नवीन लेखन...

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ४

USA-Rutuchakra-Part-4

थंड प्रदेशातले लोक उन्हाचं एवढं कौतुक का करतात ते आपल्याला उन्हाळ्यात लक्षात येतं. एखाद्या पूर्ण उन्हाळी दिवशीं, लख्ख प्रकाशाने सारा आसमंत उजळून निघालेला असतो. आकाशाची निळाई झळकत असते. ढगांच्या शुभ्र पताका पावित्र्याचा जयघोष करत आकाशात फडकत असतात. डोंगरांच्या, टेकड्यांच्या रांगा, निळाईच्या वेगवेगळ्या छटा अंगावर वागवत, लाटांप्रमाणे एकामागोमाग एक उठत असतात. गवताच्या टेकड्यांचा हिरवा रंग चोहोबाजूंनी लपेटून टाकत असतो. उतारावरची मक्याची शेतं, त्यातली सोनेरी कणसं, कुरणांमधले सोनसळी रंगाचे आणि वार्‍यावर लाटांसारखे डुलणारे गवत, त्यात अंतराअंतरावर बांधून ठेवलेले पिवळ्या धम्मक रंगाचे कापलेल्या गवताचे मोठमोठाले भारे, चरणार्‍या गायी, तपकिरी रंगाचे डेअरी फार्मस आणि अधे मधे विखुरलेली पांढरी घरे! सारे रंग अगदी स्वच्छ! वरून सोन्याच्या मुशीतून ओतावा तसा सूर्यप्रकाश ओघळत असतो. समोरचा काळा स्वच्छ रस्ता आणि आजूबाजूला उलगडत जाणारे हे छान दृश्य! अगदी हातावरच्या गवताच्या पात्यापासून ते दूरच्या डोंगरांच्या अंधुकशा आकृतीपर्यंत सारं चित्र अगदी जिवंत, रसरशीत वाटत असत४

उन्हाळा संपता संपता रानटी फुलांची उधळण चालूच असते. गोल्डन रॉडस, रामबाण, जंगली झुडपांसारखे रस्त्यांच्या कडेला उगवलेले असतात. हिरव्या पर्णसंभाराने झाडं भरलेली असतात. सप्टेंबरच्या अखेरीस थंडीची चाहूल लागायला लागते. अचानक एके दिवशी, गर्द हिरव्या झाडीमध्ये, मधेच एखादं लालसर पान दिसायला लागतं. दिवसागणिक वाढत जाणार्‍या या रंगीत पानांमुळे, टेकड्यांच्या मखमली हिरव्या अंगरख्यावर रंगांचे शिंतोडे पडायला लागल्यासारखे दिसतात. थंडीची सुरुवात आणि झाडांच्या हिरव्या पर्णसंभारात दिसू लागलेली रंगीबेरंगी पाने, ही येणार्‍या फॉल सिझनची नांदीच असते.

पानांच्या रंगांच्या छटा तरी किती? त्यात विविध प्रकारच्या झाडांचे रंगून जाण्याचे प्रकार देखील वेगवेगळे. इथे मेपलची झाडं खूप. त्यांची पानं पिवळ्या, गुलाबी, नारिंगी, लाल रंगानी रंगून जातात. या उलट ओकची पानं मात्र गडद तपकिरी रंगांची होऊन वाळत जातात. एकेका झाडावरच पानांच्या रंगत जाणार्‍या रंगसंगती तरी किती सांगाव्यात? काही पानांची झाडं बराच काळ आपला हिरवा रंग टिकवून ठेवतात, आणि अगदी शेवटी शेवटी, कुठेतरी पिवळी नारिंगी पानं त्यांच्या गर्द पर्णसंभारात दिसायला लागतात. जसं काही जणांचे केस अगदी उतार वयातही बरेच काळेभोर रहातात, आणि अगदी शेवटी शेवटी थोड्या पिकल्या केसांची पखरण व्हायला लागते तसं. काही झाडांच्या पानांमधे हिरव्या आणि पिवळ्या रंगांचं अजब मिश्रण होऊन जातं. काही झाडांची पानं पूर्णपणे पिवळी धम्मक होऊन जातात. तर काहींची पूर्णपणे गर्द लाल! प्रत्येक झाड जणू वेगवेगळ्या तर्‍हेने नटलेलं. प्रत्येकाचं रूप वेगळं आणि प्रत्येकाची जादू निराळी! पानांच्या ह्या अजब रंग संगतीने झाडं रंगून जातात आणि संध्याकाळचं मावळतीचं आकाश जणू झाडांवर उतरतं. फॉल सिझन मधल्या या पानांच्या रंगपंचमीला ‘फॉल कलर्स’ असं साधं सुटसुटीत नाव आहे. जितकी थंडी जास्त, तितका पानांचा रंग देखील बहारदार! त्यामुळे जितकं उत्तरेला जावं, तितके ‘फॉल कलर्स’ अधिक सुरेख!

या सीझनमधे फॉल कलर्स बघायला जाणं ही एक पर्वणीच असते. नॉर्थईस्ट मधले फॉल कलर्स प्रसिद्ध आहेत आणि या सीझनमधे दूरदूरहून लोकं आवर्जून तेथे जातात. वीकएन्डला गाड्या काढून लोकं आजूबाजूच्या डोंगर टेकड्यांमधे फिरायला जातात. रस्ते सुरेख असल्यामुळे नुसतं गाडीत बसून फिरावं, फिरता फिरता डोळ्यांनी पिऊन घेता येईल तेवढं हे सृष्टीसौंदर्य पिऊन घ्यावं, एखादं ठिकाण फारच आवडलं तर गाडी रस्त्याच्या कडेला लावून फोटो काढावेत, असं चालू असतं. काही काही रस्ते फारच सुरेख आहेत आणि Scenic routes म्हणून प्रसिद्ध आहेत. या रस्त्यांवर, या फॉल सिझनमधे तीन चार वीकएन्ड्सना प्रवाशांची वर्दळ भरपूर असते. त्यामुळे या रस्त्यांवरच्या छोट्या छोट्या गावांत तेवढ्यापुरती टुरीझमची धांदल उडते. रस्त्याच्या कडेला छोटे छोटे स्टॉल्स उघडले जातात. मक्यांच्या विविध जातींची कणसं, रंगी बेरंगी फुलांच्या कुंड्या, नाना जातीची सफरचंद, अ‍ॅपल सायडर्स, हारीने रचून ठेवलेले भोपळे आणि मेपल सिरपची रेलचेल असते. शहरवासी आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून, ह्या गावरान सौंदर्याचं कौतुक करायला आलेले असतात. थंडीची गोड शिरशिरी अनुभवत, गरम गरम अ‍ॅपल सायडरचे घुटके घेत, रस्त्याच्या कडेला उभं राहून लोकं फॉल कलर्स डोळे भरून पहात असतात.

एखाद्या दिवशी गाडी चालवतांना, वार्‍याच्या झुळकीबरोबर तरंगत, एखादं सुकलेलं पान, अलगद गाडीच्या पुढ्यात येऊन पडतं. वर बघावं तर लक्षात येतं की पानं हळू हळू सुकायला लागलेली असतात. सुरवातीला रस्त्यावर थोडीशी रंगीत सुकलेली पानं पडलेली असतात. मग त्यांची संख्या वाढायला लागते. आपल्याकडे जसं छोट्या गावांमधे कधी काळी एखादी गाडी यावी आणि गावातल्या उनाड पोरांनी गलका करत गाडीच्या मागे धावावं, तशी ही सुकलेली पानं रस्त्यावरून एखादी गाडी गेली की तिच्या पाठोपाठ काही अंतरापर्यंत भरकटत, उडत जातात आणि मग पुनश्च रस्त्यावर इर्दगिर्द पडून रहातात.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..