आई-वडील दोघेही प्रख्यात वैज्ञानिक होते. त्यामुळे संशोधनाचे बाळकडू जणू तिला लहानपणापासून मिळाले होते. आई-वडिलांचा तिला सार्थ अभिमान होता. कारण दोघांनाही भौतिकशास्त्रातील संशोधनाबद्दल नोबेल पुरस्कार मिळाला होता. तिच्या आईने तर दोनदा नोबेल पुरस्कार मिळवून साऱ्या जगाला आश्चर्यचकित केले होते. अशा या थोर संशोधक आई-वडिलांचे नाव होते मेरी क्युरी व पिअरे क्युरी आणि त्यांच्या पोटी जन्म घेऊन स्वतःही नोबेल मिळविणारी ती संशोधिका होती आयरीन ज्युलिएट क्युरी. १९३५ मध्ये रसायनशास्त्रातील मौलिक शोधाबद्दल आयरीनला तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट यांच्याबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. आयरीन क्युरीचा जन्म १२ सप्टेंबर १८९७ मध्ये पॅरिस येथे झाला. रात्रंदिवस संशोधनामध्ये गढून गेलेल्या आई-वडीलांमुळे आयरीनला संशोधनाचा जणू वारसाच मिळाला होता. आयरीनने आपल्या प्राथमिक शिक्षणानंतर ‘रेडिओग्राफर नर्स’ म्हणून काम सुरू केले. अल्का किरणांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केल्याबद्दल तिला १९२५ मध्ये डॉक्टरेट मिळाली. रेडियम इंस्टिट्यूटमध्ये काम करीत असताना ती फ्रेडरिक ज्युलिएटच्या संपर्कात आली. दोघांची कार्यक्षेत्रातील आवडनिवड सारखीच होती. त्यामुळे दोघांनी १९२६ मध्ये विवाह केला व नंतर मेरी क्युरी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनकार्य सुरू केले. आयरीनने अल्का किरणांसंदर्भात आधीच संशोधन केले होते. त्यानंतर तिने रेडिओधर्मी मूलतत्त्वांची कृत्रिम निर्मिती असा शोध लावला. याच शोधाबद्दल तिला फ्रेडरिकबरोबर संयुक्तपणे नोबेल पुरस्कार मिळाला. नंतर तिने न्यूट्रॉनच्या संदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन केले. काही काळ प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर १९४६ मध्ये ती आयरीन रेडियम इन्स्टिट्यूट या संस्थेची ती संचालिका झाली. वैज्ञानिक संशोधनाबरोबरच तिला सामाजिक कार्यातही रस होता. ‘वर्ल्ड पीस कौन्सिल’ या संस्थेची ती सदस्य होती. १९५६ मध्ये पॅरिसमध्ये तिचे निधन झाले. तिचे अपूर्ण कार्य पूर्ण करण्याची जबाबदारी तिचे पती फ्रेडरिक ज्युलिएट याने नंतर पार पाडली.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
रायगडमधली कलिंगडं
महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...
Leave a Reply