शरद ऋतूचा मन प्रफुल्लित करणारा अनुभव देत देत घटात विराजमान होते आदिमाया, जगज्जननी ! नऊ रात्री ज्ञानाचा अखंड नंदादीप तेवता ठेऊन ज्ञानरूपी घटातच ती साधना करते, शक्तीसंचय करते आणि झळाळत्या ज्ञानाने व मूर्तिमंत पौरुषाने निघते जग जिंकायला!
कुंठित विचारांच्या सीमा आत्मविश्वासाने ओलांडत दिग्विजय साधते ही आदिमाया आदिशक्ती ! ज्ञानाचा समृद्ध ठेवा विश्वाच्या कल्याणासाठी वाटण्याची तिची इच्छा तिला सतत कार्यमग्न ठेवते…. आणि तेजाने रसरसलेल्या चंद्राला साक्षी ठेवत ती हाक घालते –“ कोण जागे आहे? जो ज्ञानपिपासू, विजिगीषु आहे त्याला माझी शक्ती मी संक्रमित करायला उत्सुक आहे.”
मध्ययुगीन काळात आश्विन शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्ष सुरु होत असे. सुजलां सुफलां भूमी सृजनाने न्हावून निघालेली असताना नव्या वर्षाच आगमन औचित्यपूर्ण असच असे. देवीच्या नवरात्रीचा हा सोहळा अतिशय सूचक असाच आहे. हे केवळ नऊ रात्री करण्याच देवीच पूजन नाही ; तर विविध रूपे धारण करणा-या लक्ष्मीचे गुण आपल्यातही यावेत यासाठी प्रयत्न करण्याचे हे दिवस आहेत.
मार्कंडेय पुराणातील देवी महात्म्यात सांगितले आहे- “ शरद ऋतूतील वार्षिक महापूजेत देवीमाहात्म्य भक्तिपूर्वक ऐकल्यास सर्व बंधनांपासून व्यक्ती मुक्त होते आणि
देवीचे महात्म्य वर्णावे तेवढे थोडेच ! या देवीने काय काय व्यापिले आहे ?
या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता , नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: |
नवरात्रीमधे आदिमायेचा उत्सव साजरा करताना प्रत्येक स्त्रीने स्वत्वाचा जागर करण्याचाही संकल्प करावा. देवी जशी आईमध्ये वसत आहे तशीच ती निद्रा, बुध्दी, तृष्णा , क्षुधा यामध्येही आहे.पोषण करणारी तहान –भूक, विचार करणारी बुध्दी, विश्रांती देणारी झोप, मन:स्वास्थ्य देणारी शांती ही प्रत्येक व्यक्तीची आवश्यक गरज ! या सर्वांमध्ये आदिमाया आहे तशीच ती आहे लज्जा, दया, क्षमा या भावनांमध्येही !
प्रत्येक जीवाच्या इंद्रियांना व्यापणारी ही शक्ती नवरात्रीत भक्ताच्या पूजेचा स्वीकार करते.
दैनंदिन आयुष्य जगत असताना प्रत्येक स्त्री- पुरुषाने या शक्तीचा आदर केला पाहिजे आणि आयुष्याला सकारात्मक वळण देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
बदलत्या गतिमान जीवनशैलीत आपल्या परंपरा जपताना त्यांना आधुनिक काळाच्या कसोटीवरही तपासून पाहिले पाहिजे. अन्याय, अत्याचार,भ्रष्ट व्यवस्था , अधर्म. अनाचार यांनी जेंव्हा समाज सैरभैर झाला त्यावेळी या आदिमायेने कालीरूप धारण केले आणि दुष्टांचा पराभव केला. शुंभ- निशुम्भासारख्या दैत्यांचा पराभव करताना रणांगणावर चौसष्ट योगिनींचे सैन्य सामूहिकपणे धावून आले आणि चामुंडारूपी देवीला त्यांनी सहाय्य केले. महिषासुर हा सहजतेने विविध रूपे धारण करून सुजानांना त्रास देणारा दैत्य. आधुनिक काळातही असे मानवरूपी असुर स्त्रीजातीला त्रास देताना दिसतात. स्त्रियांनी एकत्रितपणे अशा दुष्टंचा संहार करून पुरुषार्थ गाजविला पाहिजे.
देवीचे स्तवन करताना समर्थ रामदास म्हणतात- नवरात्रीमधे निर्माणकर्ता ब्रह्मा, रक्षणकर्ता विष्णु , आणि प्रलयकर्ता शिव मातृरूपातील देवीचे पूजन करतात प्रतिपदेला. द्वितीयेच्या दिवाशी उग्ररूप धारण केलेल्या योगिनी शेंदूर भरून, कस्तुरी लेवून दुर्जनांचा पराभव करण्यासाठी धावून जातात. मातेच्या वात्सल्यात आणि पराक्रम –पुरुषार्थात सामावलेली अष्ट्भुजा देवी तृतीयेला स्त्रीसुलभ मनमोहक रूप धारण करून सजतेही ! अलंकारांनी स्वत:ची शोभा वाढविते. विश्वाला व्यापणारी जगन्माता , वर देणारी ललिता ही सुद्धा देवीची साजिरी रूपे ! षष्ठीला जोगवा मागताना ही देवी षडरिपूंचा त्याग करून लीन व्हायला शिकविते. सप्तमीला भक्तांच्या हाकेला धावून जाते. अष्टमीला आठ भुजांमधे प्रत्येकी खड्ग, चक्र,गदा, धनुष्य-बाण , शूल, भृशुण्डी, मस्तक, व शङ्ख धारण करून नारायणाच्या साहचर्याने विशवाचे कल्याण करते.
— आर्या आशुतोष जोशी
Leave a Reply