नवीन लेखन...

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ५

USA-Rutuchakra-Part-5

आजूबाजूंच्या घरांपुढच्या हिरव्या गर्द हिरवळीवर रंगी बेरंगी सुकलेली पानं पडायला लागतात. रस्त्यांवरची सुकलेली पानं, येणार्‍या जाणार्‍या गाड्यांमुळे इतस्तत: ढकलली जातात. छोट्या रस्त्यांच्या दोन्ही बाजूंची झाडं रंगी बेरंगी पानांनी भरून गेली की जणू रंगीत पताका आणि कमानींनी रस्ते सजवल्यासारखे दिसायला लागतात. थोड्याच दिवसात पडलेल्या पानांची संख्या एवढी वाढते, की रस्त्याच्या कडेला सुकलेल्या पानांच्या किनारी तयार होतात. जिथे फारशी गाड्यांची वर्दळ नसते असे आडबाजूचे छोटे रस्ते तर काही दिवसातच सुकलेल्या पानांनी पूर्णपणे झाकून जातात. रंगीबेरंगी पानांच्या गालिच्यांनी रस्ते आणि जमिनी भरून जातात. रस्ते, बाजूचे फूटपाथ आणि घरापुढच्या हिरवळी, सारं काही सुकलेल्या पानांनी एवढं भरून जातं, की रस्ते कुठे आहेत हे नवीन माणसाला समजणं मुश्कील व्हावं. मग एखाद्या बोटीने पाण्यावर लाटा उठवाव्यात तशा या सुकलेल्या पानांच्या लाटा उठवत, कधी तरी एखादी गाडी रस्त्यावरून अचानकपणे जाते आणि खालचा रस्ता दिसायला लागतो.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंची झाडी एवढी दाट की रस्त्यापासून १५-२० फूट आत काही दिसत नाही. ६०-७० फूट उंचीची ही सगळी झाडं अशी दाटीवाटीने उभी ठाकल्यामुळे, रस्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच भिंती असल्यासारखं वाटतं. मधेच एखादं घर, ओढा, शेत किंवा गावकूस लागतं आणि तेवढ्यापुरतं या भिंतीला भगदाड पडून भिंती पलीकडचे दृश्य नजरेस पडायला लागतं. बाकी सर्व वेळ फक्त समोरचा रस्ता आणि दोहोबाजूच्या झाडांच्या भिंतीमधला आकाशाचा पट्टा तेवढा वर दिसत असतो.

ऑक्टोबर सुरु होतो आणि पानगळती सुरू होते. झाडांच्या शेंड्यांपासून पानांची गळती सुरू होते आणि मग हळू हळू खालच्या फांद्यांवरची पानं गळायला लागतात. पानगळती सुरू होते तसतसे झाडांचे शेंडे हळू हळू मोकळे व्हायला लागतात आणि रस्त्याच्या वरचा आकाशाचा पट्टा रुंदावत जातो. जसजशी पानगळती वाढते तसतशी जणू एखादं जीर्ण वस्त्र विरायला लागावं, तसं हे एकेकाळचं मखमली हिरवं वस्त्र, रंगी बेरंगी डाग पडून फाटायला लागतं आणि त्याच्या वाढत जाणार्‍या छिद्रांमधून पलीकडली घरं, शेतं दिसायला लागतात.

ऑक्टोबर सरता सरता ‘फॉल कलर्स’ पूर्ण रंगात आलेले असतात. झपाट्याने होत चाललेल्या पानगळतीमुळे, उघड्या वागड्या होत जाणार्‍या रानामधे, अजून आपला गर्द लाल, नारिंगी पर्णभार संभाळून असलेलं एखादं झाड, डोंगरावर लागलेल्या वणव्यासारखं नजरेत भरत असतं. सुरवातीला एक एक दोन दोन करत गळणारी पानं हळू हळू खुळ्यागत जमिनीकडे झेपावू लागतात. अशातच एखादी जोरदार वार्‍याची झुळुक येते आणि झाडांच्या फांद्या हलवून जाते. मग ह्या पानांच्या रंगीबेरंगी पताका गिरक्या घेत घेत चहूकडे विखरून जातात. शेवटी शेवटी तर पानगळ एवढी वाढते, की गाडीतून जाताना दोहोबाजूंच्या झाडावरून एखादा पाखरांचा थवा जमिनीवर उतरावा किंवा एखादी टोळधाड आसमंतातून शेतावर उतरावी तसं वाटायला लागतं.

ओढ्यांच्या बाजूच्या झाडांची पानं गळायला लागून पाण्यात पडायला लागतात. सुरवातीला ही पडलेली पानं खळाळत्या पाण्याबरोबर वहात जातात. मग जसजशी त्यांची संख्या वाढायला लागते, तसतशी ही सुकलेली पानं, ओढ्याच्या कडेला आणि अधल्या मधल्या दगड धोंड्यांत अडकून साचायला लागतात.

एप्रिल मे पासून ते सप्टेंबर पर्यंत जाणवणारा हिरव्या रंगाचा दिमाख आता उतरत चाललेला असतो. झाडांच्या पायदळीची झुडपं आणि गवत देखील सुकत चाललेलं असतं. त्यात वरून पडणार्‍या सुकलेल्या पानांनी, रानाचा पायथा हिरव्याचा तपकिरी करून टाकलेला असतो. सुकलेलं गवत, झुडपांच्या काटक्या, झाडांच्या मोडून पडलेल्या फांद्या, दगड धोंडे आणि सुकलेली पानं या सगळ्यामुळे, जमिनीला वेगळाच असा रखरखीत पोत (texure) आलेला असतो.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..