प्रिय नितीन
तुमचं पत्र मस्त आहे.
पण ओव्हरमधला
शेवटचा चेंडू फसवा आहे.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे
मला टाळायची नाहीत .पण
तो विषय लेखनाचा नाही.
त्या प्रश्नांची उत्तरं प्रत्यक्ष
गप्पागोष्टी करत दयायला
आवडतील.
दिवस ठरवू या .
आणि बोलू या.
चलेगा ?
तुमचा
व पु काळे
८ ऑगस्ट १९८१
______________________________________________________________________
परवाच्या धांडोळ्यात हे पत्र सापडलं. त्याकाळी जनरली मोठे साहित्यिक अनोळखी पत्रांनाही त्वरीत उत्तर देत.
झाले असे की, तो काळ (इतरांप्रमाणे) मीही वपुंचा प्रचंड फॅन असण्याचा होता. त्यांची पुस्तके वाचून (विशेषतः “पार्टनर “) मी एका उर्मीत त्यांना एक पत्र लिहिले होते. त्यांत विचारलं होतं –
“वपु , खरं सांगा, तुमच्या साहित्यात वर्णन केल्याप्रमाणे, वसुन्धरा (पत्नी) आणि तुमची मुले प्रत्यक्षातही तशीच आहेत कां ?”
या प्रश्नाचे उत्तर म्हणून वरील पत्र !
पत्र मिळाल्यावर मी हवेत ! पुढील आठवडयात सायंकाळी पाच वाजता त्यांचे बालगंधर्वला कथाकथन होते. बजाज ऑटोमधून मी थेट रंगमंदिरात ! सोबत पत्र होतेच. कार्यक्रम संपल्यावर रंगपटात गेलो, ओळख करून दिली आणि पत्र त्यांच्या समोर धरलं.
त्यावर बोलायला ते अनुत्सुक वाटले. काहीतरी बोलून त्यांनी माझी बोळवण केली. बहुधा दमले असावेत किंवा लगेच मुंबईला जायचे असावे.
त्यानंतर काही दिवसांनी रात्री टिळक स्मारकला वपु “पार्टनर” चे अभिवाचन करणार होते. ही संधी कोण सोडणार ?
पुन्हा पत्रासह गेलो. यावेळी माझा मामेभाऊ (तोही वपु फॅन) बरोबर होता. पण अपेक्षित प्रतिसाद नाही. एकतर ते संदर्भ विसरले होते, टाळाटाळ करत होते किंवा पत्रलेखक वपु आणि “प्रत्यक्षातील “वपु वेगळे असावेत.
असो. मी नाद सोडला. आज या पत्राने हे सारं आठवलं.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply