पाऊस जणू आपल्या बरोबर हिरव्या रंगाचे डबे घेऊन येतो आणि रानावनात ओतत राहतो. रानांत पाचूचा चुरा उधळावा तसं कोवळ्या पानांनी फुललेलं रान सजू लागतं. ठिपक्यां एवढी पानं कले कलेने वाढत, रुपयाच्या नाण्याएवढी, वाटीएवढी किंवा हाताच्या पंजापेक्षा मोठी होत जातात. जमिनीवर हिरव्या गवताचं साम्राज्य पसरतं तस तसे, वाढणार्या हिरव्या गवतात आधीच्या वर्षात गळून पडलेली सुकलेली पानं, काटक्या, फांद्या झाकून जातात. काही मोडून पडलेल्या फांद्यांना देखील नवीन पालवी फुटलेली असते. जमिनी लगतचे दाट गवत, त्यावर १०-१५ फुटांपर्यंतची जागा व्यापून टाकणारी झुडपांची गच्च दाटी आणि त्या गर्दीतून माना वरती काढून, त्यावरचे ६०-७० फूट व्यापून टाकणारी झाडांची न संपणारी भिंत, असा तिपेडी हिरवा वेढा आसमंतात पडून जातो. पावसाने ओली झालेली झाडांची खोडं, काळी भोर दिसत असतात. त्या दणकट काळ्या सरळसोट बुंध्यांच्या, फांद्यांच्या पार्श्वभूमीवर, नव्याकोर्या नाजुक पानांचा चैतन्यपूर्ण हिरवा रंग मोठा खुलून दिसत असतो.
डोंगर झाडीने भरून जातात. महिन्याभरापूर्वींपर्यंत निष्पर्ण वृक्षांनी भरलेले मातकट रंगाचे डोंगर आणि टेकड्या आता हिरव्यागार झालेल्या असतात. एखाद्या हडकुळ्या मुलाच्या अंगावर चांगलं खाऊन पिऊन मांस चढावं तसं रसरशीत पानांनी लगडलेल्या झाडांमुळे डोंगर देखील अंग भरल्यासारखे वाटायला लागतात. झाडी एवढी दाट की फांद्या एकमेकात मिसळून त्यांचं एक छ्प्पर होऊन जातं. त्यात झाडं पानांनी भरून गेली की दिवसा देखील सूर्यप्रकाश जमिनीवर पोहोचणं मुश्कील! डोंगरांच्या रांगां मागून रांगा नुसत्या गच्च झाडीने व्यापलेल्या. एखाद्या माकडाला एखाद्या झाडावर चढवलं, तर मैलोन मैल जमिनीवर पाय न लावता पालथं घालू शकेल अशी परिस्थिती! एखाद्या उंचश्या ठिकाणाहून, गर्द राईने भरून गेलेल्या या डोंगर टेकड्यांच्या मुलखावर नजर टाकली की एखादं अजस्त्र जनावर आपलं वळ्यावळ्यांचं अंग पसरून पहुडल्यासारखं वाटतं. त्याची हिरवी चामडी खवल्या खवल्यांनी भरून गेलेली असते. आणि या निबर जाड चामडीवर एखादा ओरखडा उठावा तसा झाडीतून गेलेला रस्ता दिसत असतो. पावसाळ्यातला ऊन पावसाचा खेळ चाललेला असतो. ढगांच्या सावल्या डोंगरावरून सरकत असल्या की ऊन सावलीचे तुकडे एकमेकांचा पाठलाग करत धावतायत असं वाटायला लागतं.
माझ्या लॅबपासून घरापर्यंतच्या रस्त्यात जवळ जवळ ५-७ मैलांचा एक भाग असा आहे की सस्कुहाना नदी, रस्ता आणि एक रेल्वे लाईन एकमेकांना समांतर धावत असतात. रस्ता डोंगरावरून जात असतो. रस्त्याच्या एका बाजूला डोंगराचा अधिक उंच भाग, त्यानंतर रस्ता, रस्त्याच्या दुसर्या अंगाला छोटीशी दरी, त्या झाडीतून जाणारी रेल्वे लाईन, त्याच्यापलीकडे सस्कुहाना नदी, नदीच्या अल्याड पल्ल्याड झाड झडोरा आणि त्याच्याही पलीकडे गवताळ माळ. ही आडबाजूची कुठलीशी छोटीशी रेल्वे लाईन असावी, कारण फारच कमी वेळा इंजीनगाड्या ये जा करताना दिसतात. जी काही ये जा होते ती मालगाड्यांचीच. कधी कधी सस्कुहाना नदीमधे एखादी बोट दिसते. पावसाळ्यात डोंगरावरून येणारं पाणी रस्त्यावरून खाली वाहत जातं. रात्री बघावं तर नदीचं पात्र चांदण्यात चमकत असतं. झाडांच्या सावल्यांनी नदीचे काठ झाकोळून गेलेले असतात. रात्रीच्या अंधारात, आजूबाजूचे झाडीने भरलेले डोंगर आणखीनच काजोळी फासल्यासारखे वाटत असतात.त्या गच्च झाडीमधे डोंगरातून जाणारे रस्ते झाकून टाकले असतात. त्या लपलेल्या रस्त्यांवरून जाणार्या गाड्यांचे दिवे मधेच एखाद्या वळणावर दृष्टीस पडतात.झाडांच्या गर्दीतून या गाड्यांच्या दिव्यांचा लपंडाव चाललेला असला की जणू रात्रीच्या वेळी कंदील घेऊन भुतांचा खेळ चाललाय असं वाटतं.
माझ्या लॅबच्या जवळच एक मोठासा डोंगर आहे. त्यावरून उतरणारा रस्ता म्हणजे जणू मोठी घसरगुंडीच वाटते. जवळ जवळ ५००-६०० फुटांचा हा उतार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दरीतून वर येणारी झाडं भिंतीसारखी भासत असतात. चहूबाजूंनी डोंगर असल्यामुळे डोंगरावरून उतरताना एखाद्या प्रचंड मोठ्या द्रोणामधे उतरल्यासारखं वाटतं. रस्ता असा उतरून पुढे साधारण मैलभर सरळ सपाटीवरून जातो त्यामुळे गाडीतून डोंगरावरून खाली उतरताना जणू एखादं विमान जमिनीवर उतरताना वाटतं तसं वाटतं. उतारावरून खाली येत असताना बाजूच्या दरीतली झाडं झपाट्याने वर वर येत आहेत असं वाटतं.
एप्रिल मे मधे झाडांवरच्या फुलांचा बहर संपता संपता गवतामधे उगवणार्या तणांना देखील फुलं यायला लागतात. पिवळ्या रंगाच्या बटणांसारख्या फुलांनी कुरणं, रस्त्याकाठचे गवताचे पट्टे भरून जातात. त्या मागोमाग, पांढर्या रंगाच्या तंतूंच्या गुच्छासारखी फुलं असलेली तणं तरारून येतात. काही दिवसांनी ही पांढरी बोंडं फुटून, त्यातून पांढर्या तंतूंच्या पंखांवर बसून, तणाची बियाणं वार्यावर वहात जाऊन दूर दूर पोहोचतात. तणांच्या या पिवळ्या पांढर्या फुलांपाठोपाठ जंगली फुलांचं नुसतं पेव फुटतं. पिवळा, गुलाबी, पांढरा आणि जांभळा हे प्रामुख्याने दिसणारे रंग. रस्त्याकडेचे, झाडांच्या पायथ्याचे, शेतांच्या बांधावरचे, कुरणातले, दगडांच्या खाचखळग्यातले गवत, तर्हेतर्हेच्या फुलांनी सजून जाते. फुलांचे प्रकार देखील किती वेगवेगळे ! काही अगदी लहान तर काही चांगली वाटी एवढी मोठी, काही एकएकटी डुलणारी तर काही गुच्छामधे लगडून जाणारी, काही साधी सुधी सदाफुलीसारखी तर काहींच्या डोक्यावर तुरे आणि कोंबडे! या सगळ्यामधूनच गर्द शेंदरी रंगाची bird of paradise सारखी फुले लक्ष वेधून घेत असतात.
Leave a Reply