नाही. ते घडवावे लागते आणि त्यासाठी रोजच्या रोज प्रयत्न करावे लागतात. अशा प्रयत्नांनाच आपण उपासना म्हणतो. उपासना म्हणजे देवाजवळ राहण्याचा सतत अभ्यास. उपासनाच नसेल, तर माणसाच्या हातून निर्मळ कृती होत नाही. फक्त स्वार्थाचाच विचार असला आणि ईश्वराचे स्मरण नसले, तर तिथे शुद्धता राहात नाही. ‘ईश्वराला आवडेल, असेच काम मी करेन, इतरांना त्रास होईल असे काम माझ्या हातून होणार नाही.’ असे आपण जोपर्यंत ठरवत नाही, तोपर्यंत बऱ्यावाईटाचा विधिनिषेध आपल्याला राहू शकत नाही.
विधिनिषेध नसणाऱ्या मनोवृत्तीतूनच भ्रष्टाचारांचा जन्म होतो. या अष्टाचारातून समाजात अगदी निर्माण होते. याचे कारण असे की वाईटापासून परावृत्त करणाऱ्या कोणत्याही विचाराला तिथे जागे नसते. कोणताही अंकुश नसतो. हाच अंकुश उपासनेमुळे निर्माण होतो. यावर कोणी म्हणेल की सत्ताधीश किंवा श्रीमंत लोक उपासना करत नाहीत. पण आपण एक गोष्ट विसरतो. या लोकांचे यश हे वरवर दिसणारे असते. ते सतत भयभीत असतात. त्यांच्या वागण्यात प्रेमळपणा, ममता दिसत नाही. उपासनेमध्ये माणसाचे जीवन अंतर्बाह्य बदलण्याची शक्ती आहे. संत रामदासांनी लोकांना रामाची आणि मारूतीची उपासना दिली. या दैवतांची गुणवैशिष्ट्ये आपल्यात आली पाहिजेत, असा आग्रह धरला. उपासना म्हणजे कर्मकांड नाही. कर्मकांडाचे स्तोम माजवू नये, हे तर खरेच. पण कोणत्या ना कोणत्या देवाची उपासना अवश्य केली पाहिजे. त्यातूनच आपले जीवन घडू शकते.
-वेणुगोपाल धूत
Leave a Reply