नवीन लेखन...

वपु नव्हे .. अत्तराची कुपी!

वपु आज हयात असते तर २५ मार्च २०२२ रोजी, म्हणजेच गेल्या महिन्यात त्यांनी नव्वदी पूर्ण केली असती… पण तसं काही घडलं नाही, ते एकवीस वर्षांपूर्वीच स्वर्गवासी झाले..

खरं तर त्यांच्या प्रत्येक कथेवर चित्रपट निर्मिती होऊ शकते.. मात्र तसं काही फारसं प्रत्यक्षात घडलं नाही. त्यांच्या साहित्यावर इनमीन, तीनच मराठी चित्रपटांची निर्मिती झाली.. १९७० साली वपुंच्या कथेवर ‘मुंबईचा जावई’ हा चित्रपट, २०१२ साली त्यांच्या ‘पार्टनर’ कादंबरीवर आधारित ‘पार्टनर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. २०१५ साली वपुंच्या ‘बदली’ या कथेवरुन ‘पेईंग घोस्ट’ या विनोदी मराठी चित्रपटाची निर्मिती झाली होती..

‘ही वाट एकटीची’ ही वपुंची कादंबरी ‘सिनेमॅटिक’ आहे, मात्र कुणाही निर्मात्याचे अद्याप तिच्याकडे लक्ष गेलेले नाही..

१९७० साली जेव्हा ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटासाठी वपुंच्या कथेची निवड झाली, तेव्हा वपु फारसे प्रसिद्ध नव्हते. श्रेयनामावलीमध्ये, वसंत काळे यांच्या कथेवर आधारित असे लिहिले होते..

दिग्दर्शक होते, राजा ठाकूर. गीते लिहिली होती, गदिमांनी. संगीत, सुधीर फडके यांचं. छायाचित्रण अरविंद लाड यांचं होतं. इनडोअर शुटींग झालं होतं, भालजी पेंढारकरांच्या ‘जयप्रभा’ स्टुडिओमध्ये.

मुंबईच्या चाळींमधील मध्यमवर्गीय माणसांचं जीवन या चित्रपटातून दाखवलं होतं. चाळीतील अपुऱ्या जागेमध्ये देखील, माणसं कशी गुण्यागोविंदानं नांदतात हे दिग्दर्शकाने उत्तमरित्या दाखवलं होतं. शरद तळवलकर व रत्नमाला या आई-वडीलांची दोन मुलं. एक अरुण सरनाईक व दुसरा राजा दाणी. अरुणचं रंजिताशी लग्न झालेलं आहे व राजाचं, व्हायचं आहे. दर रविवारी यांच्या घरात मित्रांबरोबर पत्यांचा डाव खेळणं चालूच असतं.

राजासाठी, सुरेखा हिला पहाण्याचा कार्यक्रम होतो. लग्न ठरतं, होतं देखील.. या दोघांना एकांत मिळावा म्हणून शरद तळवलकर व रत्नमाला आणि अरुण व रंजिता दिवसभर बाहेर वेळ काढतात. त्या दिवशी नेमका राजा उशीरा घरी येतो.. कधी हे नवं जोडपं चौपाटीवर फिरायला जातं.. अशा अनेक प्रसंगांतून हा हलकाफुलका चित्रपट, कौटुंबिक समाधान देतो..

यातील तिन्ही गीतं सर्वोत्तम आहेत. ‘प्रथम तुज पाहता..’ हे नाट्यगीत पडद्यावर अरुण सरनाईक व आवाज दिला आहे, रामदास कामत यांनी. ‘आज कुणीतरी यावे..’ हे गीत आशा भोसले यांनी अप्रतिम गायलंय.. ‘कशी करु स्वागता..’ या गीताला आवाज दिला आहे सुमन कल्याणपूर यांनी.. ही तिन्ही गीतं अवीट गोडीची आहेत…

या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक भाषेतील चित्रपट म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. १९७१ मध्ये हा चित्रपट रशियामध्ये प्रदर्शित करण्यासाठी, त्यांच्या भाषेत डब केला गेला. याच चित्रपटावरुन हिंदीमध्ये राजश्री प्राॅडक्शनने १९७२ साली बासु चटर्जी दिग्दर्शित ‘पिया का घर’ हा चित्रपट प्रदर्शित केला. यामध्ये अनिल धवन व जया भादुरी हे कलाकार होते.. मराठी व हिंदी दोन्ही चित्रपटांनी उत्तम व्यवसाय केला..

आजही हे दोन्ही चित्रपट युट्युबवर उपलब्ध आहेत. सांगायचा मुद्दा असा की, आपल्या मराठी साहित्यामध्ये नामवंत लेखकांच्या, उत्कृष्ट अशा असंख्य कथा व कादंबऱ्या उपलब्ध असताना कुणाही निर्माता दिग्दर्शकाचे, त्याकडे का लक्ष जात नाही? अलीकडच्या कथा भावना प्रधान नसतात.. तंत्र सुधारलेली आहे, मात्र कथेमध्ये ‘आत्मा’ नसतो.. टीव्हीवरील वाहिन्यांच्या असंख्य मालिका, नको तेवढा भडकपणा दाखवतात. कथानक वाढवण्यासाठी नको तेवढं पाणी घालतात. कोणत्याही कथानकामधे तर्कसंगती नसते.. लेखक कथेला भरकटत नेतो.. मूळ विषय बाजूला ठेवून उपकथानकं घुसडली जातात.. हे कुठंतरी थांबायला हवं.. या मालिकांच्या प्रायोजकांना देखील, आपण प्रेक्षकांना उत्तम मनोरंजन द्यावं, असं कधीही का वाटू नये?… याचं आश्र्चर्य वाटतं…

आज नाही तर कधीही तुम्ही रटाळ मालिका पाहून बोअर झालात तर, युट्युबवरील असे जुने कृष्णधवल चित्रपट पहा व जीवनातील खरे, इंद्रधनुषी रंग अनुभवा…. वपुं सारख्या असंख्य अत्तरांच्या कुप्या उपलब्ध असताना, आपण ‘सुगंधी’ का नाही व्हायचं?

— सुरेश नावडकर.

मोबाईल: ९७३००३४२८४

२१-४-२२.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..