लहानपणा पासूनच प्रत्येकाला आपल्या वाढदिवसाचं एक कौतुक आणि नावीन्य असत. तो दिवस म्हणजे फक्त आपल्या साठी साजरा केला जाणार याची अपूर्वाई असते.
आमच्या लहानपणी ती असायची पण अगदी साध्या सरळ पद्धतीने. म्हणजे ज्या कोणाचा वाढदिवस असेल त्या दिवशी बाबा, आम्ही आबा म्हणतो ते पेढे घेऊन यायचे. ते आणले कि संध्याकाळचं देवाची दिवाबत्ती व्हायची. मग स्तोत्र जप झाला कि बाबा देवाजवळ पेढे ठेवून पहिला पेढा ज्याचा वाढदिवस त्याला भरवायचे.
लहानपणी पेढे हि गोष्ट खूप भारी वाटायची. आमच्याकडे बाबानी खूप छान प्रथा घालून दिली कि राम नवमी, कृष्ण जन्माष्टमी ,आनंदमूर्ती जन्मोत्सव , गीता जयंती आणि आम्हा भावंडांचे वाढदिवस या दिवशी पेढे आणून देवा जवळ ठेऊन भरवणे. बाबाच्या संग्रही राम विजय , हरी विजय , भगवत गीता , नवंनाथ कथासार , गजानन विजय साई लीला चरित्र असे अनेक ग्रंथ आहेत. त्या दिवशी राम नवमी असेल तर राम जन्माचा अध्याय वाचून आम्ही राम जन्मोत्सव अगदी छोट्या प्रमाण घरी साजरा करतो. आई कडे सुंठवडा करायचं काम ती ते नेमाने करते.
आता सर्वच गोष्टी वयामुळे जमत नाहीत पण लहान भाऊ मात्र त्यांच्या मार्गदर्शन खाली करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे लहानपणा पासूनच या महिन्यात कोणाचा वाढदिवस किंवा जन्मोत्सव आहे माहित असायचं. घरात गुडीपाडव्याच्या दिवशी नवीन निर्णयसागर पंचांग आणून पूजा करणे ठरलेले असायचं. त्यामुळे मराठी महिन्यात वरून जे काही दिवस यायचे ते खात्रीपूर्वक असायचे. त्या वेळी हे पंचांग कशाला काय असत त्यात ह्या गोष्टींकडे लक्ष गेलं नाही. आम्ही पुढारलेला विचाराचे ना. त्यामुळे काहीतरी आहे एवढंच माहित. पण ते करायलाच हवं ह्याचा हि तितकाच कटाक्ष बाबाचा असतोच.
पण आता कळत खूप महत्वाचं आहे हे सार. शुभ अशुभ वार, संक्रांतीचं वर्णन पंचांगात दिलेलं असत. त्यावरून संक्रांतीचे चित्र त्यात रेखाटलेले असते. त्यावरून ती तरुण ,म्हातारी, बाल्य अशी कशी आहे ते समजत. तिने काय काय परिधान केलं आहे ती गोष्ट महाग होणार हा अंदाज त्यावेळी लावला जाई. हे वर्षभरासाठीचे भाकीत तसेच ती जशी दिसते त्या वयातील लोकांना हे वर्ष सांभाळून काम करायला हवं असा हि अंदाज केला जायचा.
आताच्या मोबाईलच्या जमान्यात एका मिनिटात १०० ज्योतिषी तुमच्या मागे भविष्य सांगायला धावतील. फक्त gpay चालू असलं पाहिजे. पण एक पंचांग अनेक लोकांचे भाकीत तेव्हा पासून करत आलं आहे. अजूनही पंचांगाच्या आधारेच भविष्य सांगणे शक्य आहे. या गोष्टी खरतर लहानपणा पासून शाळेत अंतर्भूत असायला हव्या होत्या. पण आम्हाला आमच्या संस्कृती पेक्षा पाशिमात्य संस्कृतीचं कौतुक. पण साऱ्या विश्वाचा बेस आपल्याकडे आहे हे अजूनही शोधतात .
आपलं कस कस्तुरी मृग सारखं झालय. त्याला कस सुगंध येतो पण तो आपल्या जवळ म्हणजे आपल्या आतच आहे हे समजत नसत. तशी आपली अवस्था आहे.
असो, हे हि नक्कीच बदलेल कारण अनेक हात या कामी लागलेलं आहे. तसे वारे हि वाहू लागले एकदा वारे वाहू लागले कि सर्व वाऱ्याची दिशा झंझावाताकडे जाते.
हिंदू धर्म प्रमाणे वाढदिवस मराठी तिथी प्रमाणे करावं असं आहे. आता हळू हळू ते हि लोक स्वीकारायला लागले आहेत. वाढदिवस जन्मोत्सव हे आपल्याला वर्षातून स्फूर्ती चैतन्य देतात मोठ्यांचे आशीर्वाद घेणे या साठी हि भाग्य लागत.
आताचे वाढदिवस म्हणजे नको तितके बॅनर्स , मोठं मोठे केक कापणे, आणि पार्ट्या करणे. हे हि चित्र बदलेल. माणसात परिवर्तन घडत असत. ते चांगलं घडावे याचा प्रयत्न भरपूर ठिकाणी चालू आहे. हे हि बदलेल आणि आपल्या मूळ संस्कृतीकडे म्हणजेच निरोगी,आनंदित , निर्भेळ दीर्घायुषी जगणं होय.
आमच्या आई बाबांनी ती जगण्याची कला आम्हाला थोडीका असेना नक्की शिकवली. आम्ही हि प्रयत्न करतोय. पण आधुनिकतेचा पगडा एवढा आहे तो हळूहळू कमी होईल असं वाटतंय. बघूया नेहमी साकारात्मक असावं हे हि त्यातील मर्म आहे. प्रयत्नांती परमेश्वर
सौ निर्मिती नितीन सावंत (कल्पना गोपाळ जोशी) भक्तीकुंज ,
रत्नागिरी 23.12.2023
Leave a Reply