नवीन लेखन...

उत्कट

भावनातिरेक आणि अश्रुपात या ठरलेल्या समीकरणाची प्रचिती पोलिस अधिकायाला जेवढी येते तेवढी क्वचितच कोणाच्या अनुभवाला येत असेल. सहन होण्यापलीकडील दुःख आणि मन कोळपून टाकणाऱ्या दु:खाची परिस्थिती बदलण्याबद्दलची अनिश्चितता यामुळे अशी व्यक्ती क्षणाक्षणाला हतबल होत जाते.

मुळात ” पोलीस” या संस्थेभोवतीचे प्रवाद, समज आणि संशयाची वलये सर्वसामान्यांच्या मनावर गोंदवल्यासारखी घट्ट असतात. पोलिसातील एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या गुणांबाबत कौतुक करतानाही ”पोलिसात असूनसुद्धा ” हे पालुपद चिकटतं, यात सर्व काही आलं.

तक्रार घेऊन आलेली व्यक्ती ही आपले दुःख कमी व्हावे या उद्देशाने शेवटचा उपाय म्हणून पोलिसांकडे येते. तिची एकमेव अपेक्षा त्याच्या दुःखाच्या समस्येचे तात्काळ निवारण व्हावे अशी असते. पोलीस अधिकारी मात्र तक्रारीच्या स्वरूपाचा आढावा घेत घेत त्या तक्रारीनुरुप करावयाच्या कायदेशीर प्रक्रियेची मनात जुळवाजुळव करत असतो. त्या त्या प्रत्येक तक्रारीमागील घटनांचे कारण, त्यामुळे होणाऱ्या परिणामांचे, त्यावर कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे, नवीन तक्रारीचे स्वरूप हातातील काम बाजूला ठेवण्या इतपत तातडी निर्माण करणारे असले, तर वरिष्ठांना तात्काळ कल्पना देण्याबाबत असे एक ना अनेक विचार त्याच्या मनात गर्दी करून असतात. याचा परिणाम म्हणून कि काय एखादा डॉक्टर जसा पेशंट तपासताना विचलित होत नाही तसाच पोलीस अधिकारी तक्रारी हाताळताना भावनाविवश होत नाही. मात्र यामुळे होते असे की तक्रारदाराच्या मनातील पोलिसाबद्दलची ‘रुक्ष ‘ अशी प्रतिमा अधिक गडद होते. आपली तक्रार आवश्यक तेवढ्या गांभीर्याने घेतली जात नाही असा गैरसमज होऊन वाढलेली तक्रारदाराची हतबलता त्याच्या देहबोलीतून स्पष्ट दिसत असते.
मात्र पोलिस अशाही प्रसंगाचे साक्षी होतात ज्यामध्ये दु:खाश्रूंची जागा थोड्याच अवधीत आनंदाश्रू घेतात.

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात. मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच.

अशा गर्दीचे कार्यक्षेत्र असलेल्या पोलिस ठाण्यामधे, एखादी स्त्री कपड्याचे भान न ठेवता घाईघाईने पायऱ्या चढत, रडून दमेलेले डोळे शोधक नजरेने फिरवत पोलिस ठाण्यात प्रवेश करते तेव्हा समजावे, हीचे मूल गर्दीत हरवले आहे.
” साहेब माझा मुलगा हरवला आहे हो !” असं बोलून मागोमाग मोठयाने हंबरडा.

हरवलेल्या मुलाचे वडील बरोबर असले तर बाहेर टॅक्सीचे पैसे देऊन मागोमाग पोलीस ठाण्यात येतात. तेही काळजीत असतात परंतू पुरुष असल्यामुळे त्यांचे डोळे वाहात नसतात. बाळाच्या विचाराने आईचे लक्ष कशातच नसते. तिच्या संपूर्ण चेहऱ्यावर काळजी पसरलेली आणि मनात येणाऱ्या नाही नाही त्या शक्याशक्यतांच्या विचारांमुळे तिच्या डोळ्यातून सतत अश्रूंचा पूर लोटत असतो. ड्युटी ऑफिसरने बसायची खूण केली आणि बाळाचे वडील खुर्चीत बसले तरी आई खुर्चीत बसत नाही.

गर्दीत हात सुटून हरवलेली अशी मुले सर्व साधारणपणे अडीच ते चार वर्षाची असतात.

नित्याचा प्रकार असल्याने, ड्युटी ऑफिसर हरवलेल्या मुलाच्या वयाची, त्याच्या अंगावर असलेल्या कपड्यांची आणि शरीरावरील ओळखीच्या खुणांची तोंडी चौकशी करता करता हातातील लिखाण पुर्ण करत असतो. मुलाच्या आईवडीलांसाठी परिसर सरावाचा नसल्याने नेमक्या कोणत्या जागेवरून मुलगा हरवला हे त्याना नीट सांगता येत नाही.मग एखादया मोठया दुकानाच्या खुणेवरून वगैरे त्या जागेचा अंदाज येतो.

बाळाची आई रडत रडत ” एक मिनिटांसाठी घोटाळा झाला हो” हे वारंवार उच्चारत मुलाचा हात सोडल्याबद्दल स्वतःला दोष देत असते. एक छोटेसे टिपण करून त्याची “लहान मुले हरवल्याबाबतच्या” रजिस्टर मधे आणि पोलिस स्टेशन डायरी मधे नोंद करून, ड्युटी ऑफिसर पोलिस कंट्रोल रूमला घटना कळवतो. त्याचप्रमाणे आपल्या पोलिस ठाणे हद्दीतील संबंधित क्षेत्रात गस्तीवर असलेल्या बीट मार्शलना वायरलेस मेसेजने अलर्ट करतो. मुलाची आई रस्त्याकडे हताशपणे पहात आसवं गाळीत असते. वडील आपला मुलगा लहान असला तरी कसा हुशार आहे, पूर्ण नांव, पत्ता सांगू शकतो हे पोलिसांना सांगून हा प्रकार काही क्षणात कसा झाला हे समजावत अशा गर्दीत त्याला कडेवर न घेतल्याबाबत पश्चाताप करत बसतात.

तेवढ्यात चहावाला पोऱ्या येतो. तो सगळ्यांना ” कटिंग” वाटत असताना ड्यूटी ऑफिसर त्या दोघानाही चहा द्यायला खुणावतो. मुलाचे वडील नको नको म्हणत ग्लास उचलतात तरी. आई त्या चहाला होही म्हणत नाही आणि नाहीही. समोर असून चहा तिला दिसत नसतो. त्याक्षणी तिला फक्त आणि फक्त तिच्या हरवलेल्या बाळाचा निरागस चेहेरा दिसत असतो.
ड्युटी ऑफिसर, लागून हद्द असलेल्या पोलीस ठाण्यात स्वतः फोन लावून हरवलेल्या मुलाबाबत माहिती कळवून असा कोणी मुलगा आढळून आल्यास ताबडतोब कळवायला सांगतो.

काही पोलिस ठाण्यांच्या हद्दी इतक्या अस्पष्ट असतात की विचारता सोय नाही. रस्ता एका पोलिस स्टेशन कडे तर फुटपाथ दुसऱ्या पोलिस स्टेशन कडे असा प्रकार. त्यामुळे अगदी हद्दीच्या टोकावरील ठराविक ठिकाणाला एखादे पोलिस ठाणे काही पावलावर असले तरी, ते ठिकाण त्या पोलिस ठाणे हद्दीत असेलच असे नाही. अशा ठिकाणी हरवलेले मूल सापडले की नागरिक पोलिस स्टेशनच्या हद्दीचा विचार न करता साहजिकच जवळच्या पोलिस ठाण्यात मुलाला पोहोचवतात.
ड्यूटी ऑफिसर् शेजारच्या पोलिस ठाण्याशी बोलत असताना पलीकडे फोनवर त्याचाच बॅचमेट असला की मग त्यांच्यात कामाव्यतिरिक्त इतर माफक गप्पाही ओघाने होतात. एखादी “अरे, कालची गंमत ” वगैरे संभाषण चालू असते. इथे व्याकूळ आईचा धीर आणखी सुटत असतो. तिच्या चेहेऱ्यावर फक्त तिच्या बाळाचा ध्यास स्पष्ट दिसत असतो. पोलिस स्टेशनचा फोन सतत खणखणत असतो. प्रत्येक वेळा फोनची घंटा वाजली की आपल्या बाळाची खबर असणार या आशेने डोळ्यात आणि कानात प्राण आणून ती फोन कडे पाहाते.

मधेच इतर कामाबद्दल काही लिहित असलेल्या ड्यूटी ऑफिसरचा, लिहिता हातही आपल्या दोन्ही हातानी धरून हलवत ती आई, “साहेब बघा ना जरा कुठे गेला असेल तो!” असं शब्दा शब्दाला वाढत जाणाऱ्या रडवेल्या स्वरात विनवते. सगळं काम सोडा आणि आधी माझ्या मुलाला शोधा ही तिची स्वाभाविक अपेक्षा असते.

असाच काही काळ जातो. आणि शेजारच्या पोलिस स्टेशन मधून अपेक्षित फोन येतो. अमुक अमुक बीट चौकीमधे कुणा एकाने,गर्दीत एकटा रडत फिरणारा, चुकलेला अमुक वर्णनाचा मुलगा आणून पोहोचविला आहे.

” मिळाला आहे मुलगा तुमचा “, फोन खाली ठेवत ड्यूटी ऑफिसर त्या दोघांना सहजपणे सांगतो.

” कुठे आहे हो! कसा आहे? ठीक आहे ना हो ?” आईला पुन्हा रडू फुटतं.

चुकलेले मूल पोलिस ठाण्यात कुणी सहृदयी नागरिकाने आणून दिल्यानंतर त्याचे पालक मिळेपर्यंत पोलिस स्टेशन मधे त्या मुलाची काळजी महिला पोलिस घेतात.आईच्या आठवणीने अखंड रडत असलेल्या त्या छोटया जीवाला सांभाळणे सोपे नसते. कडेवर घेऊन पोलिस स्टेशन भोवती फिरवत चॉकलेट, बिस्किट्स वगैरे खाऊ देऊन “बच्चू हे बघ, बच्चा ते बघ ” करत त्याचं चित्त जाग्यावर ठेवायची त्यांची कसरत सतत चालू असते.

ड्यूटी ऑफिसर जीप रवाना करतो. थोड्याच वेळात या नाट्याचा बालनायक महिला पोलिसाच्या कडेवर पोलिस ठाण्यात येतो.
त्या क्षणी त्याच्या आईची अवस्था काय वर्णावी! रडता रडता ती धावत जाऊन त्याला खेचून घेते. तिचे पिल्लुही तिला बिलगते. ती त्याला कवटाळते. अचानक अतिप्रेमाने त्याला बोल लावत मारतही सुटते. पुनः घट्ट जवळ धरते. रडून रडून कळकट झालेल्या त्याच्या चेहेऱ्याचे सारखे मुके घेते. ” आता कध्धी कध्धी नाही हं असं तुला सोडणार ” असं त्याला समजावत, स्वतः रडत असताना आपल्या पदराने त्याचा रडवेला चेहेरा पुसत रहाते.

इकडे ड्युटी ऑफिसर, पोलिस कंट्रोल रूम ला फोन करून आधीच्या फोनचा संदर्भ देऊन हरवलेला मुलगा सापडल्याचे आणि पालकांच्या ताब्यात दिल्याचे कळवून, त्या प्रमाणे पोलिस स्टेशन डायरी आणि संबंधित रजिस्टर मधे नोंद घेण्यास सुरूवात करतो.

आई आता सावरलेली असते. एखादा पांडा जसा झाडाला हातांचा आणि पायांचा विळखा घालून असतो, तसच ते मूल गळ्यात हात टाकून आईला धरून असतं.

पोलिस कर्मचारी मुलाची करमणूक व्हावी म्हणून त्याच्याशी हास्यविनोद करत असतात. आईवडील आणि मूलही आता हसत असतात. आयुष्यभर लक्षात राहील अशा घटनेची आठवण मनाशी बांधून निघताना आई ड्यूटी ऑफिसरच्या किंवा या प्रसंगाचे साक्षी असलेल्या एखाद्या वयस्क हवालदारांच्या पाया पडायचा प्रयत्न करते.

मुलगा चांगला तीन साडेतीन वर्ष वयाचा, धावता येऊ शकणारा असला तरी, पोलिस स्टेशनमधून निघताना त्याचे पाय जमिनीला लावू न देता, आई त्याला कडेवर घेऊनच आनंदाश्रूना मोकळी वाट करून देत, आपल्या घरची वाट धरते.
एका उत्कट प्रसंगाचा अंक संपतो.

— अजित देशमुख.

9892944007

ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..