नवीन लेखन...

फळे आणि भाज्या उत्पादनात तंत्रज्ञानाचा वापर

फळे आणि भाज्या यांची शेती आणि तंत्रज्ञान ही जोडी वरकरणी विसंगत वाटते. परंतु, तंत्रज्ञान शेतीच्या सर्व टप्प्यांमध्ये फार मोठी कामगिरी बजावते; आणि शेतकऱ्याला उत्तम पीक, उत्तम नफा आणि ग्राहकाला रास्त भावात उत्तम फळे आणि भाज्या मिळायला कशी मदत करते, याचा आढावा घेणारा हा लेख…

फळे आणि भाज्या यांच्या उपलब्धतेमागे महत्त्वाचे कारण असते; उत्पादन, त्यासाठी होणारा खर्च आणि त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाशी त्यांचा मेळ. तंत्रज्ञानाच्या वापराने पाणी, खते वगैरेंच्या वापरात बचत करून, हे अर्थकारण ‘अर्थपूर्ण’ करण्याला हातभार लावलेला आहे. आपल्या वापरातल्या थोड्याच भाज्या आणि फळे ही नैसर्गिक रानावनातून येतात. इतर बहुतेक फळा- भाज्यांच्या वनस्पती गेल्या कित्येक सहस्रकांपासून ‘माणसाळलेल्या आहेत. साहजिकच, त्यांना आपल्याकडून वाढीव पोषण आणि संरक्षण मिळणे आवश्यक असते. वनस्पतीच्या पोषणाचा महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी. पाणी जैवरासायनिक अभिक्रियांमध्ये भाग घेते. याखेरीज, इतर पोषणमूल्ये शोषून घेणे आणि त्यांची वाहतूक करणे; तसेच पानांचे अति उष्णतेपासून संरक्षण करणे, या सगळ्यांसाठी वनस्पती पाण्यावर अवलंबून असतात. झपाट्याने वाढ होणाऱ्या बहुतेक भाज्या आणि फळे यांची पाण्याची गरज मोठी असते. तसे असले तरी, बहुतेक वनस्पतींना पाणी सुटा द्रव या स्वरूपात उपलब्ध होणे आवश्यक नसते. पारंपरिक पाणी देण्याच्या पद्धतीमध्ये पाटाने दिलेले पाणी हे काही वेळ सुटा द्रव या स्वरूपात उपलब्ध असते, थोड्या वेळात त्यातले काही जिरून जाते; आणि काही बाष्पीभवन होऊन निघून जाते. थोडाच अंश वनस्पतीच्या उपयोगी पडतो. ठिबक तंत्रज्ञानाच्या वापराने यावर उपाय केला गेला आहे. नळ्यांमधून पाणी शेतात नेऊन फक्त थेंबाच्या रूपाने ते झाडाच्या मुळाशी पडेल, अशी व्यवस्था ठिबक सिंचनात असते. या तंत्राच्या वापराने भाज्या आणि फळबागा यांच्या व्यवस्थापनात फार मोठा फरक पडला आहे. ठिबक सिंचनाचा वापर द्राक्षे, केळी, डाळिंब, लिंबू वर्गातील फळे, आंबा, सीताफळ चिकू, पेरू, अननस, पपई, आवळा, कलिंगड, अशा अनेक फळांच्या; तसेच टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा, भेंडी, वांगी, काकडी, पालक, अशा अनेक भाज्यांच्या उत्पादनात केला जात आहे. ठिबक सिंचनाच्या वापराने पाण्याची सरासरी ७० टक्के बचत होते. याखेरीज, उत्पादनात वाढ होते ती वेगळीच. पाणी देण्याच्या पद्धतींमध्ये स्प्रिंकलर, रेन गन अशी उपकरणेदेखील उपलब्ध आहेत, ज्यामुळे पावसाप्रमाणे पडणाऱ्या पाण्याचा फायदा आणि पाण्याची बचत या दोन्ही गोष्टी साध्य होतात.

नियंत्रितपणे पाणी देण्याच्या पद्धतींमध्ये आणखी एक पर्याय आहे, तो म्हणजे वनस्पतींना खत देताना, ते जमिनीत न टाकता पाण्यात मिसळून द्यायचे. या पद्धतीला फर्टिगेशन असे म्हणतात. पाण्यात विद्राव्य असलेली खते मुळांच्या अगदी निकट पोहोचल्याने त्यांचा अपव्यय होत नाही. यामुळे खताच्या वापरात बचत करता येते. सहज आणि एकसारखा पुरवठा झाल्याने झाडांची वाढ चांगली होते आणि उत्पादनात वाढ होते. याचा दुसरा फायदा असा की, वनस्पतीच्या मुळांनी न शोषलेले खत पाण्याबरोबर वाहून जाऊन जवळपासच्या जलाशयाचे आणि एकूणच पर्यावरणाचे जे प्रदूषण होते, ते टाळता येते.

गेल्या काही वर्षांत जैवरसायनांच्या वापराने, फळझाडे आणि भाज्या यांच्या वाढीमध्ये, फुले येण्याच्या क्रियेमध्ये किंवा फलधारणेमध्ये आवश्यक असे बदल करण्याचे तंत्र उपलब्ध झाले आहे. संप्रेरके किंवा झाडांच्या वाढीचे नियंत्रण करणारे नैसर्गिक रेणू किंवा त्यांच्या समान गुणधर्म असलेले कृत्रिम रेणू यांचा यासाठी वापर केला जातो. जिब्रेलिन हे संप्रेरक द्राक्षांच्या फळाच्या आकारामध्ये वाढ करण्यासाठी वापरले जाते. आंब्याच्या काही वाणांमध्ये भरघोस फळधारणा वर्षाआड होते. अशा वाणाच्या मुळाशी कल्टार हे जैव नियंत्रक रसायन वापरून दरवर्षी भरपूर फळधारणा शक्य होते. कलमांना मुळे फुटण्यासाठी ऑक्झिन, बियांची उगवण उत्तम होण्यासाठी जिब्रेलिन, फुले आणि फळे यांची गळती थांबविण्यासाठी नॅपथॅलीन अॅसेटिक अॅसिड (एनएए), अशी जैव रसायने वापरून उत्पादनात आणि गुणवत्तेत वाढ करण्यात आली आहे.

हायड्रोपॉनिक्स म्हणजे मातीविना शेती. झाडांची मुळे द्रवात बुडालेली ठेवून, त्यात पोषणमूल्ये आणि हवेचा पुरवठा यांची सोय केली, तर झाडे उत्तम वाढतात, असे आढळले आहे. सॅलडमध्ये वापरण्यात येणारी पाने, पालेभाज्या आणि टोमॅटोसारख्या फळभाज्या, या हायड्रोपॉनिक्स तंत्राने वाढवण्यात येत आहेत. हे तंत्र कमी वापरात असले, तरी त्याची कार्यक्षमता जास्त आहे. बंदिस्त जागेत कृत्रिम प्रकाशात हायड्रोपॉनिक्स तंत्राने वाढविलेली भाजी आणि फळे कीटकनाशक, तणनाशक अशा रसायनांपासून मुक्त असते, हे या तंत्राचे वैशिष्ट्य आहे.

सूर्यप्रकाश आणि उबदार वातावरण ही दोन्ही वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असतात, परंतु तीव्र सूर्यप्रकाश आणि उच्च तापमान वनस्पतीच्या वाढीला पोषक नसतात. किंबहुना, जास्त वेळ तीव्र प्रकाशात आणि उच्च तापमानात राहिल्यास वनस्पतींना बाधा पोहोचते. भारतातल्या बहुतांश ठिकाणी दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश आणि तापमान हे वनस्पतीच्या आवश्यकतेपेक्षा जास्त असते; त्यामुळे वनस्पतीच्या उत्पादकतेमध्ये घट होते. पालेभाज्या आणि फळभाज्या यांच्या झाडांची उंची बहुधा फारशी नसते, त्यामुळे अंशतः सावली देणाऱ्या जाळीच्या छताखाली त्यांचे पीक घेता येते. अशा जाळीच्या आडोशाला शेड नेट असे म्हणतात. यावर पांघरायची जाळी ही कृत्रिम धाग्याची बनलेली असते. जाळीच्या वेगवेगळ्या दाटपणामुळे प्रकाशात हवी तेव्हढी कपात करता येते. सूर्यप्रकाशाच्या कपातीबरोबरच तापमानात देखील घट होते; आणि सूर्यप्रकाश व तापमान हे शेड नेटमध्ये लावलेल्या पिकाला पोषक असे बनते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरण हे वनस्पतींना हानिकारक असतात. शेड नेटच्या वापराने अतिनील किरण शोषली जातात व वनस्पतींना इजा होणे टाळता येते. शेड नेटच्या वापराने पालेभाज्या आणि फळभाज्या यांच्या उत्पादनात आणि गुणवत्तेत सुधारणा झाली आहे. शेड नेट घराची किंमत दर चौरस मीटरला रु. ४५०/- ते रु. ६५०/-च्या आसपास असते. म्हणजे, दर हेक्टरी रु.४७ लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. हा खर्च सामान्य शेतकरी करू शकत नसल्यामुळे हे तंत्रज्ञान मर्यादित स्वरूपात वापरले जात आहे. कमी किंमत असलेले पर्यायदेखील लाखोंच्या घरात असतात. स्थानिक साहित्याचा वापर करून कमी खर्चिक छोटी शेड नेट घरे बनविता येणे शक्य आहे. या क्षेत्रात अधिक काम होणे आवश्यक आहे.

ज्या ठिकाणी हिवाळ्यात बर्फ पडते, तिथे भाज्या आणि फळे यांची झाडे वाढविण्यासाठी काचगृहे ( ग्लास हाऊस) असतात. काचगृहात वनस्पतींना नैसर्गिक प्रकाश मिळतो आणि सूर्याची उष्णता बंदिस्त होते, त्यामुळे बाहेर बर्फ असूनही काचगृहात भाज्या आणि फळे पिकविता येतात. काचगृह बांधण्यास महाग असल्याने काचेऐवजी पारदर्शक प्लास्टिकचे आवरण वापरून पॉली हाऊस बनवितात. पॉली हाऊसमध्ये सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यांचे नियंत्रण करता येते. तसेच, तणे आणि कीटक यांपासून वनस्पतीचे संरक्षण होते; त्यामुळे भाज्या आणि फळे यांचे उत्पादन वाढते, तसेच गुणवत्तादेखील सुधारते. कोबी, कारली, ढोबळी मिरची, रंगीत ढोबळी मिरची, मुळा, फ्लॉवर, मिरची, कोथिंबीर, कांदा, पालक, टोमॅटो, या भाज्या पॉली हाऊसमध्ये लावल्या जातात. पॉली हाऊस उभारणीचा खर्च दर चौरस मीटरला साधारण रु.७००/- ते रु.१०००/- इतका असतो. सहाजिकच, भांडवलासाठी इतका खर्च न परवडणारे शेतकरी या तंत्रज्ञानापासून वंचित राहिले आहेत. मात्र, पॉली हाऊस वापरून काकडी, हिरवी किंवा रंगीत ढोबळी मिरची, यांचे उत्पादन करणारे शेतकरी आहेत. सध्या तरी भाज्यांपेक्षा फुलांची शेती पॉली हाऊससाठी योग्य ठरते आहे, परंतु हवामानाचा वाढता लहरीपणा लक्षात घेता, भाजी उत्पादनासाठी या तंत्राची गरज भासणार आहे.

मल्च म्हणजे मातीवर आवरण वापरणे. हे आवरण विविध प्रकारचे असू शकते, परंतु वाळलेल्या काड्या, पालापाचोळा किंवा प्लास्टिकची चादर, हे जास्त करून वापरात येतात. शेतात झाडांच्या मध्ये जी उघडी जमीन असते, त्या जमिनीवर जर आच्छादन अंथरले, तर बाष्पीभवनामुळे पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते. मुळांच्या जवळच्या मातीचे तापमान नियंत्रित राहते आणि मोकळ्या जागेत होणाऱ्या तणांच्या वाढीला अटकाव होतो. यामुळे पिकाची वाढ चांगली होते, उत्पादनात वाढ होते आणि काही बाबतीत गुणवत्तादेखील सुधारते, असे आढळले आहे. वांगी, भेंडी, बटाटा, टोमॅटो, घेवडा, काकडी, कोबी, फ्लॉवर, मिरची, गाजर, या सर्व भाज्यांमध्ये मल्चिंगच्या वापराने उत्पादनात वाढ आढळली आहे. फळबागांमध्ये देखील मल्चिंगचा वापर केला जात आहे. आच्छादनाच्या पराने पिकाकडून खताचा वापर जास्त चांगला केला जातो. तसेच, वाऱ्यामुळे आणि पावसामुळे होणारी मातीची धूपदेखील कमी होते. या सर्वांचा परिणाम उत्पादनवाढीवर सकारात्मक झाला आहे.

मजल्यामध्ये किंवा उभ्या रचलेल्या थरांमध्ये पिके घेण्याच्या पद्धतीला व्हर्टिकल फार्मिंग म्हणतात. यात वर्षभर भाज्या घेता येतात. या पद्धतीमध्ये जमिनीच्या क्षेत्रफळाची आणि पाण्याची लक्षणीय बचत करणे शक्य आहे. बाह्य विपरीत हवामानाचा फळे व भाज्या यांवरील परिणाम तंत्रज्ञानाद्वारे टाळता येतो. भाज्या आणि फळे यांचा टिकाऊपणा वाढला, तर त्यांची वाहतूक आणि वितरण यांसाठी वेळ मिळतो. याच उद्देशाने ज्या संस्करण पद्धतींवर संशोधन झाले आहे, त्यात प्रारण संस्करण महत्त्वाचे आहे. नैसर्गिक समस्थानिकांपासून निघणाऱ्या गामा किरणांमध्ये खूप ऊर्जा असते; त्यामुळे ते एखाद्या अणूवर पडल्यास, त्या अणूमधल्या एखाद्या इलेक्ट्रॉनला त्याच्या कक्षेबाहेर भिरकावून देऊ शकतात. यामुळे अणुरेणूंमधील रासायनिक बंध तुटू शकतात. नेमका याच गुणधर्माचा वापर करून खाद्यपदार्थ निर्जंतुक करण्यासाठी गामा किरणांचा वापर करण्यात आलेला आहे. खाद्यपदार्थांवर असलेल्या जीवाणू किंवा आत शिरलेल्या कीटकांना बाधक ठरेल, इतकी गामा किरणांची मात्रा वापरल्यास, अन्नपदार्थाचे पोषणमूल्य, स्वाद, रुची, बाह्यरूप यांपैकी कोणत्याही गुणधर्मात फरक न पडता, तो पदार्थ निर्जंतुक होतो.

भारतीय आंबा परदेशी पाठविताना त्याबरोबर कीटक जाऊ नयेत, यासाठी गामा किरण संस्करणावर बरेच संशोधन झाले; आणि ते यशस्वी झाले. त्यासाठी लासलगाव येथे ‘कृषक’ हे गामा किरण संयंत्र स्थापित करण्यात आले आहे. आता इतरही फळे, भाज्या यांचा टिकाऊपणा वाढविण्यासाठी आणि जंतूंचा भार कमी करण्यासाठी या तंत्राचा वापर होतो आहे. बटाटा आणि कांदा यांना मोड फुटले की ते विक्रीसाठी अयोग्य ठरतात. गामा किरणांची विशिष्ट मात्रा वापरून त्यांना मोड येणार नाहीत, अशी स्थिती निर्माण करता येते.

संस्करण क्षेत्रामध्ये प्रगती झाल्याने फळे आणि भाज्या यांच्या उपलब्धतेला हातभार लागला आहे. आपल्या देशात बहुतांशी हवामान उबदार आणि दमट असते. अशा हवामानात फळे व भाज्या लवकर नाश पावतात. जास्त तापमानाला त्यांचा अंगीभूत चयापचयाचा वेग जास्त असतो; त्यामुळे फळे पिकणे आणि त्यानंतर खराब होणे, या क्रिया काही दिवसातच होतात. याखेरीज, उबदार आणि दमट हवामानात त्यांच्यावर जीवाणू, बुरशी यांची वाढ होते व ते खाण्यासाठी अयोग्य बनतात. तापमान कमी असेल, हवेत आर्द्रता कमी असेल, तर खराब होण्याची क्रिया सावकाश होते. त्यामुळे फळे आणि भाज्या यांची वाहतूक करण्यासाठी वातानुकूलित वाहने आणि साठवणीसाठी वातानुकूलित गोदामांचा वापर करून भाज्या आणि फळे जास्त दिवस टिकवली जातात. जशी हवेतील आर्द्रता जीवाणू आणि बुरशी यांना पोषक असते, तशीच खाद्यपदार्थातील आर्द्रतादेखील पोषक असते. त्यामुळे पारंपरिक पद्धतीत देखील भाज्या आणि फळे वाळवून, नंतर कालांतराने वापरत असत. वाळवलेली हरभऱ्याची भाजी, मेथीची पाने ही भाज्यांची; आणि बेदाणा, मनुका, सुके अंजीर, बोरे ही फळांची उदाहरणे आहेत. पूर्वी वाळविण्यासाठी वस्तू कडक उन्हात पसरून ठेवाव्या लागत. आता सोलर वाळवणी यंत्रांमुळे याच वस्तू लवकर, कमी जागेत आणि जास्त स्वच्छ पद्धतीने वाळवता येतात. वाळवणी यंत्राच्या वापराने बेदाणे बनविण्याच्या उद्योगात मोठी वाढ झाली आहे. तसेच, इतर भाज्यादेखील वाळविण्याचे प्रमाण वाढले आहे. ताज्या भाज्यांपेक्षा यांच्या पोषणमूल्यात घट होत असली, तरी ज्या वेळी भाज्या आणि फळे यांची टंचाई असते, त्या वेळेस वाळवलेल्या वस्तूंचा उपयोग महत्त्वाचा ठरतो.

फळे आणि भाज्या हा शेतमाल नाशवंत या प्रकारात मोडतो. उत्पादन झाल्यानंतर तो वापराच्या जागी त्वरित पोहोचणे महत्त्वाचे असते. गेल्या काही वर्षांमधील एका वेगळ्याच क्षेत्रातील विकास हा फळे आणि भाज्यांच्या उपलब्धतेला हातभार लावतो आहे. नव्या रस्त्यांची बांधणी, रस्त्यांच्या गुणवत्तेत सुधारणा, वाहनांच्या वेगातील सुधारणा, यांमुळे फळे आणि भाज्या, त्यातल्या त्यात पालेभाज्या ग्राहकापर्यंत खराब होण्याआधी पोहोचायला मदत होते आहे.

सध्या आपण जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्युएचओ) या संस्थेने सुचविलेल्या दरडोई भाज्या आणि फळे यांच्या सेवनाच्या सरासरी जवळ आहोत. परंतु, प्रत्येक व्यक्तीला दररोज फळे आणि भाज्या यांचा पुरेसा आणि नियमित पुरवठा व्हायचा असेल, तर तंत्रज्ञानाची मोठ्या प्रमाणावर मदत घ्यावी लागणार आहे.

फळे आणि भाज्या यांच्या निर्मिती आणि उपलब्धतेत तंत्रज्ञान आपले काम चोख बजावते आहे. असे म्हणता येईल की, हे असे क्षेत्र आहे, की ज्याचा प्रत्यक्ष फायदा समाजाच्या प्रत्येक थरातील व्यक्तीपर्यंत थेट पोहोचतो आहे. अजूनही उत्पादन, वाहतूक, साठवण यांच्याबाबतीत तंत्रज्ञान वापरून सुधारणा करणे शक्य आहे; आणि ते आवश्यकदेखील आहे. यासाठी नवे संशोधन आणि उपलब्ध ज्ञानाचा वापर या दोन्ही बाबींवर लक्ष देणे आवश्यक आहे.

आतापर्यंत आपण हवामानातील नियमितता आणि त्यावर अवलंबून असलेले शेतीचे हंगाम, हे गृहीत धरून चाललो होतो. परंतु, गेल्या काही वर्षांमध्ये अवकाळी पाऊस, चक्रीवादळे, उष्णतेची किंवा थंडीची लाट, यांच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. फळे आणि भाज्या यांच्या उपलब्धतेत स्थैर्य आणि सुधारणा हवी असेल, तर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होणे आवश्यक ठरणार आहे. ती काळाची गरज आहे.

– सुरेश गोपाळ भागवत

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..