हिंदी चित्रपट सृष्टीतील छम्मा-छम्मा गर्ल उर्मिला मातोंडकरचा जन्म ४ फेब्रुवारी १९७४ रोजी झाला. “मासूम’ चित्रपटातील “लकडी की काठी… काठी पे घोडा’ गाण्यावर नाचणारी छोटी ऊर्मिला मातोंडकर आठवत असेलच. लहान भावांबरोबर नाचतानाचे तेव्हाचे तिचे चेहऱ्यावरील निरागस भाव आजही नजरेसमोरून तरळतात. आजही उर्मिलाला अनेक जण “मासूम’ मधली घोडावाली मुलगी म्हणून ओळखतात. मराठी कुटुंबात जन्मलेल्या उर्मिला मातोंडकरने १९८० साली कलयुग नावाच्या हिंदी चित्रपटात बालकलाकार म्हणून चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर १९९१ साली पडद्यावर झळकलेल्या नरसिंहा या हिंदी चित्रपटाद्वारे तिने तरूणपणी हिंदी चित्रपटसृष्टीत पुनर्प्रवेश केला. उर्मिलाने आपल्या चित्रपट कारकिर्दीत मासूम सारखे अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तिच्या कारकिर्दीचे विशेष म्हणजे तिने अष्टपैलू अदाकारी साकारली. राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘द्रोही’.
‘रंगीला’, ‘मस्त’, ‘भूत’, ‘सत्या’, ‘कौन’ ‘दौड’ ही नावेच तिच्या विविधतेचा छानसा प्रत्यय देतात. त्याशिवाय ‘एक हसीना थी’, ‘जुदाई’, ‘पिंजर’ अशाही काही चित्रपटांतूनही तिने अष्टपैलुत्व दाखविले आहे. तिने हिंदी चित्रपटांसोबत तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांतील चित्रपटांतूनही भूमिका केल्या आहेत. उर्मिला मातोंडकरने आजोबा या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. उर्मिला मातोंडकरने मोहसीन अख्तर मीर याच्यासोबत लग्न केले आहे. मोहसीन अख्तर मीर हा उर्मिलापेक्षा १० वर्ष लहान आहे. उर्मिलाही ४२ वर्षाची आहे. मोहसीनने २००७ मध्ये घेण्यात आलेल्या मिस्टर इंडिया टॅलेंट हंटमध्ये तिसरा क्रमांक पटकावला होता. ए. आर. रेहमानच्या ‘ताज महल’ या म्युझिक व्हिडिओमध्येही मोहसीनेन काम केले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply