नवीन लेखन...

कांबळेंचे भाग्यशाली अध्यक्षपद

Uttam Kamble - Sahitya Sammelan at Thane

ठाणे साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या साहित्यिक उत्तम कांबळे यांची ‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजूनघेताना’ ही आत्मचरित्रात्मक पुस्तके आणि इतर साहित्य सुपरिचित आहे. त्यांनी मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे,सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम योजले आहेत. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवणार्‍या कांबळेंसाठी हे अध्यक्षपद भाग्यशाली ठरावे.

उत्तम कांबळे यांना पन्नाशीच्या टप्प्यावर अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले, हे एक आश्चर्यच म्हणायला हवे. इतक्या कमी वयाच्या व्यक्तीला अध्यक्षपद मिळणे हे अपवादात्मकच! साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद एखाद्या जीवनगौरवपुरस्कारासारखे, आयुष्याच्या अखेरच्या पर्वात घ्यावयाचे मान्यतापत्र असल्याचे सर्वसामान्य धोरण आजवर प्रमाण मानले गेलेले दिसते. त्यामुळे या सन्मानाला पात्र होणारी व्यक्ती किमान सत्तरीच्या घरातली असावी. वयाची सत्तरी गाठेपर्यंत कोणाही लेखकाचा या पदासाठी विचार करू नये असा जणू एक अलिखित पायंडाच पडला आहे. सत्तरी पार केलेल्या साहित्यिकाला शरीर आणि आरोग्य नीट साथ देतेच असे नाही, त्यामुळे अध्यक्षपदाचे संमेलनसंबंधित समारंभातले तीन दिवसांचे कार्यक्रम पार पडेल की नंतरच्या वर्षभरात महारारष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरी वाचनसंकृतीच्या प्रसारासाठी कितपत भ्रमंती करायची हे जो तो आपल्या तब्येतीनुसार ठरवतो आणि कमी-जास्त मिरवतो. परंतु काहीजण इतके गलितगात्र असतात की वर्षभरात पाच दहा कार्यक्रमातच थकतात.

या पार्श्वभूमीवर उत्तम कांबळे यांना पंचावन्नाव्या वर्षी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले हे एका परिवर्तनाचे प्रतीक आहे असे बिनदिक्कत म्हणता येईल. ते वर्षभर महाराष्ट्रभर संचार करून मराठी साहित्य, दलित साहित्य, वाचन संस्कृती, मराठी पत्रकारिता आणि समाजिक परिवर्तन यांचा संदेश देण्यात कसूर करणार नाहीत अशी अपेक्षा बाळगायला हरकत नाही. इतर वयोवृध्द अध्यक्षांसारखी त्यांची तब्येतीची तक्रार तरी असणार नाही अर्थात त्याबाबत त्यांनी थोडी काळजी घेणे ईष्ट ठरेल. ज्येष्ठ विनोदी लेखक रमेश मंत्री कोल्हापूर संमेलनाचे अध्यक्ष झाले. पुढे ते महाराष्ट्रभर ग्रंथजत्रा घेऊन हिंडले. पन्नासेक ठिकाणी ते गेले. परंतु, त्यानंतर त्यांना पक्षाघाताने गाठले. त्यांचे बोलणेच बंद झाले आणि काही महिन्यांनी त्यांचे देहावसान झाले. आपल्याला झेपेल इतपतच जबाबदारी अंगावर घेणे हे त्यामुळे शहाणपणाचे ठरते. केशव मेश्रामही अध्यक्षीय काळात खूप भटकले. पण, त्यानंतर ते फार काळ राहिले नाहीत.

असो. उत्तम कांबळे यांच्या निवडीद्वारे महाराष्ट्राने आपली पुरोगामी मानसिकता प्रकट केली आहे, तिने समाजाच्या सर्व थरांविषयी वाटणारी आत्मियता दाखवली आहे. आपल्या मनाची कवाडे खुली होत आहेत याची ग्वाही दिली आहे. उत्तम कांबळे यांनी आपल्या लेखन कर्तृत्वाच्या बळावर एका प्रमुख दैनिकाचे समूह संपादकपद मिळवले. त्याच वृत्तपत्रात उमेदवारी करून, नाशिक आवृत्तीचे संपादकपद मिळवून, संबंधितांचा विश्वास संपादन करून समूह संपादकापदापर्यंत मजल मारली ही अभिमानास्पद बाब आहे. पत्रकार म्हणून जागरूक राहून केवळ वृत्तसंकलन आणि वृत्तपत्रीय मतप्रदर्शन एवढ्यावरच संतोष न मानता उत्तम कांबळे यांनी कथा, काव्य, कादंबरी, आत्मकथन अशा स्वरूपाचे लेखन करून पत्रकाराबरोबर एक लेखक, ललित लेखक, कादंबरीकार, साहित्यकार म्हणूनही जनमानसावर आपली प्रतिमा ठसवली. शोषितांचा, उपेक्षितांचा प्रतिनिधी म्हणून त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिली.

‘वाट तुडवताना’ आणि ‘आई समजून घेताना’ ही आत्मचरित्रात्मक पुस्तके, श्राद्ध आणि अस्वस्थ नायक या दोन कादंबर्‍या, रंग माणसांचे, कावळे आणि माणसे, कथा माणसांच्या, न दिसणारी लढाई वगैरे कथासंग्रह, नाशिक-तू एक सुंदर हे खंडकाव्य अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. पत्रकारिता आणि साहित्यातील पन्नासहून अधिक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. एवढ्या लेखनकर्तृत्वावर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडतेच असे नाही. परंतु त्यांना सांगलीच्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपद उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी अनपेक्षितपणे बहाल केले आणि त्यांची वाङमयीन महत्त्वाकांक्षी जागी झाली असावी. सांगली संमेलनाचे स्वागताध्यक्षपद स्वीकारले म्हणून त्यांच्यावर विद्रोही साहित्य संमेलनाचे कार्यकर्ते नाराज झाले. परंतु, कांबळे यांना मुख्य प्रवाहात सामील होण्यात आनंद वाटला. संमेलनाच्या यशाने त्यांचा हुरूप वाढला. कांबळे यांनी आपली प्रचार मोहिम सुविहितपणे राबवली आणि सर्व भागातील मतदारांशी संपर्क साधण्यात कसूर केली नाही. त्यामुळे त्यांना विक्रमी मतांची नोंद करता आली. उत्तम कांबळे यांनी अध्यक्षीय कारकीर्दीत मराठी वाचन चळवळ गावोगावी पोचवणे, जगण्याच्या धडपडीत गुंतलेल्या सामान्य माणसाला वाचनसंपन्न करणे, मांडवाबाहेरच्या पुरोगामी मंडळींना मुख्य मंडपात बोलावून विचारमंथन करण्याची संधी देणे वगैरे उपक्रम हाती घेण्याचे जाहीर केले आहे. पत्रकार, साहित्यिक आणि पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता या तिन्ही भूमिका परस्परपूरक आहेत, आपल्या लेखणीने आणि वाणीने समाजाच्या परिवर्तनाला गती देण्याची संधी पत्रकार-साहित्यिकाला सतत भूल टाकत असते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे वय यौवनाकडे झुकवण्याचे श्रेय उत्तम कांबळे यांना द्यायला हवे. ठाणे संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्यासाठी भाग्यशाली ठरावे. नावीन्यपूर्ण सर्वसमावेशक कार्यक्रमांनी या संमेलनाला तरुणाईचे वरदान लाभावे. तरुणवर्गाला आकृष्ट
करणार्‍या वाङमयीन कार्यक्रमांची रेलचेल त्यात असावी.

– शंकर सारडा
(अद्वैत फीचर्स)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..