
व्ही पी बेडेकर अँन्ड सन्सचे डायरेक्टर अतुल बेडेकर यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९६७ रोजी झाला. अतुल बेडेकर रा. स्व. संघाच्या गिरगाव नगराचे संघचालक होते. तसेच जनता सहकारी बँक पुणेचे संचालकही होते. इतरही अनेक सामाजिक संस्थांमधे मोठ्या प्रमाणात ते सक्रीय सहभागी होते.
बेडेकर हे लोणची, मसाले व या पारंपरिक मराठी खाद्यपदार्थ व्यवसायातील प्रतिष्ठित नाव आहे. १९१० मध्ये विश्वनाथ परशराम बेडेकर यांनी गिरगावात लहानसे किराण्याचे दुकान सुरू केले. त्याच दुकानात त्यांनी मसाले आणि लोणची ठेवण्यास सुरुवात केली. मसाले व लोणच्यांचा खप भरपूर व्हायला लागल्यावर दुकानाच्या शाखा काढायला सुरुवात केली. मूगभाट, दादर, फोर्टमध्ये माणकेश्वर मंदिराजवळ बेडेकरांची अल्पावधीतच पाच दुकाने झाली.
पुढे धंद्याचा व्याप वाढता राहिल्यावर १९४३ मध्ये ‘व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स लिमिटेड’ असे कंपनीचे नामकरण केले. बघता बघता त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्यवसाने व्यापला.
बेडेकर कंपनी ही पुर्वी लोणच्याचा तयार मसाला,गोडा मसाला,सांबार पावडर,संडे मसाला,गरम मसाला,दूध मसाला अशा काही मोजक्याच मासाल्यांकरिता फेमस होती,पुढे बेडेकर बंधूनी पावभाजी मसाला,छोले मसाला,चाट मसाला,जलजीरा अशी नवीन रेंज बाजारात आणली.
फक्त देशातच नाही तर ज्या ज्या देशांत मराठी माणूस पोहचला तिथे तिथे बेडेकर उत्पादनेही पोहोचली.१९६० साली भारतात प्रथम पी. पी. लीक प्रूफ कॅप्स बेडेकरांनी वापरल्या आणि मग लोणची निर्यात होऊ लागली. कर्जत व इतरच्या कारखान्यात जवळपास ६०० टन लोणचे सीझनला बनते. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, छत्तीसगड मध्ये विक्री होते. त्याचबरोबर सातासमुद्रापलीकडे बेडेकर नाव पोहोचले आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व, ऑस्ट्रेलिया, युरोप आणि पूर्वेकडील देशांमध्ये देखील निर्यात होते.
अतुल बेडेकर खूप व्हिजनरी आंत्रप्रेनर होते. आपले बंधू अजित बेडेकर यांच्या सोबत अतुल बेडेकर यांनी अगदी उकडीच्या मोदक,मसालेभात, बटाटेवडा ते भाजणीच्या थालिपीठापर्यंत अनेक मराठी स्वादिष्ट पदार्थ त्यांनी फ्रोझन स्वरूपात आणले.ते एक्स्पोर्टही केले.त्याकरिता त्यांनी खूप परिश्रमही घेतले.यामुळेच हे पारंपारिक मराठी पदार्थ पंचतारांकित हॉटेल्स, एअर इंडियाची विमाने यातही उपलब्ध होऊ शकत आहेत, ही त्यांची कौतुकास्पद कामगिरी आहे.
अतुल बेडेकर यांचं ३ नोव्हेंबर २०२३ रोजी निधन झालं
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply