आपण रोजच्या जीवनात अनेक व्यक्तींना भेटत असतो किंवा काही व्यक्ती विविध कारणांमुळे आपल्या संपर्कात येत असतात. यातील काही व्यक्ती कायम संपर्कात असल्याने आपल्या लक्षात राहतात तर काही व्यक्ती या दूर गेल्या तरी काही विशिष्ट कारणाने किंवा त्यांच्या विशेष गुणवैशिष्ट्यामुळे आपल्या लक्षात राहतात. मात्र काही व्यक्ती अशा असतात की ज्या आपल्या बरोबर वावरत असतात व त्या आपल्या जिवनात किंवा एकुणच समाजात महत्त्वाचा भाग असतात.पण कोणाचेच त्या व्यक्तीला फारसे महत्त्व वाटत नसते, व कालौघात अशा व्यक्ती विसरल्या जातात.
आपल्या ईतिहासात किंवा पौर्वाणीक महाकाव्यात आपल्याला अनेक व्यक्तीमत्वाची महती सांगीतली जाते. रामायण व महाभारत ही आपली दोन महाकाव्ये ज्यात अनेक व्यक्ती महत्वपूर्ण आहेत. रामायण हे असेच एक महाकाव्य ज्यातील प्रत्येक पात्राचे काही वैशिष्ट्य आहे व त्या पात्राची आपल्याला चांगली ओळख आहे कारण त्यात त्या त्या पात्राला रचनाकारांनीही महत्व दिले आहे. आता आपण ज्या व्यक्तीमत्वाचा एक दुर्लक्षित व्यक्ती म्हणून विचार करणार आहोत ती व्यक्ती म्हणजे रामायण या महाकाव्यातील रामाचा प्रिय बंधू लक्ष्मण याची पत्नी ऊर्मिला. संपुर्ण रामायण वाचताना आपणास रामायणातील विविध व्यक्ती अगदी सुग्रीव, वाली, अंगद, नल,नील ही वानरसेना ईतकेच काय समुद्रावर सेतू बांधताना मदत करणारी खारोटी, जटायू पक्षी या प्रत्येकाला महत्व दिल्याचे दिसून येते. मात्र रामायण वाचताना कोठेच लक्ष्मण पत्नी ऊर्मिला या व्यक्तीला फारसे महत्व दल्याचे आढळत नाही.त्यामुळे ती कोणाच्याही लक्षात रहात नाही.
राजा जनक याची कन्या व जानकीची लहान बहीण. राम सीता यांच्या बरोबरच लक्ष्मण व ऊर्मिला यांचा विवाह होतो व सीतेच्या बरोबरच तीनेही अयोध्या नरेश राजा दशरथ यांची स्नुषा म्हणून रघूकुळात प्रवेश केला. पुढे जेव्हा रामास १४ वर्षे वनवासात जायची वेळ येते तेव्हा त्याची पतीव्रता पत्नी म्हणून सीता वनवासात जाण्याची तयारी करते व जेष्ठ भावाप्रती कर्तव्य म्हणून लक्ष्मणही वनवासात जातो. भरत रामाच्या पादुका गादीवर ठेऊन रामाच्या नावाने राज्य करतो. रामायणात या प्रत्येक व्यक्तीने केलेल्या त्यागाची महती गायली आहे. प्रभू रामचंद्र यांनी पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून राज्य त्याग करून वनवास पत्करला. सितेने आपली पतीनिष्ठा म्हणून राजमहालातील सुख ऐश्र्वर्य यांचा त्याग करून पतीसोबत वनवासात जाण्याचा निर्णय घेतला. लक्ष्मणाने जष्ठ भावाप्रती असलेले कर्तव्य व भावावरील प्रेम म्हणून राम व सीता यांच्या बरोबर वनवास पत्करला. तर भरताने मिळालेले राज्य रामाच्या पादुका सिंहासनावर ठेऊन राज्यकरुन बंधूप्रेम एका ऊच्च पातळीवर नेले.
या सर्व बाबतीत विचार केला तर वरील प्रत्येक व्यक्तीचे कार्य व त्याग व समर्पणाची भावना उच्च कोटीची होती हे निश्र्चीतच मान्य पण मग या सर्वांमध्ये ऊर्मीलेची काहीच भूमिका नव्हती का. रामायणाची निर्मीती करणारे महर्षी वाल्मीकी व तुलसीदास यांचे सारखे संत व नंतरच्या ईतीहासकारांनी ऊर्मीला हे पात्र का दुर्लक्षीत केले असेल याची उत्तरे मिळत नाहीत. किंबहुना ते उत्तर मिळावे हाही माझा उद्देश नाही. त्यामुळे जेव्हा आपण तिचा एक स्त्री म्हणून विचार करतो त्यावेळी कुठेतरी तिच्यावर अन्याय झालाय व तिचे समर्पण व तिने केलेला त्याग हा वरील सर्व व्यक्तींपेक्षा ऊच्च कोटींचा होता हे मान्य करावे लागेल. कोणतीही स्त्री जेंव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा तीची काही स्वप्ने असतात. ऊर्मीलेची सुध्दा तशीच स्वप्ने असू शकतात. कोणत्याही स्त्री प्रमाणे पतीची सेवा करुन आपल्या प्रिय पतीच्या सहवासात व प्रेमात रहावे अशी तीचीही साहजिकच ईच्छा असणार. पण ते सुख व पतीचे प्रेम तिच्या नशिबात वाट्याला आले नाही हेच खरे. किंबहुना तिचे नशीब हे राम व सीता यांच्या नशीबाशी नियतीने बांधले होते असेच म्हणावे लागेल. अन्यथा कैकयीने फक्त रामालाच वनवास मिळावा असा वर मागीतला होता पण तो वनवास वेगळ्या अर्थाने ऊर्मीलेला भोगावा लागला. पती असताना पतीशिवाय तिला १४ वर्ष एकाकी आयुष्य घालवावे लागले.ते आयुष्य किती वेदनादायक असू शकते हे फक्त एक स्त्रीच समजू शकते. सीतेने रामासह वनवासात जाचचा निर्णय घेतला हा तिचा निश्र्चीतच त्याग होता पण वनवासात सुध्दा तिच्या सोबत तिचे पती राम सोबत होते व पतीसहवास होता. पण ऊर्मीलेची अवस्था तर याहून कठीण होती. त्यामुळे तिचा त्याग हा अधिक श्रेष्ठ ठरतो. पण संपूर्ण रामायणात सितेच्या त्यागाचे गोडवे गायले गेले. बरोबरीने लक्ष्मण व भरत याच्याही त्यागाची चर्चा झाली अगदी रावणाचा भाऊ बिभीषण सर्व वानरसेना यांनाही महत्त्व मिळाले. फक्त उपेक्षित राहिली ती लक्ष्मणाची पत्नी ऊर्मीला. कदाचित नियतीला हेच मान्य असावे एवढेच आपण म्हणू शकतो. तिच्या निस्सीम त्यागास व समर्पणास शतकोटी प्रणाम.
सुरेश काळे
सातारा
१८ मार्च २०१८