नवीन लेखन...

हवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याकरता नाविन्यपूर्ण उपायांचा वापर

सुरक्षेची आव्हाने वाढत आहेत ,परंतु १९९० पासून भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांच्या ताफ्याची संख्या सातत्याने घटत गेलेली आहे. देशाच्या हवाई दलाची परिस्थिती चिंताजनक आहे असेच म्हणावे लागेल. आपल्याला पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी लढण्यासाठी 44 हवाई दलाच्या स्क्वाड्रनची गरज आहे. सध्या केवळ ३१ उपलब्ध आहेत. त्यातही ४० ते ६० वर्षे जुन्या विमानांचा भरणाच अधिक आहे.भारतीय हवाई दल जुन्या विमानांचे आधुनिकीकरण करण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु हे काम २०२५ पर्यंतच पुर्ण होइल.

एका स्क्वाड्रनमध्ये 15-20 अशी विमाने असतात. सध्या भारतीय हवाई दलाकडे असलेल्या विमानांमध्ये मिग 21-ते मिग 2७ ही अत्यंत जुनाट विमाने, जग्वार, मिराज ही जुनी विमाने आणि सुखोई आधुनिक विमाने आहेत. मिग 21 -2७ विमाने ही 2024 मध्ये सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे हवाई दलातील विमानांची संख्या आणखी कमी होणार आहे. त्यांच्या जागी भारतीय बनावटीची ‘तेजस’ विमाने आणण्याचा मनोदय आहे. ४८ तेजस विमाने ‘हिंदुस्थान एरोनॉटिक्स’ बनवणार आहे.मात्र तेजस विषयी हवाईदल नाखूष आहे व त्यांनी सध्या तयार तेजस मध्ये अनेक कमतरता दाखवल्या आहेत. या कमतरता दूर करून तेजसला अधिक उत्तम विमान बनण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सुखोई ३१ एमकेआय सर्वांत आधुनिक विमान

सुखोई ३१ एमकेआय हे हवाई दलातील सर्वांत आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त विमान आहे. सध्या अशी २०४ विमाने हवाई दलात आहेत, आणखी ६८ पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहेत.

कालबाह्य होत चाललेल्या विमानांच्या जागी फ्रेंच बनावटीची ‘रॅफेल’ ही बहुउद्देशीय विमाने प्राप्त करण्याचे सरकारने मान्य केले असून, अशा १२६ विमानांची मागणी यापूर्वीच नोंदविली गेली आहे.ही मागणी २०२३ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

जग्वार आणि मिराज यांच्या आधुनिकीकरणाची गरज

जग्वार आणि मिराज ह्या कमी जुनी विमानांच्या आधुनिकीकरणाची गरज खूप मोठी आहे. परंतू दुर्देवाने विमान निर्मात्या देश फ्रान्सने या मिराज विमानांच्या निर्मितीला देशांतूनही 2007 सालीच निवृत्त केले आहे.जग्वार, मिराज विमाने फ्रान्स, इंग्लंड, युएई, ओमान या देशांमध्ये या आधी सेवेत होती मात्र या सर्वच देशांतून ती सेवानिवृत्त करण्यात आली आहेत. त्यामुळेच भारत सोडून जगात इतरत्र कुठेही ही विमाने वापरली जात नाही.

सेवानिवृत्त विमानांचे सक्षम भागाचा भारतीय विमानांमध्ये वापर

भारतीय हवाई दलांने आधी जग्वार आणि मिराज वापरणार्या देशांशी संवाद साधून त्यांच्याकडील सेवानिवृत्त विमानांचे तांत्रिक द्रुष्ट्या सक्षम भाग काढून भारतीय विमानांमध्ये वापरण्याचे ठरवले आहे. आपल्याकडे 118 जग्वार विमाने आहेत, पण त्याच्या सुट्या भागांची कमतरता असल्याने जी विमाने हवेत उडू शकतात त्याची संख्या खूप कमी आहे. विमानाचे तीन मोठे भाग असतात. एक बाहेरील सांगाडा(Aero frame), दुसरे म्हणजे विमानाचे इंजिन,तिसरे विमान चालवण्यासाठी लागणारी इतर उपकरणे(Avionics). बाहेरच्या सांगाड्याचे आयुष्य सर्वात जास्त असते आणि सर्वात कमी आयुष्य असते ते विमानाच्या इंजिनाचे. त्यामुळेच आपण सध्याची इंजिने बदलून तिथे नवीन इंजिने बसवून विमानाचे आ़युष्य वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी आपले हवाईदल आणि हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये 80 मिराज विमानांची आणि 5 जग्वार विमानांची इंजिने बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विमानांचे आ़युष्य 10 वर्षांनी वाढू शकेल.

1979 सालामध्ये ही विमाने थेट इंग्लंडहून आपल्या देशात आली होती. उर्वरित 150 ही विमाने भारतातच हिंदुस्थान एअरोनॉटिक्स मध्येच बनवण्यात आली होती. रोल्स रॉईस हे इंजिन आणि इतर नवी इंजिने जग्वारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी आपण सर्वात नवीन एफ 125 आयएन हनीवेल नावाचे इंजिन तिथे आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे विमानांचे आयुष्य पुष्कळ वाढणार आहे .इंजिनाच्या शिवाय विमानाच्या इतर भागांसाठी इतर देशांकडून मदत घेत आहोत.

31 विमानांचे सांगाडे हे फ्रान्सकडून आणि 2 सांगाडे, 8 इंजिने आणि 3500 विविध सुटे भाग ओमान देशाकडून घेत आहोत.दोन वैमानिक चालवणार्या विमानांचे स्पेअर पार्ट हे इंग्लंडकडून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. फ्रान्स आणि ओमान हे देश सुटे भाग  विनाशुल्क देत आहेत, पण ही विमाने आपल्याला आपल्या खर्चानी भारतात आणावी लागणार आहेत. इग्लंडने सुट्या भागाकरता 2.8 कोटी डॉलर्सची किंमत घेतली आहे. फ्रान्स आपल्याला जग्वार विमानांचे सुटे भाग विनाशुल्क द्यायला तयार आहे. पण त्यासाठी फ्रान्स – भारत दरम्यान असणारा 59 कोटी हजार रुपयांचा नव्या राफेल विमानांचा करार होईल तेव्हा फ्रान्सकडील जग्वार विमाने सुटे भाग काढण्यासाठी भारताला विनामुल्य दिली जातील.

नाविन्यपूर्ण पद्धती वापरून आपल्या विमानांचे आयुष्य वाढवून युद्धक्षमता वाढवण्याच्या हवाई दलाच्या या पद्धतीचे देशाने कौतुकच करायला पाहिजे. कारण आपण कमीत कमी पैसे खर्च करून आपली विमाने आधुनिक करण्याचा प्रयत्न करत आहोत.

रेंगाळलेले करार,रखडलेले प्रकल्पांना चालना द्या

हवाई दलाची क्षमता आणि त्याचं आधुनिकीकरण करणं आवश्यक आहे. भारतीय हवाई दलाच्या आधुनिकीकरणाचे प्रकल्प वर्षानुवर्षं  रेंगाळत राहिले. त्यामुळं फक्त तंत्रज्ञानाच्या आघाडीवरच नव्हे; तर कुशल मनुष्यबळाच्या आघाडीवरही पीछेहाट झाली.हवाई दलाला पुन्हा आधुनिकतेच्या मार्गावर आणत असताना विमानांची संख्या वाढवण्यावरही भर दिला पाहिजे. आता थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) ४९ टक्यांपर्यंत वाढवली आहे. संरक्षण क्षेत्रातलं स्वावलंबन वाढवण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. त्यातून खासगी कंपन्यांच्या मदतीनं भारतातच लढाऊ विमानांचं उत्पादन करणं शक्य होणार आहे. रेंगाळलेले करार आणि रखडलेले प्रकल्प यांना चालना मिळाल्यास हवाई दलाच्या कमी होणारी स्क्वॅड्रनची संख्या रोखता येईल.या शिवाय कुशल मनुष्यबळाकरता आधुनिक ट्रेनींग विमांनाची तांतडीने गरज आहे.

मेक इन इंडियाचे क्रांतिकारक धोरण यशस्वी करा

२०१५ मध्ये सरकारने अंगीकारलेले ‘मेक इन इंडिया’चे क्रांतिकारक धोरण तोकडे पडले आहे. अनेक घोषणा करूनही एकसुद्धा प्रकल्प ड्रॉइंग बोर्डाच्या चौकटीबाहेर अद्यापि पडू शकला नाही. रफाल आणि ‘ऑगस्टा’सारखे वायदे हीन राजकारणाला किंवा नोकरशाहीच्या लाल फितीला बळी पडले. 36 नवी राफेल विमाने नोव्हेंबर 2019 ते एप्रिल 2022 दरम्यान भारतीय हवाई दलात प्रवेश करतील. यामुळे आपल्या हवाई दलाची ताकद नक्कीच वाढेल. अजून जास्त विमाने आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्हणूनच मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत 6 देश अत्याधुनिक लढाऊ विमाने भारतात बनवण्यासाठी स्पर्धा करताहेत. याविषयी होणारा निर्णय पुढील एक ते दोन वर्षात घेतला जाईल आणि अत्याधुनिक विमाने भारतातच तयार होतील.

देशातील उत्पादनावरचा;सिंहाचा वाटा ‘पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग’ना (पीएसयू) मिळतो. खासगी क्षेत्राला यात समाविष्ट करण्यातील द्विधावस्था ही आपल्याला सदैव सतावत आली आहे. पुढल्या महिन्यात आणखी एका दूरगामी धोरणाची घोषणा केंद्र सरकार करणार आहे. भविष्यातील संरक्षण उत्पादनाचा आराखडा त्यात सादर करण्यात येईल. त्याकरवी पुढील दहा वर्षात जगातील संरक्षण शस्त्रास्त्रांच्या उत्पादकांपैकी पाच अग्रणी उत्पादकांत भारताचा समावेश होईल अशी सरकारला खात्री आहे. आशा करु या की हा नव्या आशेचा कवडसा मतपेटीवादी गर्जनांत आणि राजकारणी द्वंद्वात पुनश्च तर लुप्त होणार नाही.

सध्या वाईट असलेली हवाई दलाची परिस्थिती सुधारण्यासाठी जुन्या जग्वार विमानाचे सुटे भाग घेऊन आपल्या जग्वार विमानांचे आयुष्य वाढवत आहोत. तेजस विमानांनी मिग ची जागा घेईपर्यंत तात्पुरता उपाय म्हणून नवी 36 राफेल विमाने हवाई दल पुढच्या 2 वर्षात घेण्याची शक्यता आहे. सध्या सहा देश एकमेकांशी स्पर्धा करून भारताला सर्वात अत्याधुनिक विमाने देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत ही विमाने तयार होण्याची शक्यता आहे. या सर्व उपायांना यश मिळेल आणि त्यामुळे हवाई दलाची लढाऊ क्षमता कायम ठेवण्यास मदत होईल व आपल्यासमोर असलेल्या आव्हानांचा सामना आपण खात्रीपूर्व करु शकु.

— ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 

ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि)
About ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) 288 Articles
ब्रिगेडियर हेमंत महाजन हे राष्ट्रीय सुरक्षा या विषयावर नियमितपणे लेखन करत असतात. त्यांचे लेख मराठीतील अनेक वर्तमानपत्रांत नियमितपणे प्रसिद्ध होतात. अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर ते नियमितपणे तज्ज्ञ वक्ते म्हणून कार्यक्रमांत सहभागी असतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..