मनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची समजूत घालावी, की `सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगी?’ असे म्हणत स्मृतींना उजाळा द्यावा? जन्नतमध्ये नौशादसाहेबांची मैफील शकील बदायुनी, शैलेंद्र, मदन मोहन, रफी यांच्यासोबत रंगेल का? अनेक वेड्या प्रश्नांनी भंडावून सोडणारे मन! बहिणाबाईंनी म्हटलेच आहे, `मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला परी येत पिकावर!’
माणसाचे आयुष्य फारतर पाचपन्नास वर्षांचे. त्यातही काहीतरी करण्यासारखे क्षण मोजकेच. असे असूनही द्वेíष, मत्सर, हेवेदावे अन संघर्षाकरिता लोकांना वेळ मिळतो. हा प्रकार संतापजनक आहेच; पण त्याहीपेक्षा अधिक विस्मयकारक आहे. जम्मू-काश्मीरात क्षणाक्षणाला उद्ध्वस्त होणारे संसार पाहिले की यातून कोणाचे भले होणार आहे, हे कळायला मार्ग नाही. प्राथमिक गरजांशिवाय इतर कशाची अपेक्षा न ठेवणारा सरळसोट आदिवासी नक्षलवाद्यांकडून चिरडला जातोय, कशासाठी? ही चळवळ भरकटल्याची खात्री पटायला लागली आहे.
एके काळी `बंगाल टायगर’ म्हणून मिरविलेल्या सौरभची केविलवाणी स्थिती निश्चितच क्लेशदायक आहे. त्याला अशा पद्धतीने संपविणे ही काही मंडळींची महत्त्वाकांक्षा तर नसावी? क्रिकेटच्या अतिरेकापायी इतर खेळांची होणारी हेळसांड खरोखर अक्षम्य आहे. सानियासारख्यांमुळे निर्माण झालेले टेनिसचे `ग्लॅमर’ अपवादात्मक मानावे लागेल. नाहीतर स्व. खाशाबा जाधव व ध्यानचंद यांचे नाव कितीदा काढल्या जाते, हा संशोधनाचा प्रश्न आहे.
जगाचे काहीही सुरू असो, या देशातील नेतेमंडळी मात्र जातीय समीकरणाच्या जुळवाजळवीतून सत्ताप्राप्तीची स्वप्ने पाहण्यात मशगूल आहेत. जातिपातीच्या नावाने संघटन करून, युवकांना विभागून व तिकीटवाटप करून ते कोणता संदेश जनतेत देत आहेत, याचे त्यांना भान नाही. हेच लोक आता छुप्या मार्गाने नोकरशाहीत शिरले आहेत, याची खंत वाटते. लोक संशयी होऊ लागले आहेत. याविषयी म्हणावेसे वाटते, की
याचे त्याचे अनुकरण करीत
आम्ही आपले वागत असतो,
याची त्याची मर्जी सांभाळून
उगाच कसेतरी जगत असतो.
भूतकाळातील मुदडे उकरून
विनाकारण त्यांना छळत बसतो,
इतरांची सुखदुःखे तपासून
स्वतला नाहक जाळत बसतो
द्वेषाच्या पायावर उभी इमारत
कधीच टिकाव धरत नाही,
आयुष्याच्या अखेरीस मात्र
हाती काहीच उरत नाही
असो. शेक्सपिअरच्या गावी मन वारंवार भेटी देत असत अन जालियनवाला बागेत हत्याकांड घडविणाऱया जनरल डायरलाही शिव्याशाप देत बसतं!
– प्रा. धनंजय एस. पटोकार.
प्रा. धनंजय एस. पटोकार.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply