जीवनमुक्ती म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. मलाही तो पडला होता. दुःख, वेदना, द्वेष, स्वार्थ, चिकित्सा, राग, भीती या सार्यांपासून मुक्तता मिळणं म्हणजे जीवनमुक्ती असं उत्तरही मला मिळालं. उत्तर शब्दांमध्ये होतं आणि त्याचे अर्थ समजावून घेण्याची माझी क्षमताही नव्हती. एका मुलाखतीमध्ये मी भगवानांनाच विचारलं ते म्हणाले, वर्तमानात जगणं म्हणजे जीवनमुक्ती. वेदन अनुभवणं म्हणजे जीवनमुक्ती. मी अधिकच गोंधळलो. कदाचित माझ्या चेहर्यावरचा गोंधळ भगवानांच्या लक्षात आला असावा. ते म्हणाले, समजा तुझ्या घरात वाघ घुसला. काय होईल? धावपळ, घबराट, आरडाओरड आणि बरंच काही. अशा सार्या प्रवासातून तू तुझ्या दिवाणखान्यातील फोनवर लटकलेला आहेस आणि खाली वाघ शांतपणे बसलाय… कदाचित तुझी वाट पाहात. सध्या मानवाची परिस्थिती ही अशी आहे. वाघाला सामोरं जाण्याची त्याची तयारी नाहीये. तो घाबरलेला आहे. भीतीचा कडेलोट झालाय; पण जगण्याची इच्छा त्याला वाघाला सामोरं जाऊ देत नाहीये. वाघाला सामोरं जाणं, आहे ती स्थिती स्वीकारणं म्हणजे जीवनमुक्ती. एखादी गोष्ट आहे तशी स्वीकारणं म्हणजे काय ते मला कित्येक दिवस कळत नव्हतं. एके दिवशी ते कळालं. त्याचं असं झालं की, माझ्या एका मित्राचा
मला सातत्यानं फोन यायचा अन् मी काही तो स्वीकारायचो नाही. कारण त्याला काय हवं आहे, हे मला माहीत होतं. एका कर्ज प्रकरणात तो मला जामीन होता. बँकेचे तगादे आता त्याला सुरु झाले होते. तो अस्वस्थ होता. यासंदर्भात मी काहीतरी करावं ही त्याची भूमिका असणं स्वाभाविक होतं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. त्याचा फोन येणं अन् मी तो न घेणं नित्याचं व्हावं इतकं ते प्रमाण वाढलं होतं. एके दिवशी या वाघाला सामोरं जायचं ठरविलं. मीच स्वतः होऊन त्याला फोन केला. भेटीची वेळ निश्चित केली. तो काय बोलणार आणि
माझं उत्तर काय याची
उजळणी झाली. अखेर आमची भेट झाली. कॉफी सांगितली. मी म्हणालो, ‘सध्या मी कोणत्या अवस्थेत आहे ते मी आधी सांगतो मग आपण प्रश्न आणि त्याचं उत्तर कसं शोधायचं ते पाहू. तो म्हणाला, आधी मी बोलतो. तू सध्या कोणत्या अवस्थेतून जातो आहेस याची मला कल्पना आहे. माझी स्थितीतही खूप चांगली आहे, असं नव्हे; पण तुझ्यापेक्षा निश्चित चांगली आहे. तर एक कर सध्या तू तुझ्या प्रश्नावर लक्ष केंद्रित कर. माझी काळजी करु नको. माझं टेन्शन तर बिलकूल घेऊ नकोस. तुझ्या स्थितीत सुधारणा झाल्यावर पाहू काय करायचं ते. मी वाघाला सामोरं गेलो होतो, अन् वाघानं माझा फडशा पाडलेला नव्हता. परिस्थितीच्या
तीव्रतेपेक्षाही काल्पनिक तीव्रतेनं भीतीनं हादरलेला मी भगवानांच्या शब्दामागचा अर्थ अनुभवत होतो. संकट किती मोठे आहे, याचा विचार करीत बसण्यात आणि घाबरुन स्वस्थता घालविण्यात अर्थ नाही. थेट संकटाला भिडायला हवे.
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.
Leave a Reply