नवीन लेखन...

अमेरिकेतील ऋतुचक्र – भाग ६

USA - Rutuchakra - Part-6

ऑक्टोबरपासून थंडी वाढायला लागते. या सुमारास धुकं देखील खूप पडायला लागतं. धुक्याच्या आवरणातून जवळची झाडं तेवढी दिसत असतात; तर लांबच्या टेकड्या, झाडं धुक्यात गुरफटून गेलेली असतात. त्यातून दुरच्या झाडांचे नुसते शेंडेच दिसत असतात. आसपासच्या दर्‍यांतून धुक्याच्या लाटा उठत येतात. एखादा तलम दुपट्टा वार्‍यावर तरंगत जावा तसं धुकं वार्‍यावर लहरत जातं. फॉल मधल्या धुक्याची मजा काही औरच असते. टेकड्या, डोंगरांची होळी रंगात आलेली असते. एखादं नाटक सुरू व्हायच्या आधी रंगमंच पडद्याने झाकलेला असावा तसे धुक्याने डोंगर झाकलेले असतात. मग एखाद्या वळणावर गाडी वळते आणि धुक्याचा पडदा सारून आपली रंगलेली डोकी दाखवत डोंगर अचानक समोर येतात.

रस्त्यांच्या बाजूच्या फुलांचा बहर ओसरत जात असतो. रंगांची वेडी उधळण आता आटोपती घेतली जात असते. गवत पिवळं पडत असतं. शेतातल्या मक्याची कापणी होऊन गेलेली असते आणि शेतामधे आता नुसते खुंट राहिलेले असतात. मक्याशिवाय काही शेतांमधे भाजीपाला देखील तयार झालेला असतो. या हंगामात लाल भोपळा खूप येतो. शेतांत मधे मधे पसरलेले त्यांचे वेल आणि शेंदरी रंगाचे तयार झालेले भोपळे दिसत असतात.

कधी तरी फॉल सिझनमधे पाऊस पडतो. आधीचेच स्वच्छ रस्ते आणखी चकचकीत होऊन जातात. सुकलेली पानं रस्त्याच्या कडेला लोटली जाऊन पावसाने चप्प होऊन रस्त्याच्या किनारी बनून रहातात. धुक्याच्या आणि लोंबत्या ढगांच्या तलम वस्त्रातून रंगीत झाडं लंपंडाव खेळत असतात. पावसामुळे झाडांचे बुंधे आणि फांद्या काळसर ओल्या झालेल्या असतात. त्यांच्या पार्श्वभूमीवर झाडावरची उरली सुरली रंगीत पानं तग धरून वार्‍यावर फडफडत असतात. दाटी वाटीने उभ्या असलेल्या त्या रंगीबेरंगी झाडांमुळे टेकड्या म्हणजे जणू महाकाय Flower arrangements झालेल्या असतात.

बर्‍याचदा सस्कुहाना नदीच्या वरच्या अंगाने गाडी चालवताना नदी धुक्याच्या शालीत लपेटून गेलेली दिसते. नदीच्या अल्ल्याडची झाडं नि:शब्दपणे उभी असतात. पल्ल्याडचा काठ आणि त्यावरची झाडी धुक्यात धुसरशी दिसत असते. पल्ल्याडच्या काठावरच्या झाडांची स्वतंत्र आकृती नाहीशी झालेली असते, आणि एक लांबच लांब बाह्याकृती (silhouette) मात्र अंधुकशी दिसत असते.

ऑक्टोबर पासून सुरू झालेली थंडी नोव्हेंबर – डिसेंबर पर्यंत चांगलीच वाढलेली असते. सूचिपर्णी वृक्ष सोडले तर इतर झाडांवर पानांचं नामोनिशाण राहिलेलं नसतं. झाडांचे बुंधे, फांद्या, झुडपांच्या बारीक काटक्या, खालचं गवत, सगळं शुष्क होऊन गेलेलं असतं. हिरव्या रंगाचा एकछत्री अंमल संपुष्टात आलेला असतो. एखाद्या कार्यक्रमाचा grand finale मोठ्या झोकात करावा तसं ह्या फॉल सिझनमध्ये एक नेत्रदीपक रंगायतन साजरं करून पानं निपचित धुळीत पडलेली असतात. ‘मातीवर चढणे एक नवा थर अंती…’, याची वर्षामागून वर्ष प्रचिती येत रहाते. सगळीकडे करड्या, तपकिरी रंगाचं एकसुरी साम्राज्य पसरलेलं असतं. डोंगरांवर, टेकड्यांवर पर्णरहित झाडांची आणि हिरव्या सूचिपर्णी वृक्षांची सरमिसळ नजरेत भरत असते. ह्या पर्णरहित वृक्षांच्या पार्श्वभूमीवर, ते हिरवेगार सूचिपर्णी वृक्ष अधिकच उठून दिसत असतात. जणू एखाद्या युद्धभूमीवर, पराभूत नि:शस्त्र घायाळ सेनेमधून, दिमाखदार शिरस्त्राणे घातलेल्या विजयी सेनेच्या सैनिकांचा उत्साहाने वावर चालला असावा, तसं दृश्य दिसत असतं.

नाटकाचा हसता खेळता रंगीबेरंगी अंक आता संपलेला असतो. पुढचा हिवाळ्याचा अंक, एक लांबच लांब, एकसुरी, प्रौढ आणि गंभीर असणार असतो. तपकिरी करड्या पडद्याकडे बघत, संपलेल्या अंकाच्या सुखद आठवणी मनात घोळवत, पुढच्या अंकाची वाट बघत बसावं, तसा हा मधला काही आठवड्यांचा काळ असतो.

डॉ. संजीव चौबळ
About डॉ. संजीव चौबळ 84 Articles
मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून पशुप्रजनन विषयात पदव्युत्तर शिक्षण (१९८६) घेतल्यावर भारतातील विविध संस्थांमधे सुमारे १४ वर्षे काम. २००१ साली युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटमधे डॉक्टर जेरी यॅंग या “क्लोनिंग”च्या क्षेत्रातील नावाजलेल्या संशोधकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करण्यासाठी अमेरिकेत दाखल. गेली पंधरा वर्षे अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी व त्यानंतर नोकरीनिमित्ताने वास्तव्य. अमेरिकेतील उत्तम दर्जाच्या गायींमधे भृणप्रत्यारोपण (EmEmbryo Transfer Technology) तसेच टेस्ट टयुब बेबीज (In Vitro Fertilization) या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमधे संशोधन तसेच उत्पादनात जबाबदारीच्या पदांवर काम. आपल्या क्षेत्रातील नावाजलेल्या शास्त्रीय जर्नल्समधे व विविध राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय परिषदांमधे सुमारे २५ शोधनिबंध सादर. अमेरिकेतले वास्तव्य तसेच कामानिमित्ताने प्रवास मुख्यत्वे ग्रामीण/निमग्रामीण भागात झाल्यामुळे, अमेरिकेच्या एका सर्वस्वी वेगळ्या व अनोळखी अंगाचे जवळून दर्शन. सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण, “गावाकडची अमेरिका” या पुस्तकाद्वारे केले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..