नवीन लेखन...

वास्तु विशेषांक

दैनिक रोजची पहाट चे संपादक आणि विशेषांकांचे सम्राट सूर्याजी रवीसांडे, काका सरधोपटांची वाट पाहत होते. काका सरधोपट, रोजची पहाट चे मुख्य वार्ताहर. वेश असावा बावळा परी अंतरी नाना कळा असा अवलिया. यांच्या मुलाखती घेण्याच्याकौशल्यावर संपादकांनी आपल्या सम्राटपदाचा डोलारा उभा केला होता. तसं तर रवीसांडे आणि  रोजची पहाट दाखवणारा रवी यांच्यात काही साटंलोटं नाही. त्यांचे मूळ नाव ताकसांडे, पण त्यांच्या एका पूर्वजाने एका दमात 10 हंडे दही न थांबता घुसळले आणि त्या प्रयत्नात शेवटी दमून त्यांच्या हातून रवी सांडली तेव्हापासून त्यांचे घराणे ताकसांड्याचे रवीसांडे झाले ! ( जिज्ञासूंनी ताकसांडे -रवीसांडे घराण्याचा इतिहास, प्रकाशक पहाटप्रेस पहावा ) अर्थात ताकसांड्याचे रवीसांडे कसे झाले याचा आजच्या कथानकाशी तसा काही संबंध नाही. पण सहज ओघात आले म्हणून उल्लेख केला एवढेच ! तर सांगायचा मुद्दा, सूर्याजी रवीसांडे काका सरधोपटांची अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत होते. तोच काका प्रवेश करते झाले !

काय काका ? केवढा हा उशीर ?  या रविवारी आपला खास  वास्तुविशेषांक काढायचा आहे हे विसरलात ?

छे ! छे ! कसा विसरेन ? या क्षेत्रातील चार महान वास्तुतज्ञांची नावे आणि त्यांच्या अपॉइंटमेंट्स घेऊनच आलोय. म्हणून थोडा वेळ लागला.

मग ठीक आहे. कोण कोण आहेत हे वास्तुतज्ञ ?

शंखमणी, शंकर रुद्राक्ष अल्पविराम लहरीनाथ आणि चालू ! मोठे मोठे बिल्डर त्यांच्या सल्ल्यासाठी रांगा लावून तिष्ठत बसलेले असतात !

अरे वा छान ! पण आधी त्यांच्या बिल्डरांकडून जाहिराती मिळवल्या का ? आणि हे चालू हे काय नाव आहे का ?

जाहिरातींचे काम पहिले केले. आणि साहेब हे चा लू म्हणजे चालू नाही. ते दोन शब्द आहेत. चा आणि लू. म्हणजे ब्रूस ली, यांग लू, लू सांग तसे चा लू !

अच्छा म्हणजे हे कोणीतरी चिनी किंवा जपानी वास्तुतज्ञ दिसतात. या चिन्यांची पण कमाल आहे बरं का. आता या धंद्यातही घुसले का ते ?

छे छे ! चिनीबिनी कोणी नाही. आपले मराठीच आहेत. का म्हणजे चारुहास आणि लू म्हणजे लुकतुके ! चा लू ! स्वतःला फेंगशुई तज्ज्ञ म्हणवतात !

असू दे, असू दे. बरं आता लागा कामाला !

जाहिरातींचा मजकूर संपादकांच्या हवाली करून काकांनी गळ्यात धोकटी अडकवली आणि थेट शंखमणींचे ऑफिस गाठले !त्यांचे ऑफिस वरळीला आकाशभरारी या चाळीस मजली भव्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर होते. शंखमणी शंखाच्या आकाराच्या एक ऐैसपैस खुर्चीवर बसले होते. त्यांचे टेबल ही 4 शंखाकृती पायांवर उभी होते. त्यांचा अवतार शंखातून तोंड बाहेर काढणाऱ्या गोगलगाई सारखा दिसत होता.

काकांनी क्षणभरही वेळ न दवडता मुलाखत सुरू केली. कमीत कमी प्रश्न विचारून, कमीत कमी वेळात महत्त्वाची माहिती काढून घ्यायची आणि मग इतर भरमसाठ मजकुराने मुलाखत सजवायची यात काकांचा हातखंडा होता. एका दिवसात चार चार, पाच पाच मुलाखती ते अगदी चुटकीसरशी संपवायचे. असो. तर त्यांनी पहिला प्रश्न विचारला.

शंखमणी साहेब आपले नाव नाविन्यपूर्ण वाटते. ते आपले खरे नाव का व्यवसायानिमित्त घेतले ?

चांगला प्रश्न. आम्ही प्रत्यक्ष भगवान विष्णूंच्या शंखाचे वंशज म्हणून हे नाव धारण करतो.

वा छान ! पण त्याचा वास्तूशी काय संबंध ?

आहे तर, आपल्या पुरातन वास्तुशास्त्राची सुरुवातच मुळी शंखनादाने झाली !

शंखनादाने ? काय सांगता काय ? ती कशी झाली ?

शंखनादाने ज्या लहरी उत्पन्न झाल्या त्यातूनच तर हे शास्त्र संपन्न झाले ! आमचे पूर्वज स्वामी शंखनाद यांनी ते ज्ञान शंखपद. शंखरत्न, शंखमणी आणि शंखसंभव या ग्रंथातून शब्दबद्ध करून ठेवले. त्यात वास्तूच्या विविध अंगांचा सांगोपांग विचार केला आहे. तोच वारसा आम्ही चालवतो म्हणून आम्ही शंखमणी !

वा फारच अद्भुत ! या शास्त्राची काय वैशिष्ट्ये ? ती आजच्या काळात कशी लागू होतात ?

काका, पंचमहाभूते आजही आहेत, पूर्वीही होती आणि भविष्यातही राहणार आहेत. ती अखिल विश्वाला घेरुन आहेत. त्यांना सांभाळून राहावे लागते. त्यांच्याशी जराही दंगामस्ती चालत नाही. त्यांच्यावर योग्य नियंत्रण ठेवावे लागते. त्यासाठी स्वामी शंखमणी यांनी शंख पद्धती म्हणजे शंख थिअरी शोधून काढली.

तिचे आपण थोडक्यात स्वरूप सांगाल का ? आणि आधुनिक काळात ती कशी उपयुक्त आहे ?

काका, मुळात प्राचीन काळ, आधुनिक काळ हे जे आपण म्हणतो ना, ते खरे नाही. काळ हा कधीच पुरातन व आधुनिक नसतो. ज्याला आपण शंभर वर्षे म्हणतो तो ब्रह्मदेवाचा एक क्षणही नसतो. असो. आपण नेहमी ऐकतो की अमुक तमुक एकाने असे चुकीचे केले आणि आता बसलाय संकरित. तसेच लोक या पुरातन वास्तुशास्त्राला विसरून तथाकथित आधुनिक वास्तु शास्त्रज्ञांच्या, ज्यांना आपण आर्किटेक्ट म्हणतो, यांचे ज्ञान पाश्चात्त्य विद्येच्या उथळ पायावर आधारित असते, त्यांच्या सल्ल्याने इमारती, घरे बांधतात आणि मग पस्तावले की येतात आमच्याकडे शंख करीत !

त्याचे एखादे उदाहरण देऊ शकाल का ?

एकच का ? शेकडो देता येतील. या अफाट शहरात माझ्या सल्ल्याने इमारती बांधणारे शेकडो कंत्राटदार आहेत. आम्ही शंखमणींच्या सल्ल्याने आमची संकुले बांधतो,असा ते नुसता उल्लेख करतात त्यांच्या जाहिरातीत, तर हातोहात त्यांचे बुकिंग हाउसफुल होऊन जाते ! आणखी काय पुरावा हवा ?

साहेब आपले मूळचे शिक्षण काय आणि वास्तूमध्ये आपण कुठून पदवी, पदविका घेतली ?

मी वकील आहे. फावल्या वेळात वकिली करणे पण मुख्य व्यवसाय वास्तु ! हा माझा वंशपरंपरागत व्यवसाय आहे. त्याचे कुठेही शिक्षण मिळत नाही. पूर्वसुरींचे ज्ञान हेच काय ते खरे शिक्षण. हा महान ठेवा जपणे हे मी माझे आद्य कर्तव्य मानतो.

मग कायद्यानुसार नसतो वाटत आपला सल्ला ?

कायदा ? कसला कायदा ? ते कोर्टाचे कायदे वेगळे. इथे मी सांगेन तोच कायदा ! विश्वास असेल तर या नाहीतर बसा शंख करीत !

आपल्या सल्याचा एखादा नमुना सांगाल का ?

हो सांगतो की अल्पविराम परवाच प्रसिद्ध बिल्डर शेठ चांदीमल यांच्या 100 इमारतींच्या भव्य संकुलासाठी शंख यज्ञ संपन्न केला.

शंखयज्ञ ? ते काय असते ?

शंख यज्ञ म्हणजे शंखध्वनी करून इमारतीच्या जागेवर चहूबाजूंनी ध्वनिलहरींचा अदृश्य भक्कम पडदा निर्माण करायचा !

वा हे फारच अद्भुत वाटते. ते आपण कसे करता ?

इमारतींचा जागेवर चारी बाजूंना काही विशिष्ट अंतरावर आमचे शंख तज्ञ उभे राहतात. एक आठवडाभर त्या जागेवरून अखंड शंखनाद करून शंखनाद लहरींचा अखंड नाद पडदा उभा करतात. एकदा का हा पडदा उभा राहिला की कोणतीही अभद्र शक्ती इमारतीला स्पर्श करू शकत नाही. यज्ञ पाहायला शेकडो लोक आले. यज्ञाचा प्रसाद खाल्ला. तोही साधासुधा नाही, पंचतारांकित ! आणि जाता जाता बुकिंगही करून गेले. यज्ञ संपला तेव्हा सर्व संकुलाचे बुकिंग पूर्ण झाले. कित्येकांना निराश होऊन परतावे लागले. ज्यांनी बुकिंग केले त्यांना एक एक मंतरलेला शंख फुकट दिला. शिवाय तो फुंकायची विशिष्ट पद्धत शिकवली. शंख फुंकणे आणि शंख करणे यातला फरक त्यांना समजावून दिला.

वावा शंख मणी साहेब, आपल्या सल्ल्याने शेठ चांदी मल यांची चांगलीच चांदी झाली म्हणावयाचे ?

होय तर, त्यांनीच खुश होऊन ही आलिशान जागा दिली मला. एवढ्यात संकटसमयी वाचतो तसा सायरन वाजू लागला. काकांच्या टकला वरचे दोन केस ताठ उभे झाले.

शंखमणींनी शंखहास्य केले. काका, घाबरू नका. हा आमच्या स्वागतिकेने केलेला शंख इशारा आहे. त्याचा अर्थ आपली वेळ संपली. माझे दुसरे अशील वाट पाहत आहे. या आपण, नमस्ते !

त्यांचे आभार मानून काकांनी तिथून पाय काढला.

टॅक्सी केली आणि अंधेरीला शंकर रुद्राक्ष यांच्या ऑफिसमध्ये बरोबर एक वाजता जाऊन पोहोचले.

त्यांच्या केबिन बाहेर एक रुद्राक्ष माला मंडित बुवा बसले होते. तो हसून म्हणाला अल्पविराम वत्सा कोण हवंय तुला ?

मी काका सरधोपट. शंकर रुद्राक्षांची मुलाखत घ्यायला आलोय.

हो का ? जा आत ते आपलीच वाट पाहत आहेत.

काकांनी चेंबरमध्ये प्रवेश केला. शंकर रुद्राक्ष अगदी अपटूडेट पोशाखात, सूट,बूट, टायघालून बसले होते. फक्त एकच वेगळे होते ते म्हणजे एखाद्या पर्यंत रुळणारे लांब केस ! त्या केसांच्या त्यांनी छोट्या छोट्या वेण्या घातल्या होत्या. त्यात जटांसारख्या लोंबत होत्या. त्या प्रत्येक वेळी च्या टोकाला एक रुद्राक्ष लावला होता. बोलताना मान हलली की शंकराच्या लोलकाप्रमाणे त्या वेण्या हलत होत्या.

काकांनी पहिला प्रश्न विचारला.

शंकर रुद्राक्ष आपण कोणते वास्तुशास्त्र शिकलात ? या शास्त्राचे शिक्षण कोठे मिळते ? किती वर्षाचे असते ?

काका, हे ज्ञान विद्यापीठात मिळत नाही. आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी जंगलात हिंडून, निसर्ग निरीक्षण करून , थंडीवाऱ्यात प्रचंड तपश्चर्या करून स्वल्पविराम हिमालयात भगवान शंकरांची आराधना करून हे रुद्र वास्तू ज्ञान संपादन केले.अखिल मानवाच्या कल्याणासाठी त्यांनी ते रुद्र मंडलम या बृहत ग्रंथात ग्रंथित केले. त्या थोर वारशाचे आम्ही पुनरुज्जीवन केले.

ते ठीक आहे. त्यासाठी आपण काही संशोधन करून काही नवीन अभ्यासक्रम बनविला आहे का ? त्याला शासनाची मान्यता घेतली असेलच ?

छे छे ! त्याला कशाला हवी आहे मान्यता ? अहो तो आपला स्वयंभू पुरातन वारसा आहे एवढे पुरेसे नाही का ? आपण आपल्या वर्तमानपत्रात रोज भविष्य छापता. ते लिहिणारे कोणत्या विद्यापीठाचे पदवीधर असतात ? नाही ना ? तसेच आहे हे, विश्वासाचा मामला आहे.

बरे असो. या रुद्र मंडला नुसार आपण काय सल्ला देता ?

रुद्र मंडळात मुख्यत्वे पाच तत्त्वे सांगितली आहेत. ती म्हणजे माती, दगड , दिशा,  वारा-जल, वृक्ष आणि अग्नी. याचा विचार करून आम्ही सल्ले देतो .

तो कसा ?

मातीची चव घेऊन आम्ही घरातल्या फरश्या कशा असाव्यात हे सांगतो. दिशा, वारा, पाऊस,जल या तत्त्वानुसार घराची दारे, खिडक्या कुठे, केवढ्या असाव्यात ते सांगतो. पाण्याचे माठ, लोट्या, पेले, पिंप यांच्या जागा ठरवतो. गच्चीत, बाल्कनीत आजूबाजूला वड, पिंपळ, आंबा वगैरे मोठमोठे वृक्ष कुठे लावायचे ते सांगतो. अग्नी पेटवून त्याच्या धुराच्या दिशेवरून गॅस शेगड्या, हिटर, गिझर, इस्त्री,फ्रिज, वॉशिंग मशीन इत्यादी अग्निजन्य उपकरणे कुठे असावीत याचे मार्गदर्शन करतो.

अग्नी कसा पेटवता ?

काडी ओढून ! काडी ओढून ती भोकाच्या रुद्राक्ष समोर धरून त्या भोकातून धुराची दिशा पाहतो.

वा ! फारच सूक्ष्म विचार करता आपण !

होय तर, शिवाय त्यातूनही समाधान नाही झाले तर आम्ही एक अत्यंत खात्रीशीर सल्ला देतो.

असं ? तो कोणता ?

प्रत्येकाला एक रुद्राक्ष माला देतो. सर्व उपाय थकल्यावर ती मला हातात घेऊन पहाटे आणि रात्री झोपण्यापूर्वी स्नान करून रुद्राक्ष नमः हा जप दहा हजार वेळा करायचा. सर्व बाधा हमखास दूर होतात. अहो काका, या आमच्या सल्ल्याने काही जणांना तर या संसाराचीच उपरती होऊन त्यांनी कायमची कैलासाची वाट धरली. एकदम मोक्षप्राप्तीच.

काय सांगता काय? मग घरच्या लोकांचे काय?

काका, जो चोच देतो तो चारापण देतोच. शेवटी तर सगळेच भस्मीभूत व्हायचे असते ना? तो योग त्यांना आमच्या सल्ल्याने आयताच येतो. केवढे भाग्य.

होय, होय, खरेच. थोर भाग्यच म्हणायचे त्यांचे. आपले भाग्य फार उज्वल दिसते रुद्राक्ष साहेब. शुभेच्छा.

काका मुलाखत संपवून निघाले तसे शंकर रुद्राक्षांनी त्यांना एक रुद्राक्ष माळ देऊन सल्ला (फुकटचा) दिला. रोज कमीत कमी हजार जप करा. तुमचे कल्याण होईल. बरे या आता. नमस्कार.

बाहेर पडल्यावर काकांनी ती रुद्राक्ष माला काऊंटरवरच्या बुवांना घातली आणि ते थेट वास्तुतज्ञ लहरी नाथांकडे पोहोचले.

लहरी नाथ ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची आणि समोरचे टेबल आणि त्या टेबलसमोरच्याखुर्च्या हे सगळे एका मोठ्या झोपाळ्यासारख्या पाटावर ठेवले होते. पाट जमिनीपासून सुमारे सहा इंच वर होता आणि अगदी हळूहळू पुढे मागे हालत होता. काकांनी हळूच एक पाय वर ठेवला आणि एक खुर्ची पकडून ते खुर्चीवर बसले. लगेचच त्यांनी मुलाखत सुरू केली.

लहरी नाथ ही झोपाळ्याची कल्पना फारच अभिनव दिसते. याचा वास्तूशी काय संबंध?

काका, वास्तूवर सर्व बाजूंनी सर्व काळी सुष्ट आणि दुष्ट लहरींचा मारा होत असतो. या झोपाळ्यामुळे सतत हलत्या लहरी निर्माण होऊन त्या रोखल्या जातात.

वा. हे फारच अजब तंत्र दिसते आहे. पण मला सांगा, हे सर्वसामान्यांना कसे परवडायचे?

त्यांच्यासाठी फार सोपे उपाय असतात.

ते कोणते?

या लहरींच्या नियंत्रणासाठी दरवाजे, खिडक्या, भिंती यांना योग्य ठिकाणी आडव्या, तिडव्या फटी पाडाव्या लागतात. ते मी तपासून सल्ला देतो.

ते कसे तपासता?

त्यासाठी घराची कुंडली, घरातील माणसांच्या कुंडल्या, पशु पक्षांच्या कुंडल्या, उदाहरणार्थ. कुत्रा, मांजर, पोपट वगैरे, तपासाव्या लागतात. काही अमानवी शक्तीचा संचार आहे का हे त्यावरून समजते.

हे फारच अजब वाटते. एखादे उदाहरण देता का?

हो देतो ना.परवाच शेठ माणिकचंदनी आले होते. त्यांच्या चाळीस मजली इमारती वरचा  पेंट हाउस फ्लॅट त्यांचे गिऱ्हाईक शेठ घिसूमल चांदीमलयांच्या बायकोला पसंत नाही म्हणून शेठ घिसूमल परत करत होते. माझ्या सल्ल्याप्रमाणे काम चालू असूनही असे का झाले म्हणून मला जाब विचारत होते.

मग आपण काय मार्ग काढलात?

मी त्यांची माहिती तपासली. तेव्हा लक्षात आलं की माणिकचंदानी शेटजींची आणि त्यांच्या बायकोची जन्मतारीख चुकीची दिली होती. शेटजींनी दिली होती तीन आणि शेठाणींचीही तीन.पण मुळात शेठाणींची होती सहा. म्हणजे 36 चा आकडा. मग भांडण नाही होणार तर काय मुके घेणार?

मग? कसा सोडवलात आपण हा तिढा?
मी सल्ला दिला की बायकोच बदला म्हणून.
काय सांगता? मग बदलली बायको?
हो बदलली. म्हणजे दुसरा फ्लॅट घेऊन दिला आणि ठेवलेल्या बायकोला दिले पेंट हाउस. दोघीही खुश. माणिकचंदानीचा ही दुप्पट फायदा झाला.

वा, वा. लहरी नाथ आपण महान आहात. त्यांना शुभेच्छा देऊन काका चार वाजता पेडर रोडवर, चा लू यांच्या मुलाखतीला त्यांच्या कार्यालयात पोहोचले. तेव्हा चा लू यांची चहाची वेळ झाली होती. काकांनाही चहाची गरज होती. मग एका चहाच्या कपावर म्हणजे ओव्हर अ कप ऑफ टी, त्यांनी मुलाखत सुरू केली.

चा लू , हे फेंगशुई काय प्रकरण आहे?

हे चिनी शास्त्र आहे असे म्हणतात, पण खरे तर ते प्राचीन भारतीय शास्त्रच आहे.

काय सांगता?

हो ना, फार पूर्वी बौद्ध भिक्षूंनी ते चीनला नेले. या पद्धतीने गृहसजावट केली म्हणजे घरात जंगलांची शांतता निर्माण होऊन मन विपश्यना तपश्चर्येसाठी तयार होते आणि अंतिम मोक्षाकडे जायची आत्म्याची तयारी होते. या शास्त्राला त्याचे मूळ स्वरूप आणि पावित्र्य प्राप्त व्हावे म्हणून मी लवकरच अजिंठ्याला फेंग शुई विपश्यना समाधी संस्था स्थापन करत आहे.

वा वा ! चा लू  आपण हे फारच महान कार्य हाती घेत आहात. आपणास शुभेच्छा. आपल्या सल्ल्याने घरोघरी अजंठा गुहा निर्माण होवोत ही प्रार्थना. धन्यवाद. काकांनी मुलाखत आटोपली.

वास्तु विशेषांकाची विक्रमी विक्री झाली. पाश्चिमात्य ज्ञानाने शेफारलेल्या आर्किटेक्ट लोकांचे पुरतेच कंबरडे मोडले. त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळावी म्हणून विशेषांक सम्राट, सूर्याजी रवीसांडे यांनी आता वास्तुशास्त्र आणि आधुनिक आर्किटेक्चर आणि आर्किटेक्ट या विषयावर एक पाचशे पानी दणदणीत विशेषांक काढायची घोषणा केली आहे.

काका सरधोपट मुलाखतींसाठी आणि जाहिरातींसाठी प्रसिद्ध आर्किटेक्ट आणि ठेकेदार यांची नावे गोळा करत आहेत. इच्छुकांनी त्वरीत नावे नोंदवावीत. संधीचा फायदा घ्यावा.

पत्ता –  संपादक, रोजची पहाट, वरळी, मुंबई – ४२०४२०

– वि. रा. अत्रे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..